व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय चार

“तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”

“तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”

१, २. (क) रूथ आणि नामी यांच्या प्रवासाचं आणि त्यांच्या दुःखी मनःस्थितीचं वर्णन करा. (ख) रूथ आणि नामी यांचा प्रवास वेगळा कसा होता?

समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या मवाब देशाच्या सपाट प्रदेशात, नेहमीप्रमाणे जोरदार वारा वाहत आहे. एका निर्जन रस्त्यावरून रूथ आपली सासू नामी हिच्यासोबत चालली आहे. त्या विस्तीर्ण पसरलेल्या माळरानात बऱ्याच अंतरापर्यंत आता फक्त त्या दोघींच्या लहान आकृत्या दिसत आहेत. मावळतीकडे जाणाऱ्या सूर्यासोबत लांबत चाललेल्या सावल्या पाहून रूथ आपल्या सासूबद्दल विचार करू लागते. रात्र घालवण्यासाठी आता आसरा शोधायला हवा असा विचार तिच्या मनात येतो. रूथचं आपली सासू नामी हिच्यावर खूप प्रेम आहे. आणि आपल्या सासूची जमेल तितक्या चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची तिची इच्छा आहे.

प्रवासाला निघालेल्या त्या दोघी जणी मनात दुःखाचं मोठं ओझं घेऊन चालल्या होत्या. नामी अनेक वर्षांपासून विधवा होती. पण, अलीकडेच तिची दोन मुलं, खिल्योन आणि महलोन यांचाही मृत्यू झाला होता. तशीच रूथसुद्धा आपला पती महलोन याच्या मृत्यूच्या दुःखातून अजून सावरलेली नव्हती. नामी आणि रूथ खरंतर एकाच ठिकाणी, म्हणजे इस्राएलातील बेथलेहेम गावी जात होत्या. पण, एका अर्थानं त्या दोघींचा प्रवास वेगळा होता. नामी आपल्या घरी परतत होती. पण रूथ मात्र आपली माहेरची माणसं, आपला मायदेश, तिथल्या सगळ्या प्रथा आणि देवी-देवता हे सारं सोडून एका अनोळखी ठिकाणी जायला निघाली होती.—रूथ १:३-६ वाचा.

३. आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत?

पण, या तरुण स्त्रीनं जीवनात इतका मोठा बदल करण्याचं कारण काय? आणि एका अनोळखी ठिकाणी जाऊन नव्यानं जीवन सुरू करणं व आपल्या सासूची काळजी घेणं तिला कसं जमलं? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतल्यानं आपल्याला मवाब देशात राहणाऱ्या रूथच्या विश्वासापासून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. (“ एक लहानशी, पण उत्कृष्ट कलाकृती,” ही चौकटदेखील पाहा.) पण सर्वात आधी, बेथलेहेमच्या या लांबच्या प्रवासाला त्या स्त्रिया का निघाल्या हे आपण पाहू या.

कुटुंबाची घडी विस्कटते

४, ५. (क) नामीचं कुटुंब मवाबात का राहायला गेलं? (ख) मवाब देशात नामीला कोणत्या कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागलं?

रूथचं लहानपण मवाब देशात गेलं. मृत समुद्राच्या पूर्वेकडे असलेल्या या लहानशा देशात समुद्रसपाटीपासून उंचावर असलेली माळरानं आणि खोल दऱ्या होत्या. इथल्या सपाट प्रदेशांत फारशी झाडं नसली, तरी जमीन मात्र सुपीक होती. त्यामुळं इस्राएलात दुष्काळ पडला, तरीसुद्धा मवाबात सहसा अन्नधान्याची कमी नसायची. आणि खरंतर याच कारणामुळं रूथ ही महलोन आणि त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आली.—रूथ १:१.

