व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अचूक माहितीचा शोध

अचूक माहितीचा शोध

अचूक माहिती मिळाल्यामुळे बऱ्‍याच लोकांचा जीव वाचू शकतो. उदाहरणार्थ, संसर्गजन्य रोग कसे पसरतात? या प्रश्‍नाचं अचूक उत्तर मिळाल्यामुळे कितीतरी लोकांच्या जीवनावर प्रभाव झाला आहे.

हजारो वर्षांआधी कोणालाच या प्रश्‍नाचं उत्तर माहीत नव्हतं. साथींच्या आणि संसर्गजन्य रोगांमुळे लाखो लोकांचे बळी गेले. मग कालांतराने वैज्ञानिकांना याबद्दल अचूक माहिती मिळाली. त्यांनी शोध लावला की कोणताही आजार हा सहसा किटाणू, म्हणजे सूक्ष्म जीव यांमुळे होतो जसं की, बॅक्टेरिया किंवा व्हायरस. या एका अचूक माहितीमुळे लोकांना अनेक रोगांपासून स्वतःचं संरक्षण करायला आणि आजारांवर उपचार करायला मदत झाली. तसंच, लाखो लोकांना निरोगी जीवन जगणं शक्य झालं आणि त्यांचं आयुष्यमानही वाढलं.

पुढे दिलेल्या इतर महत्त्वपूर्ण प्रश्‍नांबद्दल काय? जसं की,

  • देव कोण आहे?

  • येशू ख्रिस्त कोण आहे?

  • देवाचं सरकार म्हणजे काय?

  • आपलं भविष्य कसं असेल?

या प्रश्‍नांची बऱ्‍याच लोकांना अचूक उत्तरं मिळाली आहेत आणि यामुळे त्यांच्या जीवनात चांगले बदल झाले आहेत. तुम्हालाही या उत्तरांमुळे फायदा होऊ शकतो.

अचूक माहिती शोधणं शक्य आहे का?

तुम्ही कदाचित विचार कराल, ‘कोणत्याही विषयाबद्दल अचूक माहिती मिळवणं कसं शक्य आहे?’ तसं पाहायला गेलं तर आज अनेक गोष्टींबद्दल खरी किंवा अचूक माहिती मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. असं का म्हणता येईल?

अचूक माहिती मिळवण्याच्या बाबतीत अनेक लोकांचा सरकार, व्यापार जग किंवा मीडिया यांवरून भरवसा उडाला आहे. मिळालेली माहिती ही खरी आहे की फक्‍त काही लोकांची मतं आहेत? अर्धवट माहिती आहे की खोट्या गोष्टींना खरं म्हणून दाखवलं जात आहे? असे प्रश्‍नं लोकांच्या मनात येतात. आणि नेमकी खरी माहिती कोणती हे ओळखणं त्यांना कठीण जातं. आज लोकांचा एकमेकांवर भरवसा राहिलेला नाही आणि पुष्कळशी माहिती खोटी असल्यामुळे खऱ्‍या माहितीबद्दल लोकांचं एकमत नाही. इतकंच काय तर खऱ्‍या माहितीमुळे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दलही त्यांची वेगवेगळी मतं आहेत.

ही सर्व आव्हानं असली तरी जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची अचूक उत्तरं शोधणं शक्य आहे. ते कसं? आपण दररोज कमी महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी ज्या गोष्टी करतो, त्याच गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं शोधताना कराव्या लागतील.

अचूक माहितीचा शोध

आपण खरंतर रोजच काही प्रमाणात खऱ्‍या माहितीचा शोध घेत असतो. जेसीका नावाच्या एका स्त्रीच्या परिस्थितीचा विचार करा. ती म्हणते: “माझ्या १२ वर्षांच्या मुलीला शेंगदाणे खाल्ल्यामुळे भयानक ॲलर्जी होते. थोडेफार शेंगदाणे खाल्ल्यानेही तिच्या जीवावर बेतू शकतं.” त्यामुळे जेसीका आपल्या मुलीसाठी जे काही खाद्यपदार्थ विकत घेते त्याबद्दल ती आधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. त्याबद्दल ती म्हणते: “सर्वात आधी तर मी खाद्यपदार्थांच्या लेबलवर काय लिहिलं आहे ते वाचते. त्या खाद्यपदार्थात कोणकोणत्या गोष्टी आहेत हे मी पाहते. मग मी आणखी संशोधन करते. जिथे तो पदार्थ बनवला जातो तिथे मी फोन करते आणि या गोष्टीची खातरी करून घेते की चुकून त्या खाद्यपदार्थात शेंगदाणे तर मिसळले गेले नाहीत ना. तसंच, खाद्यपदार्थ बनवणारी कंपनी अन्‍न सुरक्षेबाबतीत दक्षता बाळगते की नाही, हेही मी वेबसाईट किंवा इतर भरवशालायक माध्यमांतून शोधण्याचा प्रयत्न करते.”

तुम्ही जीवनातल्या ज्या प्रश्‍नांची अचूक उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करता, ते प्रश्‍न कदाचित जेसीकाला पडलेल्या प्रश्‍नाइतके महत्त्वाचे नसतील. पण जेसीकासारखंच तुम्हीही तुमच्या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी पुढे दिलेली पावलं उचलू शकता:

  • माहिती मिळवा.

  • खोलवर संशोधन करा.

  • माहितीचे स्रोत भरवशालायक असल्याची खातरी करा.

हीच पद्धत तुम्हाला जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यात मदतीची ठरेल. ते कसं?

अचूक उत्तरं असलेलं एक अनोखं पुस्तक

जेसीकाने आपल्या मुलीच्या ॲलर्जीविषयी संशोधन करताना जी पद्धत वापरली होती, तीच पद्धत तिने बायबलवर आधारित असलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठीही वापरली. त्याबद्दल ती म्हणते: “लक्ष देऊन वाचन आणि मनापासून संशोधन केल्याने मला बायबलमध्ये माझ्या प्रश्‍नांची उत्तरं मिळाली.” जेसीकासारखंच लाखो लोकांना पुढे दिलेल्या विषयांबद्दल बायबल काय म्हणतं हे समजलं आहे:

  • जीवनाचा काय उद्देश आहे?

  • मृत्यूनंतर आपलं काय होतं?

  • आपल्या जीवनात दुःख-त्रास का आहे?

  • देव दुःख-त्रास काढून टाकण्यासाठी काय करणार आहे?

  • आपलं कुटुंब आनंदी कसं बनू शकतं?

तुम्हाला या आणि अशा अनेक प्रश्‍नांची अचूक उत्तरं बायबल वाचल्याने आणि www.ps8318.com/mr या वेबसाईटवर संशोधन केल्याने मिळतील.