व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एलाचे खोरे

दावीद विरुद्ध गल्याथ—हे खरोखर घडलं होतं का?

दावीद विरुद्ध गल्याथ—हे खरोखर घडलं होतं का?

काही लोक विचार करतील की, बायबलमधील दावीद आणि गल्याथाचा अहवाल, खरोखरचा आहे की फक्त एक कथा. या आधीचा लेख वाचताना तुमच्या मनातही अशी शंका आली का? जर आली असेल तर पुढील तीन प्रश्नांवर विचार करा.

१ | एका माणसाची उंची साधारण साडे नऊ फूट असू शकते का?

बायबलमध्ये म्हटलं आहे की गल्याथाची उंची “नऊ फुटापेक्षा जास्त होती.” (१ शमुवेल १७:४, ईझी-टू-रिड-व्हर्शन) आणखी एका बायबलच्या भाषांतरात म्हटलं आहे की, त्याची उंची ९ फूट ६ इंच होती. काही लोक म्हणतात गल्याथ इतका उंच असूच शकत नाही. पण विचार करा आधुनिक काळात सर्वात उंच माणसाची उंची ८ फूट, ११ इंच असल्याची नोंद आहे. मग गल्याथ त्याच्यापेक्षा १५ सेंटीमिटर उंच असू शकत नव्हता का? तो रेफाईम वंशातला होता आणि या वंशाचे लोक त्यांच्या मोठ्या उंचीसाठी प्रसिद्ध होते. इजिप्तमध्ये सापडलेल्या, १३ व्या शतकातील एका दस्तऐवजात, कनान क्षेत्रातील काही योद्धे आठ फुटाहून उंच असल्याचा उल्लेख आढळतो. तेव्हा गल्याथ इतका उंच असणं असामान्य वाटत असलं तरी ते अशक्य नव्हतं.

२ | दावीद खराखुरा व्यक्ती होता का?

एके काळी जाणकारांच्या मते, राजा दावीद फक्त एक काल्पनिक पात्र होतं. पण ते आज असा दावा करू शकत नाहीत. पुरातत्व शास्त्रज्ञांना जुन्या काळातील काही लिखाणं सापडली आहेत ज्यावर “दाविदाचं घराणं” असा उल्लेख आहे. इतकंच नव्हे तर येशू ख्रिस्ताने देखील दावीद खरा व्यक्ती असल्याचं म्हटलं. (मत्तय १२:३; २२:४३-४५) येशू हाच मसीहा आहे याच्या ओळखीचा पुरावा दोन वंशावळीतून मिळतो. दोन्ही वंशावळीत तो दाविदाचा वंशज असल्याचं स्पष्ट होतं. (मत्तय १:६-१६; लूक ३:२३-३१) नक्कीच दावीद हा खराखुरा व्यक्ती होता.

३ | दावीद आणि गल्याथाची लढाई जिथं घडली ती जागा अस्तित्वात आहे का?

बायबलमध्ये म्हटलं आहे की ही लढाई एलाच्या खोऱ्यात झाली. पण बायबलमध्ये या जागेविषयी अजून स्पष्ट माहिती दिली आहे. तिथं असंही म्हटलं आहे की, पलिष्टी लोकांनी सोखो आणि अजेका या शहरांच्या मध्ये असलेल्या जागी तळ ठोकला होता. इस्राएली सैन्याने खोऱ्याच्या विरुद्ध दिशेला डोंगराच्या उतारावर तळ ठोकला होता. या जागा खऱ्या आहेत का?

या परिसराला भेट देणाऱ्या एका पर्यटकाने काय म्हटलं त्याकडे लक्ष द्या: “आमचा टूर गाईड धार्मिक व्यक्ती नव्हता. तो आम्हाला एलाच्या खोऱ्यात घेऊन गेला. आम्ही एका डोंगराच्या माथ्यावर गेलो जिथून आम्हाला संपूर्ण खोरे किंवा दरी दिसत होती. आम्ही त्या दरीकडे पाहात असताना, त्या टूर गाईडने आम्हाला १ शमुवेल १७:१-३ ही वचनं वाचायला सांगितली. त्यानंतर त्या दरीकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘तुमच्या डावीकडे सोखो शहराचे अवशेष आहेत,’ मग तो वळून म्हणाला, ‘त्या तिकडे, उजवीकडे, अजेका शहराचे अवशेष आहेत. पलिष्टी लोकांनी या दोन शहरांच्या मध्ये येऊन तळ ठोकला, म्हणजे समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी. याचा अर्थ, आपण जिथं उभे आहोत तिथं इस्राएली सैन्याचा तळ होता.’ मी जिथं उभा होतो तिथंच शौल आणि दावीद असतील असा विचार त्या वेळी माझ्या मनात आला. मग आम्ही त्या दरीत उतरलो आणि तिथं आम्हाला एक दगडांनी, भरलेली सुकलेली नदी पार करावी लागली. लगेच माझ्या डोळ्यासमोर, दावीद पाच गुळगुळीत दगड उचलण्यासाठी खाली वाकत असल्याचं चित्र उभं राहिलं. त्यातील एका दगडानेच गल्याथ मारला गेला होता.” या पर्यटकासारखेच अनेक पर्यटक, बायबलमधील दिलेल्या अचूक आणि खऱ्या अहवालाने थक्क होतात.

हा ऐतिहासिक अहवाल खरा आहे यावर संशय घेण्याचं कोणतंच कारण उरत नाही. त्यात खऱ्या लोकांचा आणि खऱ्या ठिकाणांचा समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अहवाल देवाच्या प्रेरित वचनाचा भाग आहे. म्हणजेच, तो अशा देवाकडून आहे जो “कधीही असत्य बोलत नाही.”—तीत १:२, सुबोधभाषांतर; २ तीमथ्य ३:१६. (wp16-E No. 5)