इस्राएल देशात जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा नामीचा पती अलीमलेख यानं आपला मायदेश सोडण्याचा आणि बायको-पोरांना घेऊन मवाब देशात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. इस्राएली लोकांना नियमितपणे, यहोवानं निवडलेल्या पवित्र स्थानी जाऊन उपासना करण्याची आज्ञा देण्यात आली होती. (अनु. १६:१६, १७) त्यामुळं मवाब देशात राहायला गेल्यावर, अलीमलेखाच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला यहोवावरील आपला विश्वास टिकवून ठेवणं कठीण गेलं असेल. पण अशा परिस्थितीतही, नामीनं यहोवावर असलेला विश्वास टिकवून ठेवला. तरीदेखील, तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा ते मोठं दुःख सहन करणं तिला सोपं गेलं नाही.—रूथ १:२, ३.

६, ७. (क) नामीच्या मुलांनी मवाबी मुलींशी लग्न केलं तेव्हा तिला काळजी का वाटली असावी? (ख) नामी आपल्या सुनांशी प्रेमानं वागली ही गोष्ट इतकी उल्लेखनीय का आहे?

नंतर, जेव्हा नामीच्या मुलांनी मवाबी मुलींशी लग्न केलं, तेव्हासुद्धा तिला खूप दुःख झालं असेल. (रूथ १:४) आपला पूर्वज अब्राहाम यानं त्याचा मुलगा, इसहाक याच्यासाठी देवाचे उपासक असलेल्या लोकांमधून मुलगी शोधण्यासाठी किती खटाटोप केला होता, याची नामीला कल्पना होती. (उत्प. २४:३, ४) पुढं, मोशेच्या नियमशास्त्रातही इस्राएली लोकांना अशी ताकीद देण्यात आली, की त्यांनी विदेशी लोकांसोबत आपल्या मुलामुलींचं लग्न लावून देऊ नये. असं केल्यास, ते लोक तुम्हाला मूर्तिपूजा करायला लावतील, असंही त्यांना सांगण्यात आलं होतं.—अनु. ७:३, ४.

पण तरीसुद्धा, महलोन आणि खिल्योन यांनी मवाबी मुलींशी लग्न केलं. यामुळं नामी निराश झाली असेल का? आपली मुलं पुढं मूर्तिपूजेकडे वळतील, अशी काळजी तिला वाटली असावी का? तसं असलं, तरी रूथ व अर्पा या आपल्या सुनांशी ती नेहमीच अतिशय प्रेमळपणे वागली. त्यासुद्धा पुढं यहोवाची उपासना करू लागतील अशी आशा कदाचित तिनं मनोमन बाळगली असावी. रूथ आणि अर्पा या दोघींचंही नामीवर प्रेम होतं. पण, अचानक त्यांच्या कुटुंबावर एक दुःखद प्रसंग आला. रूथ आणि अर्पा दोघीही तरुणपणीच, मूलबाळ नसताना विधवा झाल्या. पण आपसातल्या चांगल्या संबंधांमुळेच या दुःखद प्रसंगातही एकमेकींना साथ देणं त्या तिघींना शक्य झालं असेल.—रूथ १:५.

८. यहोवाची उपासना करण्याची इच्छा रूथच्या मनात कशामुळे उत्पन्न झाली असावी?

रूथच्या जीवनात आलेल्या या दुःखद प्रसंगात, तिच्या पूर्वीच्या धार्मिक विश्वासांमुळं तिला काही सांत्वन मिळालं असावं का? असं वाटत नाही. मवाबी लोक अनेक देवी-देवतांची उपासना करायचे. कमोश हे त्यांचं प्रमुख दैवत होतं. (गण. २१:२९) त्याकाळी, लहान मुलांचा बळी देण्यासारख्या अतिशय भयानक व क्रूर धार्मिक प्रथा पाळल्या जायच्या. मवाबी धर्मातही अशा प्रथा पाळल्या जात असाव्यात असं दिसतं. महलोन किंवा नामी यांच्याकडून रूथला यहोवाबद्दल कितपत माहिती मिळाली, हे आपल्याला माहीत नाही; पण, इस्राएली लोकांच्या या प्रेमळ व दयाळू देवाबद्दल तिला जे काही समजलं, ते तिला नक्कीच खूप विशेष वाटलं असेल. तिला माहीत असलेल्या देवांपेक्षा यहोवा अगदीच वेगळा आहे, याची जाणीव तिला झाली असावी. तो आपल्या उपासकांच्या मनात भीती निर्माण करून नव्हे, तर प्रेमानं त्यांच्यावर शासन करतो हेही तिच्या लक्षात आलं असेल. (अनुवाद ६:५ वाचा.) पतीच्या मृत्यूमुळे पूर्णपणे खचून गेलेली रूथ नामीच्या आणखीनच जवळ आली असावी. नामी तिला सर्वसमर्थ असलेल्या यहोवा देवाबद्दल, त्याच्या अद्‌भुत कार्यांबद्दल आणि आपल्या लोकांशी त्यानं केलेल्या प्रेमळ व दयाळू व्यवहाराबद्दल नक्कीच सांगत असेल. आणि रूथ ते सर्व अगदी लक्षपूर्वक ऐकत असेल.

