व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या जीवनावरील देवदूतांच्या प्रभावाविषयी

आपल्या जीवनावरील देवदूतांच्या प्रभावाविषयी

येशू काय शिकवतो

आपल्या जीवनावरील देवदूतांच्या प्रभावाविषयी

‘जग होण्यापूर्वीपासूनच’ येशू आपल्या पित्याबरोबर स्वर्गात राहत होता. (योहान १७:५) त्यामुळे पुढील प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देण्यास तोच पात्र आहे.

देवदूतांना आपल्यामध्ये रस आहे का?

▪ येशूने जे सांगितले त्यावरून आपल्याला कळते, की देवदूतांना लोकांमध्ये खूप आस्था आहे. येशूने असे म्हटले: “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो.”—लूक १५:१०.

देवाच्या सेवकांना देवाबरोबरचा त्यांचा नातेसंबंध मजबूत ठेवण्यास मदत करण्याची जबाबदारी देवदूतांवर सोपवण्यात आली आहे, असे येशूने सांगितले. त्यामुळे, तुम्ही इतरांसाठी अडखळण बनू नका, असे जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना सांगितले तेव्हा तो त्यांना म्हणाला: “संभाळा, ह्‍या लहानातील एकालाहि तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हास सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.” (मत्तय १८:१०) येशूच्या या बोलण्याचा अर्थ असा होत नाही, की त्याच्या प्रत्येक अनुयायासाठी एक रक्षक देवदूत असतो. त्याला असे म्हणायचे होते, की देवाबरोबर स्वर्गात असलेले देवदूत, प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनामध्ये आस्था किंवा रस घेतात.

सैतान आपली हानी कशी करू शकतो?

▪ सैतान लोकांना देवाबद्दलचे सत्य शिकण्यापासून खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतो, असा इशारा येशूने आपल्या अनुयायांना दिला. त्याने म्हटले: “कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो.”—मत्तय १३:१९.

लोकांना फसवण्याचा सैतानाचा एक मार्ग कोणता आहे ते येशूने एका दाखल्याद्वारे उघड करून सांगितले. शेतात गहू पेरणाऱ्‍या माणसाचा दाखला येशूने दिला. दाखल्यातला मनुष्य येशूला चित्रित करतो आणि गहू हे, स्वर्गात येशूबरोबर राज्य करणाऱ्‍या खऱ्‍या ख्रिश्‍चनांना चित्रित करतात. पण, त्या मनुष्याचा “वैरी येऊन गव्हामध्ये निदण पेरून” जातो. निदण खोट्या ख्रिश्‍चनांना चित्रित करते. निदण “पेरणारा वैरी हा सैतान आहे.” (मत्तय १३:२५, ३९) निदण आणि गहू एकत्र उगवल्यावर जसे दोघांचे अंकुर सारखेच दिसतात त्याच प्रकारे, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारे लोक, खऱ्‍या उपासकांप्रमाणेच भासू शकतात. खोटे सिद्धान्त शिकवणारे धर्म, लोकांना देवाच्या आज्ञा मोडण्यास लावून त्यांची फसवणूक करतात. लोकांना यहोवापासून दूर नेण्याकरता सैतान खोट्या धर्माचा उपयोग करतो.

आपली हानी करण्यापासून आपण सैतानाला कसे रोखू शकतो?

▪ येशूने सैतानाला “जगाचा अधिकारी” म्हटले. (योहान १४:३०) आपण सैतानापासून संरक्षण कसे मिळवू शकतो, हे येशूने देवाला प्रार्थना करताना व्यक्‍त केले. आपल्या शिष्यांना सैतानापासून वाचवण्याची प्रार्थना करताना येशूने आपल्या स्वर्गीय पित्याला अशी विनवणी केली: “तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.” (योहान १७:१५-१७) आपण जर देवाच्या वचनातील ज्ञान घेतले तर, सैतान राज्य करत असलेल्या या जगातील लोकांचा आपल्यावर वाईट प्रभाव पडणार नाही.

देवदूतांचा आपल्यावर आज कसा प्रभाव पडतो?

▪ येशूने म्हटले: “युगाच्या समाप्तीस . . . देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील.” (मत्तय १३:४९) आता आपण ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात जगत आहोत. लाखो लोक देवाच्या राज्याची आनंदाची बातमी ऐकून तिला प्रतिसाद देत आहेत.—मत्तय २४:३, १४.

पण देवाच्या वचनाचा अभ्यास सुरू करणाऱ्‍या सर्वांनाच त्याची संमती मिळते असे नाही. यहोवाचे सेवक करत असलेल्या कार्याला देवदूत मार्गदर्शन देतात. देवावर अगदी मनापासून प्रेम करणाऱ्‍या लोकांना, जे लोक शिकत असलेल्या गोष्टी आपल्या जीवनात लागू करत नाहीत त्यांच्यापासून वेगळे केले जाते. ज्यांना देवाची संमत्ती मिळते त्यांच्याविषयी येशूने म्हटले: “चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.”—लूक ८:१५. (w१०-E ११/०१)

अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा अध्याय १० पाहा.

[२४ पानांवरील चित्र]

सत्य शोधणाऱ्‍या प्रामाणिक मनाच्या लोकांना एकत्र करण्यात देवदूतांचा सहभाग आहे