व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पृथ्वीवरील सर्वात उपयुक्‍त असे एक कवच-फळ

पृथ्वीवरील सर्वात उपयुक्‍त असे एक कवच-फळ

पृथ्वीवरील सर्वात उपयुक्‍त असे एक कवच-फळ

सबंध जगभरात एक विलक्षण “कवच-फळ” मिळते. या फळातून खाद्य आणि पेय दोन्ही मिळते. या फळाच्या झाडाची अनोखी रूपरेषा उष्णकटिबंधीय द्वीपांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्या कवच-फळाची येथे चर्चा होत आहे? पृथ्वीवरील सर्वात उपयुक्‍त असलेल्या एका कवच-फळाची—नारळाची. *

उष्णकटिबंधात राहत नसलेल्या लोकांना नारळाचे झाड पाहून उष्णकटिबंधातल्या देशांमधील सुटीची आठवण होत असेल. पण, उष्णकटिबंधात राहणाऱ्‍या लोकांसाठी हे बहुमोलाचे फळ आहे. इंडोनेशियन लोकांमध्ये असे म्हटले जाते की, “वर्षाचे जेवढे दिवस आहेत तेवढे नारळाच्या झाडाचे व फळांचे उपयोग” आहेत. फिलिपाईन्समध्ये असे म्हटले जाते: “नारळाचे रोप लावणाऱ्‍या व्यक्‍तीला भांडी आणि कपडालत्ता, अन्‍न-पाणी, घर आणि मुलांकरता वारसा मिळतो.”

ही म्हण अतिशयोक्‍ती नाही. नारळ—जीवनाचे वृक्ष (इंग्रजी) या पुस्तकात म्हटल्यानुसार, नारळाच्या झाडापासून “केवळ अन्‍नपदार्थ, पाणी आणि स्वयंपाकासाठी तेलच मिळत नाही तर त्याच्या पानांचा छतासाठी उपयोग केला जाऊ शकतो, चोड्यांपासून सुतळ्या आणि चटया बनवता येतात, करवंटीपासून भांडी आणि अलंकार बनवता येतात आणि फुलोऱ्‍यातून काढलेल्या गोड रसापासून साखर आणि मद्य तयार करता येते.” पुस्तकात पुढे म्हटले आहे: “योग्य तऱ्‍हेने कापल्यावर खोडाचा देखील उपयोग करता येतो.” हिंदी महासागरातील मालदीव बेटावरील रहिवाशांनी नारळाच्या उत्पादनातून बोटी बांधल्या आणि असे म्हटले जाते की, या बोटींतून त्यांनी अरेबिया आणि फिलिपाईन्सपर्यंत प्रवास केला. पण नारळाच्या उत्पादकांपेक्षा खुद्द नारळानेच सर्वाधिक समुद्रप्रवास केला आहे.

समुद्रप्रवास करणारे बीज

भरपूर प्रमाणात पाऊस असल्यास बहुतेक उष्णकटिबंधातील किनारपट्टींवर नारळाच्या झाडांचा प्रसार होतो. स्थानीय लोक या बहुउपयोगी झाडाचे रोपण करत असले तरी नारळाने कोणाच्याही मदतीवना पृथ्वीवरील सर्वात दूरच्या ठिकाणी प्रवास केला आहे. बिया वेगवेगळ्या पद्धतींनी विखुरल्या जातात परंतु नारळाने सागराचा उपयोग केला आहे. आणि म्हणून त्याने जगप्रवास केला आहे.

नारळ पिकल्यावर खाली पडतो. काही वेळा, हे पिकलेले फळ किनारपट्टीवरून गडगडत पाण्यात जाते. भरतीच्या वेळी तो समुद्रात नेला जातो. नारळाच्या तंतूमय बाह्‍यकवचात बरीच हवा अडवली जात असल्यामुळे तो पाण्यावरच तरंगतो. कंकण-द्वीपावर नारळ असला तर तो खाजणाच्या केवळ दुसऱ्‍या बाजूला वाहून जाईल. पण जर तो मोकळ्या समुद्रात गेला तर दूरदूर जाऊ शकतो.

खाऱ्‍या पाण्यात सहसा बहुतेक इतर बिया नष्ट होतात, पण नारळाच्या जाडसर बाह्‍यकवचातून पाणी आत शिरायला पुष्कळ वेळ लागतो. समुद्रामध्ये नारळ तीन महिन्यांपर्यंत सहजासहजी टिकू शकतो—काही वेळा तो कित्येक हजारो किलोमीटर दूरवर वाहून जातो—आणि तरीही योग्य किनारपट्टीवर पोहोंचल्यावर त्याचे रोप तयार होऊ शकते. कदाचित अशाच प्रकारे जगातील उष्णकटिबंधातील किनारपट्टींवर नारळाचा प्रसार झाला असावा.