दुःखाचा सामना करताना रूथ नामीच्या आणखी जवळ आली

९-११. (क) नामी, रूथ व अर्पा यांनी कोणता निर्णय घेतला? (ख) नामी, रूथ व अर्पा यांच्यावर आलेल्या दुःखद प्रसंगांतून आपल्याला काय शिकायला मिळतं?

नामीच्या बाबतीत पाहिल्यास, आपल्या मायदेशाहून काही चांगली बातमी येते का, याची ती आतुरतेनं वाट पाहत होती. एक दिवशी, कदाचित दुरून आलेल्या व्यापाऱ्याकडून तिला कळलं असावं की इस्राएलातील दुष्काळ आता संपला आहे. यहोवानं पुन्हा आपल्या लोकांना आशीर्वाद दिला आहे. खरंतर, बेथलेहेम या नावाचा शब्दशः अर्थ “अन्नगृह” असा होतो; आणि या नावाप्रमाणेच पुन्हा एकदा बेथलेहेमात भरपूर अन्नधान्य आहे, असं नामीला कळलं. तेव्हा तिनं आपल्या मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.—रूथ १:६.

१० पण, रूथ आणि अर्पाचं काय? त्यांनीही तिच्यासोबत जायचं ठरवलं का? (रूथ १:७) दुःखात एकमेकींना साथ दिल्यामुळं त्या सासू-सुना खूप जवळ आल्या होत्या. नामीच्या प्रेमळ व्यवहारामुळं आणि यहोवावरील तिच्या अढळ विश्वासामुळं, विशेषतः रूथला नामीबद्दल खूप आपुलकी वाटू लागली होती असं दिसतं. त्यामुळं, रूथ आणि अर्पा यांनीही नामीसोबत जायचं ठरवलं आणि अशा रीतीनं, विधवा झालेल्या त्या तिघीही यहुदाला जायला निघाल्या.

११ रूथचा अहवाला आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देतो; पहिली गोष्ट म्हणजे, फक्त वाईट लोकांच्याच नव्हे, तर चांगल्या व प्रामाणिक लोकांच्या जीवनातही दुःखाचे प्रसंग येतात; त्यांनाही प्रिय जनांच्या मृत्यूचं दुःख सोसावं लागतं. (उप. ९:२, ११) तसंच, जीवनात असह्य दुःखाला तोंड द्यावं लागतं तेव्हा इतरांकडून, विशेषतः जे यहोवाला आपलं शरणस्थान मानतात अशांकडून, सांत्वन आणि आधार घेण्यास आपण कधीही संकोच करू नये.—नीति. १७:१७.

रूथनं दाखवलेलं एकनिष्ठ प्रेम

१२, १३. रूथ व अर्पानं आपापल्या घरी परत जावं असं नामीला का वाटत होतं, आणि सुरुवातीला त्या दोघी काय म्हणतात?

१२ जसजशा त्या तिघी एकेका मैलाचं अंतर पार करत पुढं जात होत्या, तसतशी नामीला आणखी एक चिंता सतावू लागली. तिच्यासोबत असलेल्या त्या तरुण मुलींबद्दल ती विचार करू लागली. तिला व तिच्या मुलांना त्यांनी किती जीव लावला होता! आणि आता आपल्यामुळं त्यांना आणखी त्रास सोसावा लागेल, या विचारानं ती खूप अस्वस्थ झाली. या दोघी आपला मायदेश सोडून माझ्यासोबत येत आहेत खऱ्या, पण तिथं गेल्यावर मी त्यांच्यासाठी काय करू शकणार आहे, हा विचार तिच्या मनात घोळू लागला.

