व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टीनएजर्सना प्रौढ होण्यास मदत करणे

टीनएजर्सना प्रौढ होण्यास मदत करणे

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

टीनएजर्सना प्रौढ होण्यास मदत करणे

“पूर्वी मला माझ्या मुलांबरोबर बोलायला चांगलं वाटायचं. माझं बोलणं ते लक्ष देऊन ऐकायचे, त्यानुसार वागायचे. पण आता ते टीनएजर्स झाले आहेत व ते माझ्याबरोबर जवळजवळ सगळ्याच बाबतीत हुज्जत घालत राहतात. मिटींग-प्रिचींग म्हटलं, की त्यांना नको वाटतं. उलट, मलाच म्हणतात: ‘सारखं सारखं काय बायबलविषयी बोलायचं.’ मी दुसऱ्‍या मुलांना बदलताना पाहिलं होतं, पण माझी मुलंसुद्धा मोठी झाल्यावर अशी वागू लागतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.”—रेजी. *

तुमच्याही घरात टीनएजर आहेत का? मग तुम्ही तुमच्या मुलाच्या वाढीतला हा सर्वात लक्षवेधक टप्पा पाहत आहात. पण हा अनुभव तुमच्या धीराची परीक्षा पाहणारा देखील ठरू शकतो. खाली उल्लेखण्यात आलेले प्रसंग तुमच्याही घरात घडत आहेत का?

तुमचा मुलगा लहान होता तेव्हा तो तुम्हालाच चिकटून राहायचा. पण टीनएजर झाल्यापासून त्याला आता तुम्ही नकोय, स्वातंत्र्य हवे आहे.

तुमची मुलगी लहान होती तेव्हा ती तुम्हाला सर्व सांगायची. पण टीनएजर झाल्यापासून तिने तिच्या मैत्रिणींचा एक वेगळाच ‘ग्रूप’ सुरू केलाय. तिला मैत्रिणी मिळाल्यामुळे तिला आता तुमची गरज नाही, असे तुम्हाला वाटते.

तुमच्याही घरात काहीसे असेच घडत असेल तर, तुमचे मूल अगदीच कामातून गेलेले बंडखोर मूल बनत चालले आहे असा लगेच शिक्का मारू नका. पण मग ते असे का वागत आहे? या प्रश्‍नाचे उत्तर मिळण्याकरता आपण तुमच्या मुलाच्या वाढीतला सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली पौगंडावस्था याबद्दल चर्चा करू या.

पौगंडावस्था—वाढीतला महत्त्वाचा टप्पा

बाळाच्या जन्मापासून त्याच्या जीवनात सर्व गोष्टी पहिल्यांदाच होत असतात—त्याने टाकलेले पहिले पाऊल, उच्चारलेला पहिला शब्द, शाळेतला त्याचा पहिला दिवस, वगैरे वगैरे. आपले मूल जेव्हा एखादी गोष्ट साध्य करते तेव्हा पालकांना अतिशय आनंद होतो. यावरून हेच सिद्ध होते, की त्यांच्या मुलांची वाढ होत आहे. हेच पाहण्यास ते अगदी आतुर असतात.

पौगंडावस्था देखील तुमच्या मुलाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण अनेक पालकांना, आपली मुले वयात आलेली पाहून आनंद होण्याऐवजी काळजीच जास्त वाटू लागते. आपल्या आज्ञेत राहणारे मूल अचानक चंचल बनते हे पाहून पालकांना काळजी का वाटते ते समजण्याजोगे आहे. तरीपण, पौगंडावस्था हा त्याच्या वाढीतला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कोणत्या अर्थी?

