व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा

विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा

विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा

“माझ्या लग्नाचा दिवस माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा व आनंदाचा दिवस होता,” असे जॉर्डन यांनी म्हटले; त्यांच्या लग्नाला सुमारे ६० वर्ष झाली आहेत. कोणत्या कारणामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांना त्यांचा विवाह इतका महत्त्वपूर्ण वाटतो? या दिवशी पतीपत्नी एकमेकांना आणि यहोवा देवाला एक पवित्र वचन देत असल्यामुळे हा दिवस त्यांना महत्त्वाचा वाटतो. (मत्तय २२:३७; इफिसकर ५:२२-२९) त्यामुळे विवाह करू इच्छिणारी जोडपी आपला आनंद द्विगुणीत करू इच्छितात. तसेच ज्याने विवाह व्यवस्थेची सुरुवात केली त्याचा आदर करू इच्छितात.—उत्पत्ति २:१८-२४; मत्तय १९:५, ६.

विवाह करणारा वर या आनंदी प्रसंगाची प्रतिष्ठा कशी वाढवू शकतो? वधू आपल्या पतीला आणि यहोवाला आदर कशी दाखवू शकते? विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले पाहुणे आनंदात भर कशी पाडू शकतात? बायबलमधील काही तत्त्वांवर विचार केल्यास आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील. या तत्त्वांचे पालन केल्यास, या खास प्रसंगापासून सर्वांचे लक्ष विचलित करू शकणाऱ्‍या समस्या टाळण्यासही मदत मिळू शकेल.

विवाह सोहळ्याची जबाबदारी कोणाची?

अनेक देशांत यहोवाच्या साक्षीदारांचा एक सेवक विवाह सोहळ्यात कायद्याने लग्न लावून देतो. ज्या देशांत जोडप्यांना मॅजिस्ट्रेटकडून लग्नाची नोंदणी करावी लागते ते बायबल आधारित भाषणाची व्यवस्था करतील. या भाषणात सहसा नवऱ्‍या मुलाला, कुटुंबाचा मस्तक या नात्याने देवाने त्याला दिलेल्या जबाबदाऱ्‍यांवर विचार करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. (१ करिंथकर ११:३) यानुसार मग विवाह सोहळ्याची जबाबदारी नवऱ्‍या मुलाची आहे. अर्थातच, विवाह सोहळ्याच्या आणि त्यानंतरच्या रिसेप्शन पार्टीच्या सर्व व्यवस्था या सहसा बऱ्‍याच आधी केल्या जातात. पण, या व्यवस्था करणे नवऱ्‍या मुलास कठीण का वाटू शकते?

एक कारण, त्याच्या घरचे किंवा मुलीकडचे नातेवाईक विवाह व्यवस्थेवर स्वतःचा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत असतील तर नवऱ्‍या मुलास या व्यवस्था करणे कठीण जाऊ शकते. रोडॉल्फो यांनी अनेक लग्न लावली आहेत. ते म्हणतात: “कधीकधी, नातेवाईकांकडून खासकरून ते जर रिसेप्शन पार्टीचा खर्च उचलणार असतील तर नवऱ्‍या मुलावर पुष्कळ दबाव आणला जातो. विवाह सोहळा आणि रिसेप्शन अमक्या पद्धतीनेच झाले पाहिजे, यावर कदाचित ते अडून राहतील. यामुळे शास्त्रवचनांनुसार, विवाह सोहळ्याची जबाबदारी ही नवऱ्‍या मुलाची असते या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.”

गेल्या ३५ पेक्षा अधिक वर्षांपासून मॅक्स लग्न लावायचे काम करत आहेत. ते म्हणतात: “आजकाल, विवाह सोहळ्यांत आणि त्यानंतरच्या रिसेप्शन पार्टींमध्ये काय काय असले पाहिजे याबाबतीत, नवऱ्‍या मुलापेक्षा नवरी मुलगीच जास्त पुढाकार घेत असल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे. नवऱ्‍या मुलाला फार कमी बोलण्याची संधी दिले जाते.” डेव्हीड हे देखील अनेक वर्षांपासून लग्न लावायचे काम करत आहेत. ते म्हणतात: “नवऱ्‍या मुलांना कदाचित पुढाकार घेण्याची सवय नसावी व सहसा लग्नाच्या तयारींमध्ये त्यांचा इतका सहभाग नसतो.” तेव्हा, नवरा मुलगा आपली जबाबदारी परिणामकारकतेने कशी काय पूर्ण करू शकतो?