१३ शेवटी, अगदी न राहावून नामी त्यांना म्हणाली: “तुम्ही दोघी जणी आपापल्या माहेरी परत जा. तुम्ही जशा आपल्या मृत पतीशी व माझ्याशी एकनिष्ठ होता, तसाच प्रभू तुमच्याशी राहो!” यहोवाच्या कृपेनं आपल्या सुनांची पुन्हा लग्नं व्हावीत आणि त्यांनी नव्यानं संसार थाटावा, अशी मनःपूर्वक इच्छाही नामीनं व्यक्त केली. मग, “तिने त्यांचे चुंबन घेतले तेव्हा त्या रडू लागल्या.” खरोखर, नामी किती प्रेमळ आणि मोठ्या मनाची होती! साहजिकच, आपल्या सासूला सोडून जाण्याचं रूथ व अर्पाचं मन होत नव्हतं. त्या दोघी हट्ट करू लागल्या: “आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या लोकांकडे येतो.”—रूथ १:८-१०, मराठी कॉमन लँग्वेज.

१४, १५. (क) अर्पाच्या निर्णयावरून कोणती महत्त्वाची गोष्ट लक्षात येते? (ख) नामीनं कशा प्रकारे रूथची समजूत घालण्याचा प्रयत्न केला?

१४ पण नामी त्यांचं काहीएक ऐकायला तयार नव्हती. ती त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली. मी तर विधवा आहे. शिवाय, तुमच्याशी लग्न करण्यासाठी मला आणखी मुलं नाहीत आणि पुढंही होऊ शकत नाहीत. तेव्हा, इस्राएलला गेल्यावर मी तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही, असं ती त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करू लागली. त्यांची काळजी घेण्यास आपण किती असमर्थ आहोत, आणि या विचारानं आपल्याला किती दुःख होत आहे, हे नामीनं आपल्या सुनांना सांगितलं. अर्पाला नामीचं म्हणणं पटलं. आपली माहेरची माणसं, घर, सारं काही इथंच आहे; तेव्हा, मवाबातच राहणं योग्य ठरेल असं तिलाही वाटू लागलं. त्यामुळं, अतिशय जड अंतःकरणानं अर्पानं नामीचा मुका घेतला आणि तिचा निरोप घेऊन ती मागे वळली.—रूथ १:११-१४.

१५ पण, मग रूथचं काय? तिनंही मागे फिरण्याचा निर्णय घेतला का? खरंतर, नामीनं जे काही सांगितलं होतं ते रूथलाही उद्देशून होतं. तरीसुद्धा, अहवालात असं सांगितलं आहे: “रूथ तिला बिलगून राहिली.” आता मात्र नामीनं काहीशा कडक शब्दांत रूथची समजूत घालण्याचा प्रयत्न केला: “पाहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवांकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा.” (रूथ १:१५) नामीच्या या शब्दांतून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. अर्पा फक्त तिच्या लोकांकडेच नाही, तर तिच्या “देवांकडे” परत गेली होती. पूर्वीप्रमाणेच, कमोश व इतर खोट्या दैवतांची उपासना करण्यास तिची हरकत नव्हती. पण, रूथच्याही भावना तशाच होत्या का?

१६-१८. (क) रूथनं नामीवर एकनिष्ठ प्रेम कसं दाखवलं? (ख) एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपण रूथच्या उदाहरणातून काय शिकू शकतो? (नामी आणि रूथची चित्रंदेखील पाहा.)

१६ त्या निर्जन रस्त्यावर रूथ आपल्या सासूचं म्हणणं ऐकत होती खरी, पण तिचा इरादा अगदी पक्का होता. तिच्या मनात कसलीही शंका नव्हती. नामीवर आणि नामी ज्याची उपासना करायची, त्या यहोवा देवावर रूथचं अगदी मनापासून प्रेम होतं. त्यामुळं ती नामीला म्हणाली: “तुम्हाला सोडून जाण्यास मला लावू नका, कारण तुम्ही जिकडे जाल, तिकडे मी येईन आणि तुम्ही जेथे राहाल, तेथे मी राहीन. तुमचे लोक माझे लोक होतील, आणि तुमचा देव माझा देव होईल. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच मला मूठमाती मिळेल. मृत्यूशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला मी जर आपल्या दोघींना विभक्त करू दिले, तर देव [“यहोवा,” NW] मजवर भयंकर अरिषटे आणो.”—रूथ १:१६, १७, सुबोधभाषांतर.