बायबलमध्ये म्हटले आहे, की काही काळानंतर ‘पुरुष आपल्या आईबापास सोडेल.’ (उत्पत्ति २:२४) पौगंडावस्थेत आलेल्या तुमच्या मुलाला अथवा मुलीला तुम्हाला याच महत्त्वाच्या कार्यास तयार होण्यासाठी मदत करायची आहे. घरटे सोडण्यास तयार असलेल्या तुमच्या पाखरांचे पंख तुम्हाला बळकट करायचे आहेत. त्या वेळी तुमचे मूल प्रेषित पौलाप्रमाणे असे म्हणू शकेल: “मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.”—१ करिंथकर १३:११.

पौगंडावस्थेत असलेले तुमचे मूल, बालपणाच्या गोष्टी सोडून घरट्यातून बाहेर पडण्याकरता स्वावलंबी व प्रौढ असलेला जबाबदार तरुण बनण्यास शिकत आहे. एका संदर्भ ग्रंथात याचे अतिशय भावस्पर्शी वर्णन करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे, की पौगंडावस्थेचा काळ, हा मुले आपल्या आईवडिलांचा निरोप घेण्याची तयारी करत असल्याचा काळ असतो.

तुमचा “लहान” मुलगा किंवा मुलगी स्वावलंबी बनू पाहतेय हा विचार तुम्हाला आता जरा विचित्र वाटेल. तुम्ही म्हणाल:

“माझा मुलगा घरातील लहानसहान कामच व्यवस्थित करू शकत नाही, मग स्वतःचं घर तो कसं सांभाळेल?”

“माझी मुलगी ठरलेल्या वेळेत कधी घरी येत नाही, मग ती कामाला वेळेवर कशी जाईल?”

तुमच्या मनात या चिंता असतील तर हे आठवणीत ठेवा: स्वातंत्र्य म्हणजे एक दार नाही ज्यातून तुमचे मूल सरळ चालत जाते, तर तो एक मार्ग आहे ज्यावरून तुमच्या मुलाला अथवा मुलीला जीवनप्रवास करायचा आहे आणि हा प्रवास पूर्ण व्हायला खूप वर्ष लागतात. पण सध्या, तुमच्या मुलाच्या अथवा मुलीच्या ‘हृदयात मूर्खता जखडलेली आहे,’ हे कदाचित तुम्हाला दिसत असेल.—नीतिसूत्रे २२:१५.

पौगंडावस्थेत असलेल्या तुमच्या मुलांना तुम्ही योग्य मार्गदर्शन दिल्यास ते जबाबदार प्रौढ बनू शकतात आणि त्यांच्या ‘ज्ञानेंद्रियांना चांगले आणि वाईट समजण्याचा सराव’ होऊ शकतो.—इब्री लोकांस ५:१४.

यशाच्या गुरुकिल्ल्या

आपल्या टीनएजरला प्रौढ बनण्यास मदत करताना तुम्ही त्याला त्याची ‘ज्ञानेंद्रिय’ विकसित करण्यास मदत करू शकता जेणेकरून तो स्वतःहून योग्य निर्णय घेऊ शकेल. * (इब्री लोकांस ५:१४) पुढे उल्लेखीत बायबल तत्त्वे तुम्हाला असे करण्यास मदत करतील.

फिलिप्पैकर ४:५, NW: “तुमचा समंजसपणा सर्वांना कळून येवो.” टीनएजर असलेला तुमचा मुलगा तुम्हाला विनंती करतो, कदाचित त्याला जरा उशिराने घरी यायची परवानगी हवी आहे. तुम्ही लगेच त्याला नकार देता. तुमचा मुलगा कुरकुरीच्या स्वरात म्हणतो: “तुम्ही मला अजूनही लहान समजताय!” यावर, “हो, तू लहान मुलासारखाच वागतोयस,” असे बोलण्याआधी पुढील गोष्टीचा विचार करा: टीनएजर्सना सहसा जरा जास्त मोकळीक हवी असते जिचा वापर ते योग्य रीतीने करू शकत नाहीत, पण पालक मोकळीक देताना जरा कंजुषी करतील. मग अधूनमधून तुम्ही आपल्या टीनएजरला जराशी मोकळीक देऊ शकाल का? तो अशी मागणी का करत आहे, हे तुम्ही निदान समजून तरी घेऊ शकता का?

