व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलने बदललं जीवन

“मी सत्याची स्वतः खातरी करावी असं त्यांना वाटायचं”

“मी सत्याची स्वतः खातरी करावी असं त्यांना वाटायचं”
  • जन्म: १९८२

  • देश: डॉमिनिकन प्रजासत्ताक

  • पार्श्‍वभूमी: लहानपणापासून मॉरमन पंथाचे संस्कार

माझं आधीचं जीवन:

माझा जन्म डॉमिनिकन रिपब्लिकच्या सॅन्टो डॉमिंगोमध्ये झाला. चार भावंडांपैकी मी सगळ्यात लहान होतो. माझे आईवडील सुशिक्षित होते आणि त्यांना वाटायचं की आमच्यावर चांगले संस्कार व्हावेत आणि आम्ही चांगल्या लोकांमध्ये वाढावं. माझ्या जन्माच्या चार वर्षांआधी मॉरमन पंथाच्या मिशनरी लोकांसोबत माझ्या आईवडिलांची भेट झाली. या पंथाचे तरुण नीटनेटके कपडे घालतात आणि ते चांगलं वागतात हे माझ्या आईवडिलांनी पाहिलं आणि ही गोष्ट त्यांना खूप आवडली. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण चर्च ऑफ जीझस क्राईस्ट ऑफ लॅटर डे सेंट्‌स किंवा मॉरमन पंथाच्या चर्चचे सदस्य बनायचं. आमचं कुटुंब डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये मॉरमन चर्चच्या पहिल्या सदस्यांपैकी एक होतं.

लहानपणी मला मॉरमन चर्चमध्ये जे कार्यक्रम व्हायचे ते खूप आवडायचे. मॉरमन चर्चमध्ये शिकवलं जायचं की कुटुंबामध्ये प्रेमळ वातावरण असलं पाहिजे आणि जीवनात आपण नैतिक स्तर पाळले पाहिजेत आणि हेही मला खूप आवडायचं. मी मॉरमन पंथाचा होतो याचा मला खूप अभिमान होता आणि मी ठरवलं होतं की मोठं होऊन मी मिशनरी होणार.

मी १८ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या शिक्षणासाठी आम्ही अमेरिकेला राहायला गेलो. मग जवळपास एका वर्षानंतर माझी मावशी आणि काका एकदा आमच्याकडे फ्लोरिडाला आले. ते यहोवाचे साक्षीदार होते. त्यांनी आम्हाला एका अधिवेशनाचं आमंत्रण दिलं आणि तिथे बायबलबद्दल शिकवलं जाईल असं सांगितलं. मी तिथे गेल्यावर पाहिलं की सगळे बायबलमधून वचनं उघडत होते आणि नोट्‌स घेत होते. आणि ही गोष्ट मला खूप विशेष वाटली. म्हणून मीही पेन आणि पेपर मागितला आणि नोट्‌स घ्यायला लागलो.

अधिवेशनानंतर माझी मावशी आणि काका मला म्हणाले, की ‘हवं असेल तर आम्ही तुला बायबलबद्दल आणखी शिकून घ्यायला मदत करू शकतो.’ कारण मी त्यांना सांगितलं होतं की मला मिशनरी व्हायचंय. मी लगेच तयार झालो कारण त्या वेळी मला मॉरमन पुस्तकाबद्दल (बुक ऑफ मॉरमन) माहीत होतं, पण बायबलबद्दल इतकं काही माहीत नव्हतं.

बायबलने जीवन कसं बदललं?

मावशी आणि काका फोनवर माझ्यासोबत चर्चा करायचे. ते नेहमी म्हणायचे की ‘तू जे काही मानतोस ते बायबलमधून तपासून पाहा.’ मी सत्याची स्वत: खातरी करावी असं त्यांना वाटायचं.

मॉरमन पंथाच्या बऱ्‍याच शिकवणी तशा मी स्वीकारल्या होत्या, पण बायबलमध्ये तसं खरंच दिलंय का हे मी कधी तपासून पाहिलं नव्हतं. मग मावशीने मला यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं ८ नोव्हेंबर, १९९५ चं अवेक!  मासिक पाठवलं. त्यात मॉरमन पंथाबद्दल काही लेख होते. ते लेख वाचल्यावर मला आश्‍चर्य वाटलं कारण बऱ्‍याच मॉरमन शिकवणींबद्दल मला माहीतच नव्हतं. त्यामुळे त्या अवेक!  मासिकात जे म्हटलं होतं ते खरं आहे की नाही, हे पाहण्यासाठी मी मॉरमन पंथाच्या वेबसाईटवर गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या मासिकातली सगळी माहिती खरी आहे. त्यानंतर मी युटामध्ये मॉरमन पंथाच्या काही म्युझियमनाही भेट दिली. तेव्हा माझी आणखीनच खातरी पटली की मी अवेक!  मासिकात जी माहिती वाचली होती ती खरी आहे.