“तुमचे लोक माझे लोक होतील, आणि तुमचा देव माझा देव होईल”

१७ रूथचे हे शब्द इतके उल्लेखनीय आहेत, की आज तीन हजार वर्षांनंतरही ते लोकांच्या आठवणीत आहेत! या शब्दांतून तिच्यात असलेला एक अतिशय उत्कृष्ट गुण दिसून येतो. तो म्हणजे, तिचं एकनिष्ठ प्रेम. रूथचं नामीवर इतकं जिवापाड प्रेम होतं की ती जिथं जाईल तिथं तिच्यासोबत जाण्याची रूथची तयारी होती. फक्त मृत्यूच आपल्याला एकमेकींपासून वेगळं करू शकेल, असं ती नामीला म्हणाली. नामीच्या लोकांना ती आपलेच लोक मानणार होती. आणि नामीसोबत इस्राएलला जाण्यासाठी ती मवाबातलं आपलं सर्वकाही मागे सोडून देण्यास तयार होती. अगदी, आपल्या देवीदेवतांची उपासना सोडून देण्यासही ती तयार होती. या बाबतीत रूथ अर्पापेक्षा किती वेगळी होती! नामीचा देव, यहोवा याची उपासना करण्याची तिची अगदी मनापासून इच्छा होती. *

१८ आता त्या दोघीच बेथलेहेमच्या लांबच्या प्रवासाला लागल्या. या प्रवासाला त्या काळी कदाचित एक आठवडा लागत असावा. त्या दुःखी स्त्रियांना एकमेकींच्या सहवासामुळं काही प्रमाणात का होईना, पण सांत्वन व दिलासा नक्कीच मिळाला असेल.

१९. तुमच्या मते आपण कुटुंबात, मैत्रीसंबंधांत, आणि मंडळीत रूथच्या एकनिष्ठ प्रेमाचं अनुकरण कशा प्रकारे करू शकतो?

१९ आजही या जगात अनेक लोक दुःखी आहेत. सध्याच्या काळाला बायबलमध्ये ‘शेवटल्या काळातील कठीण दिवस’ म्हटलं आहे. त्यामुळं आज आपल्या सर्वांनाच जीवनात अनेक दुःखद प्रसंगांचा सामना करावा लागतो. (२ तीम. ३:१) म्हणूनच, रूथनं दाखवलेल्या उत्कृष्ट गुणाची, म्हणजे एकनिष्ठ प्रेमाची आज कधी नव्हे इतकी गरज आहे. एखाद्या व्यक्तीवर एकनिष्ठ प्रेम करणं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आणि काहीही झालं तरी त्या व्यक्तीची साथ न सोडणं. प्रेमाचा अभाव असलेल्या या जगात असं एकनिष्ठ प्रेम म्हणजे जणू अंधारात असलेला एक दिवाच! असं प्रेम वैवाहिक जीवनात, कौटुंबिक नात्यांत, मैत्रीच्या संबंधांत, तसंच ख्रिस्ती मंडळीतसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. (१ योहान ४:७, ८, २० वाचा.) जेव्हा आपण अशा प्रकारचं प्रेम उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खरंतर आपण रूथच्या उत्कृष्ट उदाहरणाचं अनुकरण करत असतो.

बेथलेहेमला पोचल्यावर . . .

२०-२२. (क) मवाबात गेल्यापासून घडलेल्या घटनांचा नामीवर कसा परिणाम झाला होता? (ख) जीवनात आलेल्या दुःखद प्रसंगांबद्दल नामीला कोणता गैरसमज होता? (याकोब १:१३ देखील पाहा.)

