व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दिवस जेरूसलेमभोवती पडणाऱ्या वेढ्याचं नाटक करण्यास यहेज्केल तयार होता

संदेष्ट्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करा

संदेष्ट्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करा

पूर्वीच्या संदेष्ट्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये काहीसा सारखेपणा आहे असं तुम्हाला वाटतं का? न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशनच्या, २०१३ सालच्या आवृत्तीतील, “शब्दार्थसूची”मध्ये संदेष्ट्याची व्याख्या देण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे, की “संदेष्टा म्हणजे देवाच्या उद्देशांना प्रकट करणारी व्यक्ती. संदेषटे केवळ पुढे होणाऱ्या गोष्टींविषयीच नव्हे तर यहोवाच्या शिक्षणाविषयी, त्याच्या आज्ञांविषयी आणि त्याच्या न्यायदंडाविषयी लोकांना कळवतात. त्यामुळे देवाचा प्रवक्ता म्हणून त्यांची भूमिका असते.” तुम्ही भविष्यवाणी करत नसला तरी या व्याख्येनुसार, जेव्हा तुम्हीही देवाच्या वतीनं, त्याच्या वचनात काय लिहिलं ते इतरांना सांगता, तेव्हा एका अर्थानं तुम्हीदेखील संदेष्ट्यासारखंच काम करत असता.—मत्त. २४:१४.

मग यहोवाबद्दल आणि मानवजातीसाठी असणाऱ्या त्याच्या उद्देशाबद्दल इतरांना सांगणं, आपल्यासाठी एक मोठा विशेषाधिकारच नाही का? खरंतर यामुळे आपण ‘अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्या’ देवदूतासोबत मिळून काम करत असतो. (प्रकटी. १४:६) पण मग आपल्यासमोर अशी काही आव्हानं येऊ शकतात ज्यांमुळे या विशेषाधिकाराचं महत्त्व आपल्या नजरेत कमी होऊ शकतं. मग अशी कोणती आव्हानं आहेत, ज्यांमुळे असं होऊ शकतं? आपण पार थकून गेल्यामुळे, निराश झाल्यामुळे किंवा निरुपयोगीपणाच्या भावनेमुळे कदाचित असं होऊ शकतं. बायबल काळातील संदेषटेसुद्धा याबाबतीत आपल्याहून वेगळे नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. आणि यहोवानं त्यांना त्यांची कामगिरी पूर्ण करण्यास मदत केली. त्यांच्यापैकी काहींची उदाहरणं पाहून, त्यांचं अनुकरण कसं करता येईल ते आता आपण पाहू या.

त्यांनी आपली शक्ती पणाला लावली

कधीकधी आपण आपल्या दररोजच्या कामात इतकं थकून जातो की मग प्रचारकार्यात सहभाग घेण्याची आपली इच्छा राहत नाही. हे खरं आहे की, आपल्याला विश्रांतीची गरज आहे. येशूनं आणि त्याच्या शिष्यांनीही काही वेळा थोडी विश्रांती घेतली होती. (मार्क ६:३१) पण बॅबिलॉनमध्ये असणाऱ्या यहेज्केल संदेष्ट्याचा आणि बंदिवासात असलेल्या इस्राएली लोकांमध्ये त्याला जी कामगिरी सोपवण्यात आली होती, तिचा विचार करा. देवानं एकदा त्याला एक वीट घेऊन त्यावर जेरूसलेम शहराचं चित्र कोरण्यास सांगितलं होतं. त्यानंतर या विटेच्या म्हणजे लाक्षणिक शहराच्या शेजारी डाव्या कुशीवर ३९० दिवस आणि मग उजव्या कुशीवर ४० दिवस झोपून राहण्याद्वारे, या शहराला लाक्षणिक रीत्या वेढा पडला असल्याचं त्याला दाखवायचं होतं. यहोवानं यहेज्केलास सांगितलं: “पाहा, मी तुला बंधनांनी बांधतो, म्हणजे तू आपल्या वेढ्याचे दिवस संपवीपर्यंत या कुशीचा त्या कुशीला वळावयाचा नाहीस.” (यहे. ४:१-८) त्याच्या या कृतीमुळे बंदिवासात असलेल्या इस्राएलांचं लक्ष नक्कीच त्याच्याकडे आकर्षित झालं असावं. जवळजवळ एक वर्षापेक्षा जास्त काळ, अशा प्रकारे ही नाटकीय भूमिका पार पाडत असताना, त्याला नक्कीच शारीरिक रीत्या खूप त्रास झाला असेल. मग या संदेष्ट्यानं आपली भूमिका कशी पार पाडली?