हे करून पाहा: तुमच्या टीनएजरला तुम्ही मोकळीक देऊ शकता असे एक अथवा दोन मुद्दे एका कागदावर लिहा. आणि मग त्याला समजावून सांगा, की तुम्ही त्याला ही तात्पुरती मोकळीक देऊन पाहणार आहात. तो जर व्यवस्थित वागला तर पुढे त्याला आणखी मोकळीक किंवा स्वातंत्र्य दिले जाईल. पण जर तो व्यवस्थित वागला नाही तर त्याला ही मोकळीक दिली जाणार नाही.—मत्तय २५:२१.

कलस्सैकर ३:२१: “वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांवर इतके रागावू नका की त्यामुळे ती निरुत्साहित होतील व प्रयत्न करणार नाहीत.”—सुबोध भाषांतर. काही पालक आपल्या टीनएज मुलांवर करडी नजर ठेवतात. तो कोणाबरोबर असतो, काय करतो यावर ते अगदी बारीक लक्ष ठेवतात. ते सांगतील त्याच्याबरोबर त्याने मैत्री करावी, असे त्यांना वाटते. त्याचे फोन ते चोरून चोरून ऐकत राहतात. पण असे केल्याने उलट परिणाम होऊ शकतात. तुम्ही जितके तुमच्या मुलाला दाबून ठेवायचा प्रयत्न कराल तितकीच त्याच्या मनात तुमच्यापासून सुटका मिळण्याची इच्छा उफाळून बाहेर येण्याची शक्यता आहे. तुम्ही सतत त्याच्या मित्रांची नालस्ती करत राहिलात तर त्याला ते आणखीच जवळचे वाटू लागतील. तुम्ही जर चोरून त्याचे फोनवरचे बोलणे ऐकत राहिलात तर तो आपल्या मित्रांशी चोरून बोलण्याचे नवीन मार्ग शोधत राहील. तुम्ही त्याच्यावर जितका ताबा मिळवायचा प्रयत्न कराल तितका तो तुमच्या हातून सुटत जाईल. होय, घरी असतानाच जर तुमचा टीनएज मुलगा निर्णय घ्यायला शिकला नाही तर घर सोडल्यावर त्याला ते जमेल का?

हे करून पाहा: तुमच्या टीनएजरशी एखाद्या समस्येबाबत तुम्ही पुढच्या वेळी बोलाल तेव्हा त्याच्या निर्णयांचा त्याच्यावर कोणता परिणाम होतो यावर तर्क करायला त्याला मदत करा. उदाहरणार्थ, त्याच्या मित्रांची सतत नालस्ती करण्याऐवजी असे म्हणा: “रोहितला जर नियम तोडल्याबद्दल अटक झाली तर तुला कसं वाटेल? लोक तुझ्याविषयी काय विचार करतील?” त्याने घेतलेल्या निर्णयांमुळे तो एकतर चांगले नाव कमावू शकतो किंवा ते मातीत मिळवू शकतो, हे समजायला त्याला मदत करा.—नीतिसूत्रे ११:१७, २२; २०:११.

इफिसकर ६:४: “तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” मूळ भाषेत, ‘शिक्षण’ या शब्दात, फक्‍त वस्तुस्थितींची माहिती देणे इतकाच अर्थ समाविष्ट नव्हता तर त्यात मन वळवण्याची प्रक्रिया हा अर्थ देखील समाविष्ट होता. म्हणजे, पालकांना आपल्या मुलाच्या नैतिक विचारांवर प्रभाव पाडायचा होता जेणेकरून ते योग्य कार्य करण्यास प्रवृत्त होईल. तुमचे मूल टीनएजर बनते तेव्हा असे करणे अधिक महत्त्वाचे आहे. ॲन्ड्रे नावाचा एक पिता म्हणतो: “तुमची मुले जसजशी मोठी होतात तसतसे, तुमच्या बोलण्यात, त्यांच्याबरोबर तर्क करण्यात तुम्हाला फेरबदल करावे लागतील.”—२ तीमथ्य ३:१४.