२० अर्थात, एकनिष्ठ प्रेमाबद्दल बोलणं आणि प्रत्यक्षात ते दाखवणं यात खूप फरक आहे. आता रूथसमोर नामीबद्दल आणि ज्याला तिनं आपला देव मानलं होतं, त्या यहोवा देवाबद्दलही हे एकनिष्ठ प्रेम कार्यांतून दाखवण्याची संधी होती.

२१ शेवटी, त्या दोघी बेथलेहेमला पोचल्या. हे जेरूसलेमच्या दक्षिणेकडे सुमारे दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेलं गाव होतं. कदाचित नामीचं कुटुंब एकेकाळी त्या लहानशा गावात खूप प्रतिष्ठित असावं. नामीलाही सर्व जण ओळखत असावेत. कारण, जेव्हा ती बेथलेहेमला परतली तेव्हा सबंध गावात चर्चा होऊ लागली. गावातल्या बायका तिच्याकडे पाहून म्हणू लागल्या, “हीच नामी का?” मवाब देशात घालवलेल्या वर्षांदरम्यान नामीत बराच बदल झाला असावा. अनेक वर्षं सोसलेला त्रास आणि दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.—रूथ १:१९.

२२ आपल्याला जीवनात कायकाय सोसावं लागलंय याबद्दल नामी त्या ओळखीच्या बायकांना व नातेवाइकांना सांगते. आपलं नामी हे नाव, ज्याचा अर्थ “मनोरमा” असा होतो, ते बदलून मारा म्हणजे ‘क्लेशमया’ ठेवावं असंही ती त्यांना म्हणते. बिचारी नामी! तिच्या बऱ्याच काळाआधी होऊन गेलेल्या ईयोबाप्रमाणेच तिलाही असं वाटतं, की यहोवा देवानंच ही सारी संकटं तिच्यावर आणली आहेत.—रूथ १:२०, २१; ईयो. २:१०; १३:२४-२६.

२३. रूथला कोणता प्रश्न पडतो, आणि नियमशास्त्रात गोरगरिबांसाठी कोणती तरतूद करण्यात आली होती? (तळटीपही पाहा.)

२३ हळूहळू रूथ व नामी या दोघीही बेथलेहेमच्या जीवनात रुळल्या. पण, आता दोघींच्या पोटापाण्याची सोय कशी करावी, असा प्रश्न रूथला पडतो. मग तिला कळतं, की इस्राएली लोकांना नियमशास्त्र देताना यहोवा देवानं गोरगरिबांसाठी एक अतिशय प्रेमळ तरतूद केली होती. नियमशास्त्रानुसार, कापणीच्या वेळी गरीब लोकांना शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागे जाऊन, त्यांच्या हातून सुटलेल्या पेंढ्या व फळं गोळा करण्याची परवानगी होती. तसंच, शेताच्या कानाकोपऱ्यांत उगवणारं पीक गोळा करण्याचीही त्यांना मोकळीक होती. *लेवी. १९:९, १०; अनु. २४:१९-२१.

२४, २५. बवाजाच्या शेतात आल्यावर रूथ काय करते, आणि उरलेलं पीक गोळा करण्याचं काम सोपं का नव्हतं?

२४ तो सातूच्या म्हणजेच जवाच्या कापणीचा काळ होता. आपल्या कॅलेंडरप्रमाणे साधारण एप्रिल महिन्याच्या आसपासचा काळ. गरिबांसाठी केलेल्या तरतुदीनुसार, कुणीतरी आपल्याला कापणीनंतर उरलेलं पीक गोळा करण्याचं काम करू देईल, या आशेनं रूथ शेतांमध्ये जाते. जाता-जाता, ती बवाज नावाच्या एका माणसाच्या शेताजवळ येते. बवाज हा एक श्रीमंत जमीनदार होता आणि नामीचा मृत पती अलीमलेख याचा तो नातेवाईक होता. खरंतर, नियमशास्त्रानुसार रूथला कापणीनंतर शेतात उरलेलं पीक गोळा करण्याचा हक्क होता; पण, तरी ती लगेच पीक गोळा करायला सुरुवात करत नाही. तर, कापणीच्या मजुरांवर देखरेख करणाऱ्याला आधी ती परवानगी मागते. त्यानं परवानगी दिल्यावर मात्र रूथ लगेच कामाला लागते.—रूथ १:२२–२:३, ७.