उष्णकटिबंधाचा स्वाद

उष्णकटिबंधात नसलेल्या ठिकाणी, नारळ म्हटले की, लोकांना केवळ मिठाईंमध्ये किंवा कुकीजमध्ये घातलेला नारळाचा स्वाद आठवतो. पण आग्नेय आशियात गेल्यावर नारळ एक बहुउपयोगी कवचफळ असल्याचे तुम्हाला दिसून येईल. पॅसिफिक ॲण्ड साऊथइस्ट एशियन कुकींग या पुस्तकानुसार, “हवाईपासून बँकॉकपर्यंतच्या सर्व देशांमध्ये, प्रदेशांमध्ये आणि द्वीपांमध्ये नारळाचा स्वयंपाकासाठी प्रामुख्याने वापर केला जातो.” त्या पुस्तकात असेही म्हटले आहे की, त्या ठिकाणांतील रहिवाशांकरता, ‘नारळ हा जीवनातील आवश्‍यक गोष्टींपैकी एक असून त्याने विविध मार्गांनी आणि असंख्य पक्वान्‍नांद्वारे व चवींद्वारे पोषण मिळते.’

नारळाला उष्णकटिबंधातील स्वयंपाकघरांमध्ये इतके महत्त्व का आहे त्याचे कारण सोपे आहे: त्यातून पाणी, दूध आणि गोडे तेल मिळते. शहाळ्यात असलेल्या पारदर्शक, गोड पाण्याला नारळाचे पाणी किंवा नारळाचा रस म्हणतात. हे पेय चवीला उत्तम आणि तजेला देणारे असते आणि उष्णकटिबंधातील देशांमध्ये ते रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये विकले जाते. वाटलेल्या नारळात थोडे पाणी घालून ते पिळून काढल्यास नारळाचे दूध मिळवता येते. नारळाचे दूध सूप, सॉस आणि कणकेत घातल्यावर चांगला स्वाद येतो आणि चव येते.

नारळांतून तेल काढण्यासाठी, पिकलेले फळ फोडून ते उन्हात सुकवले जाते. सुकल्यावर त्यातला गर, किंवा खोबरे, करवंटीपासून वेगळे करता येते आणि मग त्यातून तेल काढता येते. उष्णकटिबंधात नारळाचे तेल स्वयंपाकासाठी प्रामुख्याने वापरले जाते परंतु पाश्‍चिमात्य देशांमध्ये ते सहसा मार्गारीन, आईस्क्रीम आणि कुकीज यांमध्ये घातले जाते.

नारळाची फळे काढणे हे सोपे काम नाही. सहसा, मजूर झाडावर चढून फळांची पेड विळ्याने तोडतात. इतरजण, एका लांब दांड्याला कोयता बांधून त्याने पेड कापतात. इंडोनेशियात माकडांना शिकवून नारळाचे पाडप करवतात. ज्यांना पिकलेले फळ हवे असते त्यांच्याकरता सर्वात सोपी पद्धत म्हणजे नारळ आपोआप जमिनीवर पडेपर्यंत थांबून राहणे.

नारळाची पाडप कशीही केली जात असली तरी एक गोष्ट मात्र नक्की की नारळाच्या बहुउपयोगी गुणांमुळे त्याचे पीक किफायतशीर तर आहेच शिवाय पुष्कळांसाठी ते महत्त्वाचे अन्‍न देखील आहे. त्यामुळे, तुम्हाला कधी नारळीचे झाड दिसले—मग ते एखाद्या चित्रात असो नाहीतर खरोखरचे असो—तर एवढे लक्षात ठेवा की, ते केवळ किनारपट्टींची शोभा वाढवणारे झाड नाही. तर तुम्ही पाहत असलेले झाड, पृथ्वीतलावरील उपयोगी “कवच-फळ” देणाऱ्‍या झाडांपैकी एक आहे. (g०३ ३/२२)

[तळटीप]

^ काही देशांमध्ये नारळाला कवच-फळ समजले जात नसले तरी पुष्कळ सूत्रांनुसार या फळाच्या बिजाला कवच-फळ असेच संबोधले जाते.

[२४ पानांवरील चौकट/चित्रे]

नारळाची नवलाई

नारळी खेकडा नारळाच्या फळाचा स्वाद केवळ मानवच घेत नाहीत. नारळी खेकडा, दिवसा जमिनीतील छिद्रात राहतो पण रात्रीच्या वेळी नारळे खातो. मानवांना नारळ फोडण्यासाठी कोयता लागतो पण पर्याप्त साधने असलेला हा खेकडा नारळ फुटेपर्यंत त्यास खडकावर आपटतो. नारळावरही गुजराण करणाऱ्‍या या प्राण्याला नारळाचा आहार पोषक ठरत असवा असे दिसते कारण तो ३० हून अधिक वर्षे जगू शकतो!

सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळ त्वचेकरता नारळाचे तेल फार उपयुक्‍त असल्यामुळे लिपस्टिक आणि उन्हापासून संरक्षण देणाऱ्‍या लोशन्समध्येही उत्पादक नारळाचा वापर करतात. शिवाय, नैसर्गिकरित्या अपघटनक्षम आणि भरपूर फेस निर्माण करणाऱ्‍या साबणाचा किंवा शाम्पूचा तुम्ही वापर करत असला तर नारळाचे तेल हे त्यातले मुख्य घटक असू शकते.

[चित्रे]

नारळ समुद्रप्रवासात टिकून राहू शकतो

नारळी खेकडा

नारळीचे झाड

[चित्राचे श्रेय]

Godo-Foto

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

वरील उजवीकडील चौकोन: Godo-Foto