आपल्याला संदेष्टा म्हणून का पाठवण्यात आलं आहे ते यहेज्केलास समजलं होतं. कारण देवानं त्याला सांगितलं होतं, की “ते [इस्राएली लोक] तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्याजकडे कोणी तरी संदेष्टा गेला होता हे त्यांस समजेल.” (यहे. २:५) यहेज्केलानं आपल्याला दिलेल्या कामगिरीचा हेतू लक्षात घेतला. त्यामुळेच जेरूसलेमभोवती पडलेल्या लाक्षणिक वेढ्याचं नाटक त्यानं स्वखुशीनं पार पाडलं. आणि तो एक खरा संदेष्टा होता, हे त्यानं दाखवून दिलं. काही काळानंतर एका निरोप्यानं अशी बातमी आणली, की “नगराचा नाश झाला आहे.” खरंच, यहोवानं सांगितल्यानुसार, त्यांच्यात एक संदेष्टा होता, हे इस्राएलांना आता कळून चुकलं होतं.—यहे. ३३:२१, ३३.

आज आपण, सैतानाच्या या जगाच्या अंताबद्दल, लोकांना सावध करण्याचं काम करत आहोत. दररोजच्या कामात अगदी थकून गेल्यासारखं वाटत असलं तरी देवाच्या वचनातून इतरांना सांगण्याकरता, पुनर्भेट करण्याकरता आणि बायबल अभ्यास घेण्याकरता आपण आटोकाट परिश्रम करत असतो. त्यामुळे, या जगाच्या अंताविषयी असणाऱ्या भविष्यवाण्या पूर्ण होत असताना, “देवाच्या उद्देशांना प्रकट करणारी व्यक्ती” या नात्यानं आपला वापर झाला, याचं समाधान आपल्याला असेल.

त्यांनी निराशेवर मात केली

पवित्र आत्म्याच्या मदतीनं आपण अगदी जोमानं प्रचाराचं काम करत असलो, तरी आपल्या संदेशाबद्दल लोकांची जी प्रतिक्रिया असते त्यामुळे कधीकधी आपण निराश होऊ शकतो. अशा वेळी यिर्मया संदेष्ट्याचं उदाहरण लक्षात घेणं फायद्याचं ठरेल. इस्राएलांना देवाचा संदेश सांगताना त्यालाही थट्टा, अपमान आणि निंदा सहन करावी लागली. एकदा तर, तो इतका निराश झाला, की त्यानं असं म्हटलं: “मी त्याचे नाव काढणार नाही, यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही.” यिर्मया आपल्यासारख्याच भावना असणारा माणूस होता. पण तरीदेखील त्यानं देवाचा संदेश लोकांना सांगायचं सोडलं नाही. का बरं? तो स्वतःच पुढे असं म्हणतो: “तेव्हा माझ्या हाडांत कोंडलेला अग्नी जळत आहे असे माझ्या हृदयाला झाले; मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.”—यिर्म. २०:७-९.

