व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

दुःख—देवाकडून शिक्षा आहे का?

दुःख—देवाकडून शिक्षा आहे का?

लुझीया नावाची स्त्री डाव्या पायाने लंगडते. लहान असताना तिला पोलियो झाला. हा संसर्गजन्य रोग शरीराच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतो. पुढे १६ वर्षांची असताना लुझीया जिच्याकडे काम करायची त्या स्त्रीने तिला म्हटलं: “तू तुझ्या आईचं ऐकत नव्हतीस, तिला त्रास द्यायचीस म्हणून देवाने तुला पांगळं केलं.” या गोष्टीला बरीच वर्षं झाली. पण तरीही लुझीयाला आठवतं की त्या वेळी तिला खूप वाईट वाटलं होतं.

डमॅरीस नावाच्या मुलीला कळलं की तिला मेंदूचा कॅन्सर झाला आहे, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला म्हटलं: “तू असं काय केलंस ज्यामुळे तुला असा रोग झाला? तू नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असशील. त्यामुळे देव तुला शिक्षा देत आहे.” वडिलांच्या अशा बोलण्यामुळे डमॅरीस अगदी दुःखी झाली.

अनेक वर्षांपासून लोक असं मानतात की देव लोकांना आजारपण देऊन त्यांना शिक्षा देतो. मॅनर्स ॲण्ड कस्टम्स्‌ ऑफ द बायबल लँडस्‌ या पुस्तकात असं म्हटलं आहे: ख्रिस्ताच्या काळात राहणारे अनेक लोक असा विश्‍वास करायचे की “आजारपण हे आजारी असलेल्या व्यक्‍तीने केलेल्या पापामुळे किंवा त्याच्या नातेवाइकांनी केलेल्या पापांमुळे येतं. देव आजारपण देऊन त्या व्यक्‍तीला शिक्षा द्यायचा.” मिडिव्हियल मेडिसिन अँड द प्लेग हे पुस्तक म्हणतं, की ख्रिस्ताच्या अनेक शतकांनंतर “काही लोक असा विश्‍वास करायचे की देवाने त्यांच्या पापांची शिक्षा देण्यासाठी त्यांच्यावर पीडा आणल्या.” मग याचा अर्थ असा होतो का, की १४ व्या शतकात जेव्हा युरोपमध्ये लाखो लोक मरीमुळे मेले तेव्हा दुष्ट लोकांचा न्याय करण्यासाठी देवाने ते संकट आणलं होतं? की वैद्यकीय शोधकर्त्यांच्या मते ती मरी काही जिवाणूंच्या संक्रमणामुळे आली होती? मग काहींच्या मनात असा प्रश्‍न येईल, की पापांची शिक्षा म्हणून देव खरंच लोकांना आजारी पाडतो का? *

विचार करा: जर देव रोग्यांना आजारपण आणि दुःखं देऊन शिक्षा करत असता तर येशूने त्यांना बरं केलं असतं का? मग याचा अर्थ असा झाला असता की तो देवाच्या न्यायाचा आणि धार्मिकतेचा विरोध करत आहे. (मत्तय ४:२३, २४) पण येशूने कधीच देवाचा विरोध केला नाही. तो म्हणाला: “मी नेहमी [देवाला] आवडणाऱ्‍या गोष्टी करतो.” आणि “पित्याने मला जशी आज्ञा दिली आहे, तसंच मी करत आहे.”—योहान ८:२९; १४:३१.