मला नेहमी वाटायचं की मॉरमन पुस्तकात जे शिकवलंय आणि बायबलमध्ये जे शिकवलंय त्यात काहीच फरक नाही. पण जेव्हा मी बायबल लक्ष देऊन वाचायला लागलो तेव्हा मला समजलं की मॉरमन शिकवणी आणि बायबलमध्ये जे सांगितलंय त्यात खूप फरक आहे.

याशिवाय मॉरमन चर्चमध्ये राष्ट्रवादी विचारही शिकवले जात होते. आणि ही गोष्ट मला खटकली. उदाहरणार्थ, मॉरमन लोकांना शिकवलं जायचं, की एदेनची बाग अमेरिकेच्या मिसूरी राज्यात जॅक्सन काउंटीमध्ये होती. तसंच मॉरमन पंथाचे धर्मगुरू असंही शिकवायचे की एक दिवस देवाचं राज्य अमेरिकेच्या सरकारद्वारे संपूर्ण पृथ्वीवर शासन करेल.

माझ्या मनात विचार आला, की जर मॉरमन लोकांच्या मते अमेरिका जगावर राज्य करणार आहे, तर मग माझ्या मायदेशाचं आणि इतर देशांचं काय होईल? एक दिवशी मला मॉरमन पंथाच्या एका व्यक्‍तीचा फोन आला. तो मिशनरी बनायचं प्रशिक्षण घेत होता. मी त्याला सहज विचारलं, की ‘समजा दुसऱ्‍या देशासोबत युद्ध झालं, तर तू तिथल्या मॉरमन लोकांशी लढशील का?’ तो ‘हो’ म्हणाला तेव्हा मला खूप आश्‍चर्य वाटलं. म्हणून मी मॉरमन शिकवणींचा आणखी खोलात जाऊन अभ्यास करू लागलो. तसंच, मॉरमन चर्चच्या धर्मगुरूंशी चर्चाही केली. मी त्यांना प्रश्‍न विचारले तेव्हा ते मला म्हणाले, या सर्व गूढ आणि गहन गोष्टी आहेत. जसजसा सत्याचा प्रकाश वाढत जाईल तसतशा या गोष्टी स्पष्ट होतील.

त्यांचं हे उत्तर ऐकून माझं समाधान झालं नाही. आणि म्हणून मी स्वतःचं परीक्षण करू लागलो की मुळात मला मॉरमन मिशनरी का बनायचंय. मला जाणवलं की त्याचं एक कारण म्हणजे, मिशनरी म्हणून काम करणं मला एक प्रकारची समाज सेवा वाटत होती. तसंच, मिशनरी बनल्यामुळे चारचौघांमध्ये आपल्याला आदर दिला जाईल असंही मला वाटत होतं. पण खरंतर देवाबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. यापूर्वी मी बऱ्‍याच वेळा बायबल वाचलं होतं, पण त्यातलं सत्य मी समजून घेतलं नव्हतं. आणि पृथ्वीसाठी आणि मानवजातीसाठी देवाचा काय उद्देश आहे याची मला जराही कल्पना नव्हती.

मला झालेला फायदा:

यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केल्यामुळे, मला बऱ्‍याच गोष्टी कळल्या. जसं की, देवाचं नाव काय आहे, मेल्यानंतर आपलं काय होतं आणि देवाच्या उद्देशात येशूची काय भूमिका आहे. आता कुठे मला कळायला लागलं होतं की बायबल किती सुंदर पुस्तक आहे. आणि यातलं सत्य दुसऱ्‍यांना सांगतानाही मला खूप आनंद व्हायचा. देव आहे हे मला आधीही माहीत होतं, पण आता जवळच्या मित्रासारखं मी त्याच्यासोबत प्रार्थनेत बोलू शकत होतो. मग १२ जुलै, २००४ ला माझा बाप्तिस्मा झाला आणि मी यहोवाचा साक्षीदार बनलो. त्याच्या सहा महिन्यांनंतर मी पूर्णवेळेची सेवा सुरू केली.

मी पाच वर्षं न्यू यॉर्कच्या ब्रूकलिनमध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात काम केलं. तिथे मला बायबल आणि बायबलवर आधारित साहित्य तयार करण्यात मदत करायची संधी मिळाली म्हणून मला खूप आनंद झाला. कारण या प्रकाशनांमुळे जगभरातल्या लाखो लोकांना फायदा होतो. आजही मी आनंदाने इतरांना देवाबद्दल शिकून घ्यायला मदत करतोय.