आपल्या संदेशाप्रती असणाऱ्या लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे आज आपणही निराश होऊ शकतो. पण आपण जो संदेश घोषित करतो, त्यावर मनन केल्यास, आपल्यालाही यिर्मयाप्रमाणेच निराशेवर मात करता येईल. मग जणू आपल्यालाही ‘हाडांत कोंडलेला अग्नी जळत असल्यासारखं’ वाटेल. नियमित बायबल वाचनाची सवय लावून घेतल्यास, हा अग्नी तसाच पेटत ठेवण्यास आपल्याला मदत होईल.

त्यांनी नकारात्मक भावनांवर मात केली

कधीकधी आपल्या बांधवांवर अशा काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातात, ज्या कशा पार पाडायच्या ते कळत नसल्यामुळे ते गोंधळून जातात. होशेय संदेष्ट्यालाही कदाचित असंच वाटलं असावं. यहोवानं त्याला अशी आज्ञा दिली: “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे.” (होशे. १:२) विचार करा, जर तुम्हालाही यहोवानं असं एका वेश्येसोबत लग्न करण्यास सांगितलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं! पण होशेयनं ही आज्ञा स्वीकारली. त्यानं गोमर नावाच्या एका स्त्रीशी विवाह केला, आणि त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. यानंतर तिला एक मुलगी आणि आणखी एक मुलगादेखील झाला. असं दिसतं की तिला नंतर झालेली दोनं मुलं ही व्यभिचाराची फळं होती. यहोवानं होशेयला आधीच सांगितलं होतं, की “ती आपल्या वल्लभांमागे धावेल” किंवा आपल्या प्रियकरांना शोधण्याचा प्रयत्न करेल. इथं वापरण्यात आलेल्या “वल्लभांमागे” या शब्दामुळे तिचे अनेक प्रियकर होते, हे स्पष्ट होतं. आणि त्या सर्वांमागे गेल्यानंतर ती पुन्हा होशेयकडे परत येते. आता तुम्ही जर होशेयच्या ठिकाणी असता, तर तुम्ही अशा पत्नीला परत घेतलं असतं का? पण अगदी हेच करण्यास यहोवानं होशेयला सांगितलं! त्यानं तर तिला परत घेण्यासाठी मोठी रक्कमदेखील चुकवली.—होशे. २:७; ३:१-५.

या सर्व गोष्टींमधून शेवटी काय साध्य होईल, असा प्रश्न कदाचित होशेयच्या मनात आला असेल. पण वास्तविक जीवनात अगदी विश्वासूपणे होशेयनं आपली भूमिका प्रत्यक्षात पार पाडली. आणि त्यामुळे इस्राएल राष्ट्रानं यहोवाचा विश्वासघात केला, तेव्हा त्याला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना करण्यास होशेयनं एका अर्थानं आपल्याला मदत केली आहे. शिवाय यामुळे प्रामाणिक अंतःकरणाचे काही इस्राएली लोक नंतर यहोवाकडे परतले.

आज यहोवा कोणालाही एका वेश्येसोबत लग्न करण्यास सांगणार नाही. पण अशा प्रकारची कठीण नेमणूक पार पाडण्यास होशेयनं जी वृत्ती दाखवली त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो? आज आपल्यावर घरोघरचं आणि सार्वजनिक साक्षकार्य करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (प्रे. कृत्ये २०:२०) ही जबाबदारी व्यक्तिगत रीत्या आपल्याला कितीही कठीण वाटत असली, तरी होशेयप्रमाणे आपण नेहमी त्यासाठी तयार असलं पाहिजे. प्रचारकार्याचे काही मार्ग कदाचित तुमच्यासाठी सोपे नसतील. पण होशेयचं उदाहरण लक्षात घेतल्यास तुम्हाला मदत होईल. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करणाऱ्यांपैकी बऱ्याच लोकांनी सुरवातीला असं म्हटलं, की साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायला आम्हाला आवडेल पण घरोघरचं प्रचारकार्य करणं आम्हाला जमणार नाही. पण त्यांच्यापैकी कित्येकांनी नंतर प्रचारकार्यात सहभाग घेण्यास सुरवात केली. मग होशेयच्या उदाहरणातून मिळणारा पहिला धडा तुम्हाला समजला का?

