व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ३

समस्या कशा सोडवाल?

समस्या कशा सोडवाल?

“एकमेकांवर जिवेभावे प्रेम करत राहा. कारण प्रेम पुष्कळ पापांवर पांघरूण घालते.”—१ पेत्र ४:८, मराठी कॉमन लँग्वेज.

तुम्ही वैवाहिक जीवनाची सुरुवात करता तेव्हा निरनिराळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची विचारसरणी, भावना व जीवनाबद्दल तुमचा दृष्टिकोन यांमध्ये फरक असल्यामुळे या समस्या उद्भवू शकतात. किंवा मग, दुसऱ्या एखाद्या कारणामुळे अथवा अनपेक्षित घटनांमुळे त्या उद्भवू शकतात.

समस्यांपासून पळ काढण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो. पण, बायबल आपल्याला असा सल्ला देते की आपण त्यांचा सामना केला पाहिजे. (मत्तय ५:२३, २४) बायबलची तत्त्वे लागू केल्यास तुम्हाला तुमच्या समस्यांवर सगळ्यात उत्तम उपाय मिळतील.

१ समस्येबद्दल बोला

बायबल काय म्हणते: “बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ७) समस्येबद्दल बोलण्यासाठी वेळ द्या. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते आणि तुमचे विचार काय आहेत हे प्रामाणिकपणे सोबत्याला सांगा. आपल्या सोबत्याशी नेहमी “खरे बोला.” (इफिसकर ४:२५) एखाद्या गोष्टीविषयी तुमची काही ठाम मते असली तरी वाद घालण्याचा मोह टाळा. शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे चर्चेचे रूपांतर भांडणात होणार नाही.—नीतिसूत्रे १५:४; २६:२०.

तुम्ही तुमच्या सोबत्याशी सहमत नसला, तरी त्याच्याशी प्रेमळपणे वागा. तुमच्या सोबत्याला प्रेम व आदर दाखवण्यास केव्हाही विसरू नका. (कलस्सैकर ४:६) उद्भवलेली समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा, आणि नेहमी एकमेकांशी संवाद साधा.—इफिसकर ४:२६.

तुम्ही काय करू शकता:

  • समस्येबद्दल बोलण्यासाठी एक योग्य वेळ ठरवा

  • तुमचा सोबती बोलत असेल तर त्याला मधेच तोडू नका. तुमची बोलायची वेळ येईल तेव्हा बोला

२ ऐका व समजून घ्या

बायबल काय म्हणते: “एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.” (रोमकर १२:१०) तुम्ही कशा प्रकारे ऐकता हे खूप महत्त्वाचे आहे. तुमचा सोबती काय बोलत आहे हे “सहानुभूतीने . . . आणि नम्रतेने” समजून घेण्याचा प्रयत्न करा. (१ पेत्र ३:८, ईझी-टू-रीड व्हर्शन; याकोब १:१९) ऐकत असल्याचा दिखावा करू नका. तुमचा सोबती तुमच्याजवळ समस्येबद्दल बोलण्यास आला तर शक्य असल्यास करत असलेले काम बाजूला ठेवा आणि त्याचे लक्षपूर्वक ऐका. किंवा त्याबद्दल नंतर बोलले तर चालेल का असे विचारा. तुमचा विवाहसोबती तुमचा सहकारी आहे, विरोधी नाही असा विचार करा; असे केल्यास तुम्ही त्याचे बोलणे लगेच मनाला लावून घेणार नाही.—उपदेशक ७:९.

तुम्ही काय करू शकता:

  • तुमचा सोबती जे काही बोलतो ते तुम्हाला पटत नसले तरी त्याचे म्हणणे ऐका

  • तुमच्या सोबत्याला नेमके काय म्हणायचे आहे ते जाणून घ्या. त्याचे हावभाव व त्याच्या आवाजातील चढउतार यांकडे लक्ष द्या

३ ठरवल्याप्रमाणे कार्यही करा

बायबल काय म्हणते: “सर्व श्रमांत लाभ आहे, पण तोंडाच्या वटवटीने दारिद्र्य येते.” (नीतिसूत्रे १४:२३) एखाद्या समस्येवर चांगला तोडगा काढून त्यावरच थांबू नका; तर तुम्ही दोघांनी जे काही ठरवले आहे त्याप्रमाणे कार्यही करा. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. पण, तुम्ही जी काही मेहनत घ्याल ती मुळीच व्यर्थ जाणार नाही. (नीतिसूत्रे १०:४) तुम्ही जर एकत्र मिळून कार्य केले तर तुमच्या मेहनतीचे “चांगले फळ” तुम्हाला नक्कीच मिळेल.—उपदेशक ४:९.

तुम्ही काय करू शकता:

  • व्यावहारिकपणे समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल व तुमचा सोबती काय करेल हे ठरवा

  • तुम्ही ठरवल्याप्रमाणे कार्य करत आहात की नाही याचे वेळोवेळी परीक्षण करा