संवादाने आनंद वाढतो

विवाहाच्या तयारींची जबाबदारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरता नवऱ्‍या मुलाने परिणामकारकतेने अथवा प्रभावीपणे संवाद साधला पाहिजे. बायबल अचूकपणे म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” (नीतिसूत्रे १५:२२) परंतु, नवऱ्‍या मुलाने आधीच, विवाहाच्या तयारींविषयी नवऱ्‍या मुलीशी, कुटुंबातील सदस्यांशी व जे कोणी बायबल आधारित योग्य सल्ला देऊ शकतात अशा सर्वांशी चर्चा केली तर बऱ्‍याच निष्फळ गोष्टी टाळता येऊ शकतात.

होय, मागणी झालेल्या जोडप्याने सर्वात आधी आपल्या विवाहाच्या योजनांविषयी आणि शक्यतांविषयी एकमेकांबरोबर चर्चा करणे अतिशय महत्त्वाचे आहे. का बरे? आयव्हन आणि त्यांची पत्नी डेल्विन यांचे काय मत आहे ते ऐका. आयव्हन आणि डेल्विन यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत; आज ते दोघंही आनंदी आहेत. पण ते दोघंही भिन्‍न पार्श्‍वभूमीचे आहेत. आपल्या विवाह योजनांची आठवण करीत आयव्हन सांगतात: “माझ्या लग्नात मला काय काय हवे आहे याबाबतीत माझ्या मनात सर्व स्पष्ट होते. मला माझ्या मित्रांबरोबर रिसेप्शन पार्टी हवी होती, लग्नाचा केक हवा होता आणि माझ्या होणाऱ्‍या बायकोनं लग्नाचा पांढरा गाऊन घालावा, अशी माझी इच्छा होती. परंतु डेल्विनला लहानसा, साधासुधा लग्न समारंभ हवा होता. तिला लग्नाचा केक देखील नको होता. आणि लग्नाच्या पांढऱ्‍या गाऊन ऐवजी तिच्या मनात साधा पोशाख होता.”

भिन्‍न मते असलेल्या या दोघांचे एकमत कसे काय झाले? एकमेकांबरोबर दयाळुपणे व प्रामाणिकपणे संवाद साधण्याद्वारे. (नीतिसूत्रे १२:१८) आयव्हन पुढे म्हणतात: “आम्ही लग्नाच्या विषयावर बायबल आधारित प्रकाशनांमध्ये जसे की टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९८४ यामध्ये संशोधन केले. * या लेखातील माहितीने आम्हाला या प्रसंगाकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास मदत केली. आम्ही दोघं वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीचे होतो, त्यामुळे पुष्कळ बाबतीत आम्हाला स्वतःच्या आवडीनिवडी सोडून समझोता करावा लागला आणि आमची मनोवृत्ती बदलावी लागली.”

ॲरेट व पेनीने देखील असेच केले. आपल्या लग्नाच्या दिवसाविषयी ॲरेट म्हणतात: “पेनीनं व मी, लग्नाविषयी आमच्या वेगवेगळ्या आवडीनिवडींची चर्चा केली आणि मग एकाच मतावर आलो. आमच्या लग्नाच्या दिवसावर यहोवाचा आशीर्वाद राहावा म्हणून त्याला प्रार्थना केली. मी आमच्या दोघांच्या पालकांशी आणि मंडळीतील इतर प्रौढ विवाहित जोडप्यांशी बोललो. त्यांनी दिलेल्या सूचना खरोखरच खूप फायदेकारक होत्या. त्यामुळे आमचा लग्नाचा दिवस अतिशय सुरेख दिवस होता.”

पोशाख व केशरचनेद्वारे प्रतिष्ठा राखणे

वर आणि वधू आपल्या विवाहाच्या दिवशी सर्वात उत्तम पोशाख परिधान करू इच्छितात, ही गोष्ट अगदी समजण्याजोगी आहे. (स्तोत्र ४५:८-१५) ते चांगले कपडे घेण्यासाठी वेळ, परिश्रम, पैसा खर्च करतील. पण बायबलमधील कोणती तत्त्वे त्यांना सभ्य आणि आकर्षक असे पोशाख निवडण्यास मदत करू शकतात?

