नीतिवचनं १८:१-२४

  • एकटं-एकटं राहणं स्वार्थीपणाचं आहे, सुज्ञपणाचं नाही ()

  • यहोवाचं नाव भक्कम बुरूज (१०)

  • संपत्ती फक्‍त काल्पनिक संरक्षण (११)

  • दोन्ही बाजूंचं ऐकून घेण्यात बुद्धी (१७)

  • मित्र भावापेक्षा जास्त जीव लावतो (२४)

१८  जो नेहमी एकटा-एकटा राहतो, तो आपल्या स्वार्थी इच्छांच्या मागे लागतो;तो सर्व प्रकारची व्यावहारिक बुद्धी नाकारतो.*  २  मूर्खाला समजशक्‍ती नकोशी वाटते;तो मनात जे काही आहे ते व्यक्‍त करायला उतावीळ असतो.+  ३  दुष्ट माणसासोबत तिरस्कारही आलाच,आणि निर्लज्जपणे वागल्याने बदनामी ठरलेली असते.+  ४  माणसाच्या तोंडचे शब्द खोल पाण्यासारखे असतात.+ बुद्धीचा झरा खळखळत्या नदीसारखा असतो.  ५  दुष्टाचा पक्ष घेणं;किंवा नीतिमानाला न्याय नाकारणं चांगलं नाही.+  ६  मूर्खाच्या शब्दांमुळे भांडण पेटतं,+त्याचं तोंड फटक्यांना आमंत्रण देतं.+  ७  मूर्खाच्या तोंडामुळे त्याचा नाश होतो,+त्याचे ओठ त्याच्या जिवासाठी पाश ठरतात.  ८  बदनामी करणाऱ्‍याचे शब्द जणू चविष्ट पदार्थाचे घास* असतात,+ते गिळल्यावर सरळ पोटात जातात.+  ९  जो कामात आळस करतो,तो नासधूस करणाऱ्‍याचा भाऊ असतो.+ १०  यहोवाचं नाव एक भक्कम बुरूज आहे.+ नीतिमान त्यात धावत जाऊन सुरक्षित राहतो.*+ ११  श्रीमंताची संपत्ती त्याच्यासाठी तटबंदी शहर असते;त्याच्या कल्पनेत ती संरक्षण देणाऱ्‍या भिंतीसारखी असते.+ १२  मन गर्विष्ठ झालं, की माणूस खाली आपटतो,+पण जो नम्र असतो त्याचा गौरव होतो.+ १३  जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो,त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.+ १४  माणसाचं मनोबल त्याला आजारपण सोसायला मदत करतं,+पण, खचलेल्या मनाचा* भार कोण वाहू शकतं?+ १५  समजूतदार माणसाचं हृदय ज्ञान मिळवतं,+आणि बुद्धिमानाचे कान ज्ञानाचा शोध घेतात. १६  माणसाने दिलेल्या भेटवस्तूमुळे त्याचा मार्ग मोकळा होतो+आणि त्याला मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं. १७  जो आपला दावा आधी मांडतो, त्याचं म्हणणं योग्य वाटतं,+पण नंतर दुसरा पक्ष येऊन त्याची उलटतपासणी करतो.*+ १८  चिठ्ठ्या टाकल्याने भांडणं मिटतात+आणि कट्टर विरोध्यांमध्ये निर्णय होतो.* १९  दुखावलेल्या भावाची समजूत घालणं, तटबंदी शहर काबीज करण्यापेक्षा कठीण असतं,+आणि काही मतभेद किल्ल्याच्या अडसरांसारखे असतात.+ २०  माणसाच्या तोंडून निघणाऱ्‍या शब्दांनी* त्याचं पोट भरेल;+त्याच्या ओठांच्या उत्पन्‍नाने तो तृप्त होईल. २१  जिभेत मरण आणि जीवन देण्याची ताकद आहे;+माणूस तिचा जसा वापर करायचं निवडतो, तसंच फळ त्याला भोगावं लागेल.*+ २२  ज्याला चांगली बायको मिळते, त्याला मौल्यवान खजिना सापडतो;+त्याच्यावर यहोवाची कृपा असते.+ २३  गरीब माणूस गयावया करून बोलतो,पण श्रीमंत माणूस कठोरपणे उत्तर देतो. २४  काही सोबती एकमेकांचा नाश करायला तयार असतात,+पण असाही एक मित्र असतो, जो भावापेक्षा जास्त जीव लावतो.+

तळटीपा

किंवा “तुच्छ लेखतो.”
किंवा “हावरटपणे गिळल्या जाणाऱ्‍या गोष्टी.”
शब्दशः “उंचावला जातो,” म्हणजे तो हाती लागणार नाही अशा ठिकाणी, सुरक्षित असतो.
किंवा “घोर निराशेचा.”
किंवा “झडती घेतो.”
शब्दशः “वेगळं करतो.”
शब्दशः “तोंडाने.”
शब्दशः “तिच्यावर प्रेम करणारा तिचं फळ खाईल.”