कठीण जबाबदारी स्वीकारण्याच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा धडा आपण होशेयकडून शिकू शकतो. यहोवानं सांगितलेल्या लाक्षणिक नाटकात आपल्या पत्नीच्या संदर्भात त्याला जी भूमिका पार पाडायची होती, त्याबाबतीत सूट मिळावी म्हणून तो यहोवाकडे विनंती करू शकला असता. शिवाय तो जे काही करणार होता, त्याबद्दल इतर कोणालाच काही माहीत नव्हतं. होशेयनं हा सर्व अहवाल लिहिला म्हणूनच तर इतरांना त्याविषयी समजू शकलं. मग इतरांना ज्याविषयी काहीच कळणार नाही, ते उगाच करत राहण्यात काय फायदा? असा विचार कदाचित त्यानं केला असता. आपल्याबाबतीतही अशी परिस्थिती होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला यहोवाविषयी सांगण्याची संधी कदाचित आपल्या हातात असेल आणि त्याविषयी इतर कोणालाच कल्पनादेखील नसेल. अमेरिकेत राहणाऱ्या अॅना नावाच्या एका मुलीच्या बाबतीतही असंच घडलं. एकदा शाळेतील तिच्या शिक्षिकेनं वर्गातील सर्वांना अशा एका विषयावर निबंध लिहिण्यास सांगितला ज्याबद्दल त्यांना सर्वात जास्त चिंता होती. शिवाय त्यांना आपला विषय संपूर्ण वर्गाला पटवूनदेखील द्यायचा होता. देवाबद्दल इतरांना सांगण्याच्या या संधीकडे अॅना दुर्लक्ष करू शकली असती. पण ही संधी मला देवाकडूनच मिळाली आहे असं तिला वाटलं. पण वर्गात त्याची काय प्रतिक्रिया उमटेल याचा विचार करून तिनं यहोवाला प्रार्थना केली. त्यामुळे या संधीचा फायदा उठवण्याची इच्छा तिच्या मनात आणखी बळावली. आणि मग तिनं “उत्क्रांतीच्या पुराव्यांवर एक नजर” असा विषय असणारा एक निबंध लिहिला.

आपली तरुण मुलं संदेष्ट्यांच्या वृत्तीचं अनुकरण करतात आणि यहोवा आपला निर्माणकर्ता असल्याचं अगदी खंबीरपणे सांगतात

जेव्हा हा निबंध तिनं वर्गासमोर वाचून दाखवला, तेव्हा उत्क्रांतीवर पक्का विश्वास असणाऱ्या एका मुलीनं तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पण अॅनानं अगदी तर्कशुद्धपणे आपली बाजू मांडली. या गोष्टीमुळे तिची वर्गशिक्षिका इतकी प्रभावित झाली, की सर्वात तर्कशुद्ध निबंधासाठी तिनं अॅनाला पारितोषिक दिलं. यानंतर, प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलीसोबतही तिला निर्मितीविषयी बऱ्याच वेळा चर्चा करता आली. यहोवाकडून मिळालेल्या या “जबाबदारीला” स्वीकारल्यामुळे अॅना म्हणते की, “आता मी न घाबरता पूर्ण आत्मविश्वासाने राज्याचा संदेश सांगू शकते.”

आपण वास्तविकतेत संदेषटे नसलो तरी यहेज्केल, यिर्मया आणि होशेय यांच्यासारख्या संदेष्ट्यांच्या आत्मत्यागी वृत्तीचं अनुकरण करण्याद्वारे, यहोवानं आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीला आज आपणही यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. मग, कौटुंबिक उपासनेच्या वेळी किंवा व्यक्तिगत अभ्यासादरम्यान अशा इतर संदेष्ट्यांबद्दलही वाचून, त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करता येईल यावर विचार करणं किती फायद्याचं ठरेल!