वधू आपल्या लग्नाच्या दिवशी काय घालते यावर थोडा विचार करू या. प्रत्येक व्यक्‍तीची आणि प्रत्येक राष्ट्रांतील लोकांच्या आवडी वेगळ्या असतात. परंतु बायबलमधील सल्ला सर्वांना लागू होतो. स्त्रियांनी “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे,” असे बायबल म्हणते. हा सल्ला सर्व प्रसंगांसाठी ख्रिस्ती स्त्रियांना लागू होतो. यामध्ये विवाहाच्या दिवसाचा देखील समावेश होतो. खरे पाहता, विवाह आनंदी बनवण्याकरता ‘मौल्यवान वस्त्रांची’ गरज नाही. (१ तीमथ्य २:९; १ पेत्र ३:३, ४) या सल्ल्याचे पालन केले जाते तेव्हा किती समाधान मिळते!

आधी ज्यांचा उल्लेख केला ते डेव्हीड म्हणतात: “बहुतेक जोडपी बायबल तत्त्वांचे पालन करायचा प्रयत्न करतात व यासाठी त्यांची प्रशंसा केली पाहिजे. परंतु, कधीकधी असे पाहण्यात आले आहे, की काही नवऱ्‍या मुलींचे आणि तिच्या बरोबरच्या करवलींचे पोशाख असभ्य होते; त्यांच्या पोशाखांचे गळे एकतर खूपच खोल होते नाहीतर त्यांचे पोशाख अगदीच पारदर्शक.” वर आणि वधू यांच्याबरोबर विवाहाच्या दिवसाआधी चर्चा करणारे एक प्रौढ ख्रिस्ती वडील त्यांना आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करतात. तो कसा? ते त्यांना विचारतात, की लग्नाच्या दिवशी ते घालत असलेला पोशाख सभ्य आहे का? ख्रिस्ती सभेला जातानाही ते तो पोशाख घालू शकतील का? हे कबूल आहे, की सभेला जाताना आपण नेहमी जो पोशाख घालतो त्याच्यापेक्षा लग्नाच्या दिवसाचा पोशाख वेगळा असेल, कदाचित तो स्थानीय रीतीनुसार असेल, परंतु तो, आपल्या प्रतिष्ठित ख्रिस्ती दर्जांनुरूप असला पाहिजे. जगातील काही लोकांना बायबलचे नैतिक नियम बंधनकारक वाटत असले तरीसुद्धा, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना, जग त्यांना आपल्या साच्यात कोंबण्याचा प्रयत्न करते तेव्हा जगाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून समाधान मिळते.—रोमकर १२:२; १ पेत्र ४:४.

पेनी म्हणते: “लग्नाच्या दिवशी किंवा रिसेप्शनमध्ये आपण कोणते कपडे घालणार यावर अधिक भर देण्याऐवजी ॲरेट व मी विवाहाच्या सोहळ्यावर, म्हणजे त्या प्रसंगी दिल्या जाणाऱ्‍या भाषणावर आमचे लक्ष केंद्रित केले. कारण तो लग्नाच्या दिवसातला सर्वात महत्त्वाचा भाग होता. मला आठवत असलेल्या खास गोष्टींमध्ये, मी त्या दिवशी काय घातलं होतं, किंवा काय खाल्लं होतं त्यापेक्षा मी कोणत्या लोकांबरोबर वावरत होते, आणि मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्या माझ्या प्रिय पतीबरोबर लग्न झाल्यानंतर मला किती आनंद झाला होता, हे आठवतं.” आपल्या विवाहाच्या योजना करणाऱ्‍या ख्रिस्ती जोडप्यासाठी किती हे उत्तम विचार आहेत!

राज्य सभागृह—आदरणीय स्थळ

पुष्कळ ख्रिस्ती जोडप्यांना आपला विवाह, राज्य सभागृह उपलब्ध असेल तर तिथे करण्याची इच्छा असते. राज्य सभागृह का बरे? एका जोडप्याने हे कारण सांगितले: “विवाह ही यहोवाची पवित्र व्यवस्था आहे, हे आम्ही जाणले. राज्य सभागृहात म्हणजे आपल्या उपासना स्थळी विवाह केल्याने आमच्या मनावर ही छाप पडली की आमच्या विवाहाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आम्हाला यहोवाची साथ हवी आहे. इतर लग्न कार्यालयांपेक्षा राज्य सभागृहात विवाह करण्याचा दुसरा फायदा म्हणजे, सत्यात नसलेल्या आमच्या पुष्कळ नातेवाईकांना दिसून आले, की यहोवाच्या उपासनेला आमच्या जीवनात किती महत्त्व आहे.”

