व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे आपण खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतो

देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना अनेक आशीर्वाद मिळतील

देवाच्या आज्ञा पाळणाऱ्‍यांना अनेक आशीर्वाद मिळतील

मोशे संदेष्ट्याने म्हटलं, की आपण जर देवाच्या आज्ञा पाळल्या तर आपल्याला त्याच्याकडून अनेक आशीर्वाद मिळतील. (अनुवाद १०:१३; ११:२७) पण, देव आपल्याला शिक्षा करेल या भीतीने आपण त्याच्या आज्ञा पाळत नाही; तर त्याच्यात असलेल्या चांगल्या गुणांमुळे आपण त्याच्या आज्ञा पाळतो. तसंच, आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि आपल्याला कोणतंही चुकीचं काम करून त्याचं मन दुखवायचं नसतं म्हणूनसुद्धा आपण त्याच्या आज्ञा पाळतो. पवित्र शास्त्रातही तेच सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे: “देवावर प्रेम करण्याचा अर्थच असा आहे, की आपण त्याच्या आज्ञांचे पालन करावे.”—१ योहान ५:३.

देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे जे अनेक आशीर्वाद आपल्याला मिळतील त्यांपैकी दोन आता आपण पाहू या.

देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे आपण समंजस होतो

“तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.”—यशया ४८:१७.

आपला सृष्टीकर्ता यहोवा देव आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो, आणि आपल्याला लागणारं मार्गदर्शन देतो. तो आपल्याकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो ते त्याने पवित्र शास्त्रात सांगितलं आहे. आपण जर त्या गोष्टी शिकलो आणि त्यांनुसार वागलो तर आपल्याला जीवनात योग्य निर्णय घेता येतील.

देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे आपण आनंदी होतो

“जे देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात तेच सुखी!”—लूक ११:२८.

आज असे लाखो लोक आहेत जे देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे खऱ्‍या अर्थाने आनंदी आहेत. स्पेनमध्ये राहणाऱ्‍या एका माणसाचा विचार करा. तो अतिशय तापट स्वभावाचा होता. आणि म्हणून तो इतरांशी खूप वाईट वागायचा; अगदी आपल्या बायकोशीसुद्धा. एकदा त्याने पवित्र शास्त्रात याकोबचा मुलगा योसेफ याच्या शांत स्वभावाबद्दल वाचलं. योसेफला गुलाम म्हणून विकलं होतं. आणि त्याच्यावर खोटा आरोप लावून त्याला तुरुंगात टाकलं होतं. पण तरीसुद्धा त्याने ती परिस्थिती खूप शांतपणे हाताळली. आणि त्याच्यावर अन्याय करणाऱ्‍यांना त्याने माफ केलं. (उत्पत्ति अध्याय ३७-४५) स्पेनमधला तो माणूस म्हणतो: “योसेफच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे मला शांत राहायला, प्रेमाने वागायला आणि रागावर ताबा मिळवायला मदत झाली. आणि म्हणून आज मी खूप आनंदी आहे.”

इतरांसोबत कसं वागायचं याबद्दल पवित्र शास्त्रात आणखी बरीच माहिती दिली आहे. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू.