व्हिडिओ पाहण्यासाठी

पुनरुत्थान म्हणजे काय?

पुनरुत्थान म्हणजे काय?

बायबलचं उत्तर

 बायबलमध्ये “पुनरुत्थान” असं भाषांतर केलेला शब्द ग्रीक भाषेतल्या अनास्तासीस  या शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ “उठवणं” किंवा “पुन्हा उभं राहणं” असा होतो. ज्या व्यक्‍तीचं पुनरुत्थान होतं, तिला मेलेल्यांतून उठवलं जातं आणि तीच व्यक्‍ती पुन्हा जिवंत होते.​—१ करिंथकर १५:१२, १३.

 “पुनरुत्थान” हा शब्द हिब्रू शास्त्रवचनांत (जुन्या करारात) सापडत नाही. पण पुनरुत्थानाची शिकवण त्यात दिलेली आहे. उदाहरणार्थ, होशेय संदेष्ट्याद्वारे देवाने असं वचन दिलं होतं: “मी त्यांना कबरेच्या तावडीतून सोडवीन; मी त्यांना मृत्यूकडून परत आणीन.”​—होशेय १३:१४; ईयोब १४:१३-१५; यशया २६:१९; दानीएल १२:२, १३.

 पुनरुत्थान झालेले कुठे राहतील? काही जणांचं पुनरुत्थान स्वर्गात राहण्यासाठी केलं जाईल. तिथे ते ख्रिस्तासोबत राजे म्हणून राज्य करतील. (२ करिंथकर ५:१; प्रकटीकरण ५:९, १०) बायबलमध्ये याला ‘पहिलं पुनरुत्थान’ आणि ‘आधी होणारं पुनरुत्थान’ म्हटलंय. यावरून कळतं की पुढे आणखी एक पुनरुत्थान होणार आहे. (प्रकटीकरण २०:६; फिलिप्पैकर ३:११, तळटीप) पुढे होणारं ते पुनरुत्थान पृथ्वीवरच्या जीवनासाठी केलं जाईल. तेव्हा लाखो-करोडो लोकांना उठवलं जाईल आणि ते पृथ्वीवर आनंदाने राहतील.​—स्तोत्र ३७:२९.

 लोकांचं पुनरुत्थान कसं केलं जाईल? देवाने येशूला मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याची शक्‍ती आणि अधिकार दिला आहे. (योहान ११:२५) येशू ‘स्मारक कबरींमध्ये असलेल्या सगळ्यांना’ पुन्हा जिवंत करेल. त्या सर्वांना त्यांची आधीची ओळख, व्यक्‍तिमत्त्व आणि आठवणी यांसोबत उठवलं जाईल. (योहान ५:२८, २९) जे स्वर्गात राहण्यासाठी जिवंत होतील त्यांना अदृश्‍य शरीर दिलं जाईल. तर, ज्यांना पृथ्वीवर राहण्याची आशा आहे त्यांना एक निरोगी शरीर देऊन उठवलं जाईल.​—यशया ३३:२४; ३५:५, ६; १ करिंथकर १५:४२-४४, ५०.

 कोणाचं पुनरुत्थान होईल? बायबल म्हणतं की, “नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं [जाईल].” (प्रेषितांची कार्यं २४:१५) नीतिमान लोकांमध्ये नोहा, सारा आणि अब्राहाम यांच्यासारखे देवाचे विश्‍वासू सेवक असतील. (उत्पत्ती ६:९; इब्री लोकांना ११:११; याकोब २:२१) तर अनीतिमानांमध्ये असे लोक असतील, जे देवाच्या स्तरांच्या विरोधात वागत होते कारण त्यांना कधीच देवाचे स्तर जाणून घेण्याची आणि त्यांचं पालन करण्याची संधी मिळाली नव्हती.

 पण असेही काही लोक आहेत जे इतक्या दुष्टपणे वागतात, की त्यांच्यात सुधारणा होऊच शकत नाही. अशा लोकांचा मृत्यू झाल्यावर त्यांचं पुनरुत्थान होणार नाही. त्यांचा नाश कायमचा असेल, त्यांना पुन्हा जिवंत होण्याची कोणतीही आशा नाही.​—मत्तय २३:३३; इब्री लोकांना १०:२६, २७.

 पुनरुत्थान केव्हा होईल? बायबलमध्ये सांगितलं होतं, की स्वर्गातल्या जीवनासाठी होणारं पुनरुत्थान ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान होईल. याची सुरुवात १९१४ पासून झाली. (१ करिंथकर १५:२१-२३) तर, पृथ्वीवरच्या जीवनाची आशा असलेल्यांचं पुनरुत्थान येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान होईल. त्या वेळी संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवलं जाईल.​—लूक २३:४३; प्रकटीकरण २०:६, १२, १३.

 पुनरुत्थानाच्या शिकवणीवर आपण भरवसा का ठेवू शकतो? बायबलमध्ये नऊ पुनरुत्थानांचे सविस्तर अहवाल दिले आहेत. यांपैकी प्रत्येक पुनरुत्थानाबद्दल अशा लोकांनी खातरी दिली, ज्यांनी ते स्वतः पाहिलं होतं. (१ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७; १३:२०, २१; लूक ७:११-१७; ८:४०-५६; योहान ११:३८-४४; प्रेषितांची कार्यं ९:३६-४२; प्रेषितांची कार्यं २०:७-१२; १ करिंथकर १५:३-६) यांपैकी येशूने केलेलं लाजरचं पुनरुत्थान खूप विशेष आहे. कारण लाजरला मरून चार दिवस झाले होते आणि येशूने तो चमत्कार बऱ्‍याच लोकांसमोर केला होता. (योहान ११:३९, ४२) येशूचे विरोधकसुद्धा हे पुनरुत्थान झाल्याचं नाकारू शकत नव्हते. म्हणून त्यांनी येशू आणि लाजर या दोघांनाही मारून टाकायचा कट रचला.​—योहान ११:४७, ५३; १२:९-११.

 बायबलमधून आपल्याला कळतं, की मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत करण्याची देवाकडे शक्‍ती आणि इच्छा आहे. तो सर्वशक्‍तिमान आहे आणि त्याची स्मरणशक्‍ती अमर्याद आहे. त्यामुळे, तो ज्यांचं पुनरुत्थान करणार आहे त्या प्रत्येकाबद्दल लहानातली लहान माहितीसुद्धा तो आठवणीत ठेवतो. (ईयोब ३७:२३; मत्तय १०:३०; लूक २०:३७, ३८) मेलेल्यांना पुन्हा जिवंत करण्याचं देवाकडे सामर्थ्य तर आहेच, पण तसं करायला तो उत्सुकही  आहे! भविष्यातल्या पुनरुत्थानाबद्दल सांगताना बायबल म्हणतं, की मेलेल्या लोकांना ‘पुन्हा पाहण्यासाठी देव आतुर होईल, कारण त्याने त्यांना आपल्या हातांनी निर्माण केलं.’​—ईयोब १४:१५.

पुनरुत्थानाबद्दल काही गैरसमज

 गैरसमज: पुनरुत्थान म्हणजे त्या व्यक्‍तीचा पुनर्जन्म होतो.

 खरी माहिती: बायबल असं शिकवतं की एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याचं अस्तित्व संपतं आणि मृत्यूनंतर त्या व्यक्‍तीचा कोणताही भाग जिवंत राहत नाही. त्यामुळे तो दुसरी व्यक्‍ती म्हणून जन्म घेऊ शकत नाही. (उत्पत्ती २:७; उपदेशक ९:५, १०) पुनरुत्थान म्हणजे ज्या व्यक्‍तीचा मृत्यू झालाय त्याच व्यक्‍तीला पुन्हा जीवन दिलं जातं.

 गैरसमज: काही लोकांचं पुनरुत्थान होईल आणि त्यांचा न्याय करून लगेच नाश केला जाईल.

 खरी माहिती: बायबल सांगतं की पुनरुत्थान झालेल्यांपैकी “वाईट कामं करणाऱ्‍यांचा न्याय केला जाईल.” (योहान ५:२९) पण हा न्याय, त्यांनी मृत्यूच्या आधी केलेल्या कामांच्या आधारावर नाही, तर पुनरुत्थान झाल्यावर केलेल्या कामांच्या आधारावर केला जाईल. येशूने म्हटलं: “मेलेले लोक देवाच्या मुलाची हाक ऐकतील आणि ज्यांनी त्याचं ऐकलंय ते जिवंत होतील.” (योहान ५:२५) जे त्याचं ‘ऐकतील,’ म्हणजेच पुनरुत्थान झाल्यावर शिकलेल्या गोष्टींप्रमाणे वागतील त्यांचं नाव ‘जीवनाच्या गुंडाळीत’ किंवा पुस्तकात लिहिलं जाईल.​—प्रकटीकरण २०:१२, १३.

 गैरसमज: पुनरुत्थान होतं तेव्हा एका व्यक्‍तीला तिचं मृत्यूच्या आधीचंच शरीर मिळतं.

 खरी माहिती: मृत्यूनंतर व्यक्‍तीचं शरीर मातीला मिळतं.​—उपदेशक ३:१९, २०.