राज्य सभागृहाची देखभाल करणाऱ्‍या मंडळीच्या वडिलांनी परवानगी दिल्यास लग्न करणाऱ्‍या जोडीने त्यांना, विवाहाच्या दिवशी तिथे काय काय केले जाईल याची आगाऊ सूचना द्यावी. वधू आणि वर, लग्नाचे आमंत्रण दिलेल्यांना आदर दाखवू शकतात. तो कसा? लग्नासाठी जी वेळ ठरवली आहे त्या वेळेनुसार तिथे पोहंचण्याचा दृढनिश्‍चय करण्याद्वारे. आणि सर्व काही आदरणीय पद्धतीने पार पाडले जात आहे याची देखील त्यांनी खात्री करावी. * (१ करिंथकर १४:४०) अशाप्रकारे आज अनेक जगिक विवाहांत दिसून येणारी नैतिकतेची उणीव त्यांच्या विवाह सोहळ्यांत दिसून येणार नाही.—१ योहान २:१५, १६.

विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले पाहुणे देखील विवाहाबद्दल त्यांचाही यहोवासारखा दृष्टिकोन आहे हे दाखवू शकतात. जसे की, हा विवाह इतर ख्रिस्ती विवाहांपेक्षा उठून दिसला पाहिजे, जणू काय कोणाचा विवाह सोहळा जास्त भारदस्त होता याची स्पर्धा चालली आहे, अशी मनोवृत्ती त्यांनी टाळावी. प्रौढ ख्रिश्‍चनांना याची देखील जाणीव आहे, की विवाह सोहळ्याला किंवा त्यानंतरच्या स्वागतसमारंभाला उपस्थित राहण्यापेक्षा राज्य सभागृहात होणाऱ्‍या बायबल आधारित भाषणाला उपस्थित राहणे जास्त महत्त्वाचे व लाभदायक आहे. ख्रिश्‍चन व्यक्‍तीला तिच्या वेळेनुसार व परिस्थितीनुसार, जर विवाहसोहळा आणि त्यानंतरचा स्वागत समारंभ यांपैकी केवळ एका कार्यक्रमाला उपस्थित राहता येत असेल तर, राज्य सभागृहात होणाऱ्‍या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे केव्हाही उत्तम. विल्यम नामक एक वडील म्हणतात: “लग्नाला बोलवलेले पाहुणे राज्यसभागृहात येत नाही पण नंतरच्या रिसेप्शनला येतात तेव्हा, त्यांना विवाह सोहळ्याच्या पावित्र्याची कदर नाही हे दिसून येते. आपल्याला रिसेप्शनला बोलवलेले नसले तरीसुद्धा आपण वर आणि वधूला पाठींबा देऊ शकतो आणि राज्य सभागृहातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहून नवरा-नवरीच्या सत्यात नसलेल्या नातेवाईकांना उत्तम साक्ष देऊ शकतो.”

विवाह दिवसानंतरही टिकणारा आनंद

व्यापारी जगताने विवाह सोहळ्याला जणू एक मोठा बाजार बनवला आहे. अलिकडील एका रिपोर्टनुसार, संयुक्‍त संस्थानांतील सरासरी विवाहाचा खर्च, “२२,००० डॉलर किंवा सर्वसामान्य अमेरिकन घराण्याच्या वार्षिक कमाईच्या निम्मा” इतका असतो. व्यापाऱ्‍यांच्या जाहिरातींमुळे पुष्कळ नवीन जोडपी किंवा त्यांची कुटुंबे त्या एका दिवसासाठी भरमसाट कर्ज घेतात आणि मग वर्षानुवर्षे ते फेडत राहतात. विवाहाची सुरुवात अशा ओझ्याने करणे सुज्ञपणा आहे का? ज्यांना बायबल तत्त्वे माहीत नाहीत किंवा ज्यांना त्यांची किंमत नाही त्यांना हा अवाढव्य खर्च करायला आवडेल, परंतु खऱ्‍या ख्रिश्‍चनांची गोष्ट या लोकांपासून किती निराळी आहे!