हे करून पाहा: तुम्हाला एखादी समस्या हाताळावी लागते तेव्हा, भूमिकांची अदलाबदल करा म्हणजे, तुम्ही मूल व्हा आणि तुमच्या मुलाला पालक होऊ द्या. तुमच्या टीनएजरला विचारा, की जर तुम्ही त्याचे मूल असता तर त्याने ही समस्या कशा प्रकारे सोडवली असती. तो ज्या प्रकारे विचार करतो त्याला दुजोरा देण्याकरता किंवा असहमती दर्शवण्याकरता कारणे देता यावीत म्हणून त्याला याबाबतीत आणखी संशोधन करायला सांगा. आणि मग आठवड्यात कधीही पुन्हा एकदा त्या विषयावर चर्चा करा.

गलतीकर ६:७: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” शिक्षा देऊनही तुम्ही तुमच्या टीनएजरला एखादी गोष्ट शिकवू शकता जसे की त्याच्या आवडीची एखादी गोष्ट त्याला करू न देणे किंवा आज बिलकुल बाहेर जायचं नाही, असे त्याला सांगणे. त्याच्या वागण्याचे परिणाम काय होऊ शकतात यावर तुम्ही त्याच्याशी बोलू शकता.—नीतिसूत्रे ६:२७.

हे करून पाहा: त्याची उधारी फेडून त्याला वाचवायचा प्रयत्न करू नका किंवा शाळेत मार्क कमी का पडले याबद्दल शिक्षकांशी बोलताना त्याच्यावतीने तुम्ही सबबी सांगू नका. तुमच्या टीनएजरला त्याच्या वागण्याचे परिणाम भोगू द्या. यांतून तो जो धडा शिकेल तो कायम त्याच्या लक्षात राहील.

तुम्ही पालक असल्यामुळे तुम्हाला वाटेल, की तुमच्या टीनएजरने पौगंडावस्थेतून अगदी सहजपणे प्रौढावस्थेत पोहचावे. असे फार क्वचित होते. पण तुमच्या मुलाच्या पौगंडावस्थेमुळे तुम्हाला ‘मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला देण्याची’ सुरेख संधी मिळते. (नीतिसूत्रे २२:६) बायबल तत्त्वांनुसार तुम्ही आपल्या मुलांना वाढवले तर तुमच्या कुटुंबाचा पाया मजबूत होईल आणि तुम्ही सर्व आनंदित व्हाल. (w०९ ५/१)

[तळटीपा]

^ नाव बदलण्यात आले आहे.

^ या लेखात आम्ही मुलाचा उल्लेख केलेला असला तरी, यात चर्चा करण्यात आलेली तत्त्वे मुलीला देखील लागू होतात.

स्वतःला विचारा . . .

माझे पिल्लू घरटे सोडून उडून जायला तयार असेल तेव्हा ते पुढील गोष्टी करू शकेल का?

▪ आध्यात्मिक गोष्टी नियमाने करेल का?

▪ चांगले व योग्य निर्णय घेईल का?

▪ इतरांबरोबर प्रभावीपणे संवाद साधू शकेल का?

▪ स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकेल का?

▪ स्वतःचे आर्थिक व्यवहार सांभाळू शकेल का?

▪ स्वतःचे घर स्वच्छ ठेवून त्याची देखभाल करू शकेल का?

▪ स्वयंप्रेरित बनेल का?

[१२ पानांवरील चित्र]

तुमच्या टीनएज मुलाच्या अथवा मुलीच्या वागणुकीत जबाबदारपणा दिसून आला तर तुम्ही त्याला अधिक मोकळीक देऊ शकाल का?