व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | तरुण

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

हे इतकं कठीण का आहे?

  • तुमच्या वडिलांची बदली झाल्यामुळे पूर्ण कुटुंबाला नवीन जागी राहायला जावं लागणार आहे.

  • तुमचा जिवलग मित्र फार लांब राहायला जाणार आहे.

  • तुमच्या मोठ्या भावाचं लग्न होणार आहे आणि तो वेगळा राहणार आहे.

अशा बदलांचा तुम्ही कसा सामना कराल?

जे झाड वादळात वाकतं त्याची टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. त्या झाडाप्रमाणेच, आपण आपल्या नियंत्रणा पलीकडे असलेल्या गोष्टींशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. हे आपण कसं करू शकतो, यावर चर्चा करण्याआधी आपण “बदल” म्हणजे काय याविषयी थोडं जाणून घेऊ या.

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे

बदल नेहमी होत राहतात. बायबलमध्ये मानवांबद्दल एक सत्य सांगितलं आहे, ते म्हणजे: “समय व प्रसंग सर्वांना घडतात.” (उपदेशक ९:११, पं.र.भा.) आज नाही तर उद्या तुम्हाला या सत्याला सामोरं जावं लागेल. पण प्रत्येक प्रसंग हा वाईटच असेल असं नाही. काही बदल आपल्याला कदाचित सुरुवातीला वाईट वाटतील पण ते आपल्या फायद्याचे होते हे आपल्या नंतर लक्षात येईल. खूप लोकांच्या जीवनाचा एक ठरलेला नित्यक्रम असतो आणि त्यात ते आनंदी असतात. पण जर का त्यांना कुठल्या बदलांना सामोरं जावं लागलं तर त्यांना अशा परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण जातं.

बदलांमुळे खासकरून किशोरवयीन मुलांवर ताण येऊ शकतो. असं का? अॅलेक्स * नावाचा तरुण म्हणतो, “आधीच तुम्ही तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरे जात असता आणि त्यात जर बाहेर काही बदल झाले तर त्यामुळे ताण आणखी वाढतो.”

आणखी एक कारण: जेव्हा मोठ्यांच्या जीवनात बदल घडतात तेव्हा ते त्यांच्या जीवनातील अनुभवावर अवलंबून राहतात. म्हणजेच त्यांनी असा प्रसंग याआधी कसा हाताळला याच्या आधारावर ते बदलांचा सामना करतात. पण किशोर किंवा तरुण यांच्याकडे जीवनात कमी अनुभव असल्यामुळे त्यांना ते कठीण जातं.

परिस्थितीशी जुळवून घ्यायला तुम्ही शिकू शकता. काही तरुणांनी, वाईट प्रसंगातून सावरणं आणि होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणं शिकलं आहे. असे तरुण नवीन परिस्थितीशी जुळवून तर घेतातच पण जी गोष्ट अडथळा वाटते ती आपल्यासाठी संधी कशी ठरू शकते याबद्दल देखील ते विचार करतात. अशा तरुणांवर जेव्हा दबाव येतो तेव्हा ते ड्रग्स किंवा दारू यांच्या आहारी जात नाहीत.

तुम्ही काय करू शकता

वस्तुस्थिती स्वीकारा. आपल्या जीवनावर आपलं पूर्ण नियंत्रण असावं असं आपल्या सर्वांना वाटतं. पण ते शक्य नाही. आपले मित्र दूर जातील किंवा त्यांची लग्न होतील, भावंडं मोठी होतील आणि त्यांची वेगळी कुटुंब होतील, काही परिस्थितींमुळे तुम्हाला कदाचित घर बदलावं लागेल आणि आपल्या ओळखीचं सर्वकाही सोडून किंवा मित्रांना सोडून जावं लागेल. पण नकारात्मक विचारांत बुडून जाण्यापेक्षा आपण वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे.—बायबल तत्त्व: उपदेशक ७:१०.

भविष्याकडे पाहा. भूतकाळाबद्दल विचार करत राहणं म्हणजे गाडी चालवताना मागे पाहण्यासाठी असलेल्या आरशात, एकटक बघत राहण्यासारखं आहे. कधीकधी मागे पाहणं योग्य ठरू शकतं पण तुम्हाला समोर दिसत असलेल्या रस्त्यावर लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे. आपल्या जीवनातल्या बदलांच्या बाबतीतही तेच खरं आहे. भविष्यावर लक्ष केंद्रित करा. (नीतिसूत्रे ४:२५) उदाहरणार्थ, पुढच्या महिन्यासाठी किंवा पुढच्या सहा महिन्यांसाठी तुम्ही कोणती ध्येयं ठेवू शकता? यावर विचार करा.

सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. लॉरा नावाची तरुणी म्हणते, “परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी योग्य मनोवृत्ती लागते.” ती पुढे म्हणते, “तुम्ही ज्या परिस्थितीत आहात तिची चांगली बाजू पाहा.” तुम्ही ज्या नवीन बदलाला सामोरं जात आहात त्यातून तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो यावर विचार करा.—बायबल तत्त्व: उपदेशक ६:९.

व्हिक्टोरिया नावाची तरुणी आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगते. लहान असताना तिच्या सर्व मैत्रिणी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्या. ती म्हणते “मला एकटं पडल्यासारखं वाटायचं. हे सर्व बदललं नसतं, तर बरं झालं असतं असा मी विचार करायचे. पण आता जेव्हा मी मागचा विचार करते, तेव्हा लक्षात येतं की त्यामुळे मी बरंच काही शिकले. शिकायचं म्हटलं तर बदल आलेच. त्यानंतरच मला कळलं की माझ्याकडे नवीन लोकांशी मैत्री करण्याची संधी आहे.”—बायबल तत्त्व: नीतिसूत्रे २७:१०.

भूतकाळाबद्दल विचार करत राहणं म्हणजे गाडी चालवताना, मागे पाहण्यासाठी असलेल्या आरशात एकटक बघत राहण्यासारखं आहे

दुसऱ्यांना मदत करा. बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्याचेही पाहा.” (फिलिप्पैकर २:४) दुसऱ्यांना अशा परिस्थितीचा सामना करण्यास मदत केल्याने तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा सामना करणं सोपं जाईल. १७ वर्षांची अॅना म्हणते, “मी मोठी झाल्यावर मला लक्षात आलं, की जे अशा किंवा यापेक्षाही वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत, त्यांची मी मदत करू शकते आणि असं केल्याने मला खरंच खूप फायदा झाला!” (g16-E No. 4)

^ परि. 11 या लेखात काही नावं बदलण्यात आली आहेत.