माफक प्रमाणात व खिशाला परवडेल इतक्याच पाहुण्यांना विवाहाला बोलण्याद्वारे व त्या प्रसंगाच्या आध्यात्मिक गोष्टीवर आपले लक्ष अधिक केंद्रित करण्याद्वारे अनेक ख्रिस्ती दांपत्ये आपला वेळ आणि पैसा देवाला त्यांनी केलेल्या समर्पणाच्या अनुषंगाने खर्च करू शकले आहेत. (मत्तय ६:३३) लॉईड व अलेक्झॅन्ड्राच्या उदाहरणावर विचार करा. त्यांचा विवाह झाल्यापासून म्हणजे गेल्या १७ वर्षांपासून ते पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत. लॉईड म्हणतात: “पुष्कळांना आमचा विवाह सोहळा खूपच साधासुधा वाटला असेल, पण अलेक्झॅन्ड्रा आणि मी खूश होतो. आपल्या विवाहाचा दिवस, आपल्या डोक्यावर कर्जाच्या ओझ्यासारखा नव्हे तर दोन व्यक्‍तींना खूप आनंद देणारा यहोवाच्या व्यवस्थेतील एक सोहळा असला पाहिजे, असं आम्हाला वाटलं.”

अलेक्झॅन्ड्रा म्हणते: “आमचं लग्न होण्यापूर्वी मी पायनियरींग करत होते व भारदस्त विवाहसोहळा करण्यासाठी कर्जबाजारी होऊन मी हा विशेषाधिकार गमावू इच्छित नव्हते. आमच्या लग्नाचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस होता. हा आम्हा पतीपत्नीचा सोबत राहण्याचा पहिला दिवस होता. विवाहाच्या त्या एका दिवसापेक्षा संपूर्ण वैवाहिक जीवनात यहोवाचं मार्गदर्शन कसं मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करण्याविषयी जो सल्ला देण्यात आला तो आम्ही अनुसरला. यामुळे यहोवानं आमच्या वैवाहिक जीवनाला खरोखरच खूप आशीर्वादित केलं आहे.” *

होय तुमचा विवाहाचा दिवस हा एक खास प्रसंग आहे. त्या दिवशी तुम्ही दाखवत असलेली मनोवृत्ती आणि तुमची कार्ये, ही येणाऱ्‍या दिवसांतील तुमच्या वैवाहिक जीवनासाठी जणू काय एक आदर्श ठरू शकतील. यास्तव, मार्गदर्शनासाठी यहोवावर विसंबून राहा. (नीतिसूत्रे ३:५, ६) विवाहाच्या दिवशी तुम्ही ऐकलेल्या बायबल आधारित भाषणाच्या महत्त्वाला आपल्या मनात सतत प्राधान्य द्या. पतीपत्नीला देवाने दिलेली भूमिका पार पाडत असताना एकमेकांना साथ द्या. अशाने तुम्ही तुमच्या विवाहाचा पाया मजबूत करू शकाल आणि यहोवाच्या आशीर्वादाने तुमचे जीवन केवळ तुमच्या विवाहाच्या दिवशीच नव्हे तर त्यानंतरही सुखकारक होऊ शकेल.—नीतिसूत्रे १८:२२. (w०६ १०/१५)

[तळटीपा]

^ परि. 11 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सावध राहा! फेब्रुवारी ८, २००२ मध्ये अधिक माहिती आहे.

^ परि. 20 राज्य सभागृहात होणाऱ्‍या विवाह सोहळ्याचे फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डींग करण्याची विवाह दांपत्याची इच्छा असेल तर, या प्रसंगी असे काहीही केले जाणार नाही ज्यामुळे विवाहसोहळ्याची प्रतिष्ठा कमी होईल, याची खबरदारी त्यांनी आधीच घ्यावी.

^ परि. 25 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले कौटुंबिक जीवनाचे रहस्य पुस्तकाचे पृष्ठ २६ पाहा.

[२१ पानांवरील चित्र]

आपल्या विवाहाच्या योजना करताना भावी पतीपत्नीने मनमोकळेपणाने व आदराने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे

[२३ पानांवरील चित्र]

विवाहाच्या दिवशी तुम्ही ऐकलेल्या बायबल आधारित भाषणाच्या महत्त्वाला आपल्या मनात सतत प्राधान्य द्या