व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उत्क्रांती की निर्मिती?

सहारा वाळवंटातल्या चंदेरी मुंगीची उष्णता प्रतिरोधक ढाल

सहारा वाळवंटातल्या चंदेरी मुंगीची उष्णता प्रतिरोधक ढाल

वाळवंटातली चंदेरी मुंगी (कॅटाग्लायफिस बॉम्बीसिना) उष्णतेचा सर्वात जास्त प्रतिकार करू शकणाऱ्या जमिनीवरच्या प्राण्यांमधली एक आहे. सहारा वाळवंटात जेव्हा दुपारी खूप कडक ऊन असतं, तेव्हा या मुंगीची शिकार करणारे प्राणी सावली शोधतात. तेव्हाच ही मुंगी आपलं खाणं म्हणजे, प्रचंड उष्णतेमुळे मेलेले किडे शोधण्यासाठी आपल्या वारूळातून थोड्या वेळासाठी बाहेर पडते.

[५०] μm

यावर विचार करा: या मुंगीच्या अंगावर उष्णतेपासून बचाव करणारे विशिष्ट प्रकारचे केस असतात. या केसांमुळे (१, २), या मुंगीला चंदेरी रंगाची चकाकी येते. हे केस त्रिकोणी आकाराच्या ट्युबसारखे असतात (३). या त्रिकोणी केसांच्या, वरच्या दोन भागांना अतिसूक्ष्म घड्या असतात आणि जो खालचा तिसरा भाग असतो तो सपाट असतो. या रचनेचे दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे, हे केस सूर्याची न दिसणारी किरणं परावर्तित करतात. दुसरा फायदा म्हणजे, शरीराची वाढलेली उष्णता कमी करायला मुंग्यांना मदत होते. तसंच त्यांच्या अंगाच्या खालचा केस नसलेला भाग वाळवंटातल्या जमिनीतली उष्णता परावर्तित करतो. *

[१०] μm

सहारा वाळवंटातली चंदेरी मुंगी, ५३.६ डिग्री सेंटीग्रेड पर्यंत उष्णता सहन करू शकते. तिच्या या उष्णता प्रतिरोधक ढालीमुळे, ती आपल्या शरीराचं तापमान ५३.६ डिग्री सेंटीग्रेड खाली ठेवू शकते. या छोट्या जीवाच्या रचनेने प्रेरीत होऊन, संशोधन करणारे इमारतींसाठी खास पेंट्‌स तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पेंट्‌समुळे पंख्यांचा किंवा इतर उपकरणांचा वापर न करतादेखील इमारती थंड राहू शकतील.

तुम्हाला काय वाटतं? सहारा वाळवंटातल्या चंदेरी मुंगीची उष्णता प्रतिरोधक ढाल उत्क्रांतीमुळे आली? की तिची रचना करण्यात आली?

^ परि. 4 या मुंगीच्या शरीराची इतरही वैशिष्ट्ये आहेत, जसं की, तिच्या शरीरात अशी खास प्रोटीन्स आहेत, ज्यांचं तीव्र उष्णतेतदेखील अमायनो अॅसिड्‌स मध्ये रूपांतर होत नाही. तिच्या लांब पायांमुळे तिच्या शरीराचा गरम वाळू पासून बचाव होतो आणि यामुळे ती वेगानेही पळू शकते. दिशा शोधण्याच्या उत्कृष्ठ शक्तीमुळे, ती आपल्या वारूळाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग शोधू शकते.