२५ शेतांत कापणी करणाऱ्यांच्या मागून जाणाऱ्या रूथचं चित्र डोळ्यांपुढे आणा. कापणी करणारे मजूर विळ्यानं जवाची ताटं कापून पुढं जात आहेत, तशी रूथ खाली वाकून त्यांच्या हातून पडलेली किंवा राहून गेलेली ताटं उचलते आणि त्यांच्या पेंढ्या बांधते. नंतर मळणी करण्यासाठी, ती पेंढ्या उचलून एका कोपऱ्यात गोळा करते. हे काम काही लगेच करून संपवण्यासारखं नव्हतं; बऱ्याच कष्टाचं काम होतं. आणि सूर्य डोक्यावर येऊ लागतो तसं ते आणखीनच मेहनतीचं होत जातं. पण, रूथ आपलं काम करत राहते. अधूनमधून फक्त कपाळावरचा घाम पुसायला ती थांबते. तसंच, दुपारी फक्त थोडा वेळ ती “घरात” (मजुरांना विश्रांती घेण्यासाठी शेतात बांधलेली ही लहानशी ओसरी असावी) जेवायला जाते आणि मग पुन्हा आपल्या कामाला लागते.

आपल्या व सासूच्या गरजा भागवण्यासाठी कोणतंही मेहनतीचं काम करण्याची रूथची तयारी होती

२६, २७. बवाज कशा प्रकारचा माणूस होता, आणि रूथशी तो कशा प्रकारे वागतो?

२६ आपल्याकडे कुणाचं लक्ष जाईल अशी रूथनं कदाचित अपेक्षाही केली नसेल. पण, बवाजचं तिच्याकडे लक्ष जातं. तो मजुरांवर देखरेख करणाऱ्याकडे तिच्याविषयी विचारपूस करतो. बवाजाच्या शेतातले बरेच कामगार हे रोजंदारीवर काम करणारे मजूर असावेत. आणि त्यांपैकी काही विदेशीही असावेत. पण, बवाज हा यहोवाचा एक विश्वासू उपासक होता. आपल्या कामगारांना भेटल्यावर तो नेहमी त्यांना “यहोवा तुमच्यासंगती असो,” (पं.र.भा.) असं म्हणत असे. आणि तेसुद्धा त्याला असंच म्हणून प्रणाम करत. असा हा सात्त्विक वृत्तीचा वयस्क बवाज, एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे रूथविषयी आस्था व्यक्त करतो.—रूथ २:४-७.

२७ रूथशी बोलताना बवाज तिला “माझ्या मुली” (पं.र.भा.) असं म्हणतो. तो तिला पीक गोळा करण्यासाठी आपल्या शेतांत येत राहण्यास सांगतो. तसंच, कामकऱ्यांपैकी कुणी तिला त्रास देऊ नये, म्हणून तिनं इतर स्त्रियांसोबतच राहावं असंही तो तिला सांगतो. शिवाय, दुपारी जेवताना तिला काय हवं-नको याकडे तो लक्ष देतो. (रूथ २:८, ९, १४ वाचा.) पण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, बवाज रूथची प्रशंसा करतो आणि तिला धीर देतो. हे तो कसं करतो?

२८, २९. (क) रूथनं कशा प्रकारचं नाव कमवलं होतं? (ख) रूथप्रमाणे तुम्हीसुद्धा यहोवाच्या पंखांखाली कशा प्रकारे आश्रय घेऊ शकता?

२८ मी इस्राएली नसूनही आपण माझ्यावर हे उपकार का करत आहात, असं रूथ बवाजाला विचारते. तेव्हा, ती आपली सासू नामी हिच्याशी कशा प्रकारे वागली याबद्दलचा सर्व वृत्तान्त आपल्याला कळला असल्याचं तो तिला सांगतो. कदाचित, नामीनं गावातल्या स्त्रियांजवळ आपल्या लाडक्या सुनेची प्रशंसा केली असेल आणि ती गोष्ट बवाजाच्याही कानावर आली असेल. रूथ यहोवाची उपासक बनली आहे हेसुद्धा बवाजाला माहीत होतं; म्हणूनच तो तिला म्हणतो: “यहोवा तुझ्या कामाची फेड करो, आणि ज्याच्या पंखांचा आश्रय करायला तू आलीस तो यहोवा, इस्राएलाचा देव याच्यापासून तुला पूर्ण फळ प्राप्त होवो.”—रूथ २:१२, पं.र.भा.