बायबल स्पष्टपणे सांगतं की यहोवा देव कधीच अन्याय करत नाही. (अनुवाद ३२:४) उदाहरणार्थ, देवाला जर विमानात बसलेल्या एका व्यक्‍तीला शिक्षा द्यायची असेल तर तो विमानात बसलेल्या इतर शेकडो निष्पाप जणांचा जीव घेईल का? नक्कीच नाही! देव नीतिमान आहे हे देवाच्या विश्‍वासू सेवकाला, अब्राहामला माहीत होतं. तो म्हणाला की देव कधीच “दुर्जनांबरोबर नीतिमानाचाही संहार” करणार नाही. त्याने असंही म्हटलं: “सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” (उत्पत्ति १८:२३, २५) बायबल हेसुद्धा सांगतं की “देव निःसंशय काही वाईट करत नाही” आणि त्याच्याकडून कधीच “अन्याय” होत नाही.—ईयोब ३४:१०-१२.

दुःखाबद्दल बायबल आपल्याला काय शिकवतं?

आपल्यावर जेव्हा दुःखं येतात तेव्हा देव आपल्याला कोणत्यातरी पापाची शिक्षा देत आहे, असा याचा अर्थ होत नाही. ही गोष्ट येशूलाही माहीत होती. एकदा जेव्हा येशूने आणि त्याच्या शिष्यांनी एका जन्मापासून आंधळ्या माणसाला पाहिलं तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारलं: “‘रब्बी, कोणाच्या पापामुळे हा मनुष्य असा आंधळा जन्माला आला, याने केलेल्या पापामुळे की याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे?’ येशूने उत्तर दिले: ‘याने किंवा याच्या आईवडिलांनी केलेल्या पापामुळे नाही.’”—योहान ९:१-३.

त्या काळात याबाबतीत खूप गैरसमजुती होत्या. येशूने शिष्यांना सांगितलं, की त्या आंधळ्या माणसाची अशी अवस्था त्याच्या किंवा त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे झाली नाही. हे ऐकून शिष्यांना आश्‍चर्य झालं. मग येशूने त्या आंधळ्या माणसाला बरं केलं. असं करण्याद्वारे आपल्यावर येणारं दुःख देवाकडून शिक्षा आहे हा गैरसमज त्याने दूर केला. (योहान ९:६, ७) आज ज्यांना काही गंभीर आजारांचा सामना करावा लागतो त्यांना हे जाणून सांत्वन मिळेल की त्यांच्यावर आलेल्या दुःखांसाठी देव जबाबदार नाही.

जर देव लोकांना त्यांच्या पापांसाठी शिक्षा देत होता तर मग येशूने त्यांना बरं का केलं?

ही वचनं आपल्याला आश्‍वासन देतात

  • देव “वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही.” (याकोब १:१३) आज ज्या “वाईट गोष्टींनी” म्हणजे आजारपण, दुःख आणि मृत्यू यांनी मानवजातीला शतकांपासून पिडलं आहे त्यांचा लवकरच अंत होणार आहे.

  • “आजारी असलेल्या सर्वांना [येशूने] बरे केले.” (मत्तय ८:१६) सर्व आजारी लोकांना बरं करून देवाच्या पुत्राने दाखवून दिलं की देवाचं राज्य संपूर्ण जगभरात कोणत्या गोष्टी साध्य करेल.

  • “[देव] त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल; तसंच शोक, रडणं किंवा दुःखही नसेल; कारण, आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत.”—प्रकटीकरण २१:३-५.

आपल्या सर्व दुःखांसाठी कोण जबाबदार आहे?

मग मानवजातीला एवढं दुःख आणि त्रास का सहन करावा लागत आहे? अनेक शतकांपासून मानव या प्रश्‍नाचं उत्तर शोधत आहेत. जर देव दुःखांसाठी जबाबदार नाही तर कोण आहे? या प्रश्‍नांची उत्तरं पुढच्या लेखात दिली जाणार आहेत.

^ परि. 4 प्राचीन काळी जरी देवाने काही विशिष्ट पापांसाठी लोकांना शिक्षा दिली असली, तरी बायबल कुठेच असं सांगत नाही की यहोवा आज आजारांचा किंवा दुर्घटनांचा उपयोग करून लोकांना त्यांच्या पापांसाठी शिक्षा करतो.