व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलने बदलले जीवन!

“माझं वागणं निर्दयी होतं”

“माझं वागणं निर्दयी होतं”
  • जन्म: १९६०

  • देश: फिनलंड

  • माझा गतकाळ: हेवी-मेटल संगीतकार

माझी पूर्व जीवनशैली:

तुर्कूच्या बंदराजवळील शहरात असणाऱ्‍या मध्यमवर्गीय लोकांच्या वस्तीत मी लहानाचा मोठा झालो. माझे वडील बॉक्सिंग चॅम्पियन होते आणि मला व माझ्या धाकट्या भावालाही बॉक्सिंग करायला खूप आवडायचं. माझ्या शाळेत मी नेहमी एका गुंडाप्रमाणे मुलांबरोबर भांडायला तयारच असायचो. किशोरवयात मी एका कुविख्यात टोळीत सहभागी झालो ज्यामुळे मी आणखी हिंसक कृत्यं करू लागलो. त्याचदरम्यान मला समजलं की हेवी-मेटल संगीत काय असतं आणि मी एक रॉक स्टार बनण्याचं स्वप्न बघू लागलो.

मी काही ड्रम विकत घेतले, माझा स्वतःचा एक बँड तयार केला आणि त्या बँडचा मीच गायक झालो. मी स्टेजवर अगदी बेधुंद व्हायचो. आमच्या बँडमधले सर्व जण तगडे असल्यामुळे आणि आमचे कपडेसुद्धा हटके असल्यामुळे हळूहळू लोकांना आम्ही आवडू लागलो होतो. आमचे मोठे कार्यक्रम होऊ लागले. आम्ही काही गाण्यांचं रेकॉर्डिंग केलं आणि त्याचं शेवटलं रेकॉर्डिंग चांगलंच गाजलं. १९८० सालच्या दरम्यान आमचा बँड लोकप्रिय व्हावा म्हणून आम्ही अमेरिकेचा दौरा केला. आम्ही न्यूयॉर्क आणि लॉस अँजिलीस या ठिकाणी काही कार्यक्रम केले आणि फिनलंडला परतण्याआधी तेथील संगीत क्षेत्रातील काही महारथींबरोबर ओळख करून घेतली.

तसं तर मी बँडमध्ये खूश होतो पण मनाच्या कोपऱ्‍यात कधीतरी असं वाटायचं की माझ्या जीवनाला काही अर्थ नाही. संगीत क्षेत्रातील स्पर्धात्मक वृत्ती पाहून मी निराश होऊ लागलो. माझ्या स्वतःच्या बेपर्वा जीवनशैलीचासुद्धा मला राग येऊ लागला. मी खूप वाईट आहे असं मला वाटायचं आणि नरकात यातना दिल्या जातील या भीतीनं माझ्या पोटात गोळा यायचा. माझ्या मनातील प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यासाठी मी सगळी धार्मिक पुस्तकं चाळू लागलो. मी देवाला कधीच खूश करू शकत नाही असं मला वाटत असलं तरीसुद्धा मी त्याला कळकळीनं प्रार्थना करायचो.

बायबलनं माझं जीवन कसं बदललं:

माझ्या पोटापाण्यासाठी मी पोस्टात काम करू लागलो. एके दिवशी मला समजलं की माझ्यासोबत काम करणारा एक जण यहोवाचा साक्षीदार आहे. मी त्याच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यानं शास्त्रवचनांच्या आधारे आणि तर्काला पटणारी उत्तरं दिल्यामुळे मी खूप प्रभावित झालो आणि लगेच त्याच्याबरोबर बायबलचा अभ्यास करण्यास तयार झालो. बायबल अभ्यास सुरू झाल्याच्या काही आठवड्यांनंतरच, माझ्या बँडला गाण्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि या गाण्यांचा अमेरिकेत अल्बम निघेल, असं आम्हाला सांगण्यात आलं. या संधीचं सोनं करायची हीच ती वेळ आहे असं मला वाटलं.

माझ्याबरोबर बायबल अभ्यास करणाऱ्‍या साक्षीदाराला मी सांगितलं की मी आता फक्‍त हा शेवटचा अल्बम करेन आणि मग नंतर बायबलच्या तत्त्वांचा अगदी मनापासून माझ्या जीवनात अवलंब करेन. त्याने काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही फक्‍त मला मत्तय ६:२४ या वचनातील येशूचे शब्द वाचायला लावले. त्यात म्हटलं आहे: “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही.” येशूच्या या शब्दांचा काय अर्थ होतो हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी तीनताड उडालो. पण काही दिवसांनंतर माझा बायबल शिक्षक तीनताड उडाला कारण मी त्याला सांगितलं की मला येशूचं अनुकरण करायचं असल्यामुळे मी बँड सोडला आहे!

बायबल हे आरशाप्रमाणं होतं ज्यात मला माझ्या चुका दिसल्या. (याकोब १:२२-२५) मला दिसलं की, मी पूर्वी निर्दयी होतो; खूप घमेंडी आणि फार महत्त्वाकांक्षी होतो. मी खालच्या दर्जाची भाषा बोलायचो. मी खूप भांडायचो, सिगारेट ओढायचो, प्रमाणाच्या बाहेर दारू प्यायचो. माझ्या जीवनशैलीत आणि बायबलच्या तत्त्वांमध्ये इतकी तफावत आहे हे जाणवल्यावर मला तर माझ्या स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला. तरीसुद्धा मी योग्य ते बदल करण्यास तयार होतो पण तसं करणं इतकं सोपं नव्हतं.—इफिसकर ४:२२-२४.

“आपला स्वर्गीय पिता यहोवा खरंच मायाळू आहे आणि आपण केलेल्या चुकांप्रती खरा पश्‍चात्ताप दाखवतो तेव्हा तो आपल्या जखमा बऱ्‍या करू इच्छितो”

मी जीवनात केलेल्या चुकांमुळे खरंतर सुरुवातीला माझं मन मला खूप खात होतं. पण माझ्याबरोबर बायबल अभ्यास करणाऱ्‍यानं मला खूप मदत केली. त्यानं मला यशया १:१८ या वचनात काय लिहिलं आहे ते दाखवलं: “तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील.” या आणि अशा इतर वचनांमुळे माझी खातरी पटली की आपला स्वर्गीय पिता यहोवा खरंच मायाळू आहे आणि आपण केलेल्या चुकांप्रती खरा पश्‍चात्ताप दाखवतो तेव्हा तो आपल्या जखमा बऱ्‍या करू इच्छितो.

यहोवाला जेव्हा मी ओळखू लागलो आणि त्याच्यावर प्रेम करू लागलो तेव्हा मी माझं जीवन त्याला समर्पित करायचं ठरवलं. (स्तोत्र ४०:८) त्यानंतर मग मी रशियातील सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी १९९२ साली झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात बाप्तिस्मा घेतला.

मला काय फायदा झाला:

यहोवाच्या उपासकांमध्ये मला बरेच चांगले मित्र मिळाले. अधूनमधून आम्ही ख्रिश्‍चनांना शोभतील अशी गाणी वाजवण्यासाठी आणि देवानं दिलेल्या या देणगीचा आनंद घेण्यासाठी एकत्र जमतो. (याकोब १:१७) एक खास आशीर्वाद मला मिळाला आहे तो म्हणजे मला क्रिस्टीनासारखी चांगली पत्नी मिळाली. माझ्या जीवनातला आनंद, दुःख व अगदी मनातल्या गोष्टीही मी तिला सांगत असतो.

जर मी यहोवाचा साक्षीदार नसतो तर आता मी जिवंत नसतो. पूर्वी मी नेहमी काही ना काही समस्यांनी पीडित असायचो. पण आत्ता माझ्या जीवनाला खरा अर्थ लाभला आहे, आणि सर्वकाही सुरळीत चाललं आहे असं मला वाटतं. ▪ (w१३-E ०४/०१)