२९ बवाजाचे हे शब्द ऐकून रूथला किती बरं वाटलं असेल याची कल्पना करा! खरोखरच, एखाद्या पिल्लानं पक्ष्याच्या पंखांखाली लपावं, त्याप्रमाणे रूथनं यहोवा देवाच्या प्रेमळ छायेत आश्रय घेतला होता. आपल्याशी इतक्या प्रेमानं बोलल्याबद्दल रूथ बवाजाचे उपकार मानते. आणि संध्याकाळ होईपर्यंत ती शेतात काम करत राहते.—रूथ २:१३, १७.

३०, ३१. कष्टाळूपणा, कृतज्ञता आणि एकनिष्ठ प्रेम या बाबतींत आपण रूथकडून काय शिकू शकतो?

३० आजच्या जगात आपल्यापैकी अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं. पण, रूथनं तिच्या कार्यांतून दाखवलेल्या विश्वासाचं आपल्या सर्वांसमोर फार चांगलं उदाहरण आहे. मी एक निराधार विधवा आहे त्यामुळे मला मदत करण्याचं इतरांचं कर्तव्यच आहे, अशी रूथची वृत्ती नव्हती. उलट, इतरांनी केलेल्या प्रत्येक उपकाराची तिनं कदर केली. आपल्या सासूवर प्रेम असल्यामुळं तिची काळजी घेण्यासाठी, कोणतंही मेहनतीचं काम करण्याची रूथची तयारी होती. काम करताना सुरक्षित राहण्याबद्दल आणि योग्य संगतीबद्दल तिला जो सल्ला देण्यात आला, तो तिनं कृतज्ञतेनं स्वीकारला आणि त्याचं पालनही केलं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्यावर प्रेमानं पाखर घालणारा यहोवा देव आहे, याचा तिनं कधीही स्वतःला विसर पडू दिला नाही.

३१ रूथसारखंच आपणही एकनिष्ठ प्रेम दाखवलं; आणि नम्रता, कष्टाळू वृत्ती व कृतज्ञता या बाबतींत तिच्या उदाहरणाचं अनुकरण केलं, तर आपल्या विश्वासामुळंही इतरांना बरंच काही शिकायला मिळेल. पण, रूथ व नामी यांचा यहोवानं कशा प्रकारे सांभाळ केला? याविषयी आपण पुढच्या अध्यायात चर्चा करू या.

^ परि. 17 सहसा, एखाद्या विदेशी व्यक्तीनं म्हटलं असतं, त्याप्रमाणे रूथसुद्धा फक्त “देव” असं म्हणू शकली असती. पण, तिनं यहोवा देवाच्या वैयक्तिक नावाचा वापर केला ही गोष्ट खरोखर लक्षवेधक आहे. बायबलवर टिप्पणी करणाऱ्या एका ग्रंथात म्हटलं आहे, “यावरून लेखक या गोष्टीवर जोर देतो, की ही विदेशी स्त्री खऱ्या देवाची उपासक आहे.”

^ परि. 23 हा खरोखरच एक फार वेगळा असा नियम होता. रूथनं आपल्या मायदेशात तरी अशा तरतुदीबद्दल कधीच ऐकलेलं नव्हतं. प्राचीन काळी पूर्वेकडील देशांत विधवांचा खूप छळ केला जायचा. एका पुस्तकात याविषयी अशी माहिती देण्यात आली आहे: “पतीच्या मृत्यूनंतर, विधवेला सहसा आपल्या मुलांवर अवलंबून राहावं लागायचं; आणि मुलं नसल्यास दासी किंवा वेश्या बनणं, नाहीतर आत्महत्या करणं याशिवाय तिला पर्याय राहत नसे.”