व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मतभेद मिटवणे

मतभेद मिटवणे

आनंदी कौटुंबिक जीवनाचे कानमंत्र

मतभेद मिटवणे

तो: “आमचं लग्न झाल्यापासून सारा * व मी माझ्या कुटुंबासोबत माझ्या आईवडिलांच्या घरी राहात होतो. एकदा, माझ्या भावाच्या मैत्रिणीनं तिला घरी पोचवून देण्याची विनंती केली. तिला मदत करावी म्हणून मी तिला आमच्या कारमधून पोचवायला गेलो. आणि आमच्या लहान मुलालाही मी सोबत घेतलं. पण मी घरी परतलो तेव्हा सारा खूप चिडलेली होती. आमच्यात खूप वादावादी झाली आणि तिनं माझ्या घरच्या सर्व लोकांसमोर माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. तेव्हा माझाही पारा चढला आणि मी पण तिला बरंच काही भलंबुरं बोललो, ज्यामुळे ती आणखीनच बिथरली.”

ती: “आमचा मुलगा आजारी असतो. त्याला एक गंभीर रोग झाला आहे. आणि त्यावेळी आमची आर्थिक स्थितीही तितकी चांगली नव्हती. फर्नांडो त्याच्या भावाच्या मैत्रिणीसोबत आमच्या मुलाला घेऊन कारमधून निघून गेला तेव्हा मला एकाच वेळी कितीतरी गोष्टींचा राग आला होता. तो घरी परत आला तेव्हा मला कसं वाटत होतं हे मी त्याला बोलून दाखवलं. आमच्यात खूप वादावादी झाली आणि आम्ही एकमेकांना नको ते बोललो. पण नंतर मला खूप वाईट वाटलं.”

नवराबायकोत भांडण होते याचा अर्थ त्यांचे एकमेकांवर प्रेम नाही असा होतो का? मुळीच नाही! फर्नांडो व सारा एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. पण नवराबायकोचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी, प्रत्येक जोडप्यात अधूनमधून मतभेद निर्माण होतातच.

मतभेद का निर्माण होतात आणि या मतभेदांमुळे तुमचा विवाह मोडू नये म्हणून तुम्हाला काय करता येईल? विवाह मुळात देवाने निर्माण केलेली व्यवस्था असल्यामुळे, या विषयावर त्याच्या वचनात म्हणजेच बायबलमध्ये काय सांगितले आहे याचे परीक्षण करणे योग्य ठरेल.—उत्पत्ति २:२१, २२; २ तीमथ्य ३:१६, १७.

समस्या समजून घेणे

बहुतेक विवाहित जोडप्यांना एकमेकांच्या भावना दुखावण्याची इच्छा नसते. पण बायबल आपल्याला एका वस्तुस्थितीची जाणीव करून देते. ते म्हणते, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) त्यामुळे जेव्हा नवराबायकोत मतभेद होतात, तेव्हा त्यांना आपल्या भावनांवर ताबा ठेवणे जड जाऊ शकते. आणि एकदा का भांडणाला सुरुवात झाली, की नवरा व बायको एकमेकांवर ओरडू लागतात किंवा अपमानास्पद रितीने बोलू लागतात. या जरी वाईट सवयी असल्या तरी, त्याक्षणी स्वतःला आवरणे त्यांना खूप कठीण जाते. (रोमकर ७:२१; इफिसकर ४:३१) वैवाहिक जीवनात तणाव निर्माण करणाऱ्‍या आणखी कोणत्या गोष्टी आहेत?

सहसा, पती व पत्नी यांची भावना व्यक्‍त करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मिचीको सांगते, “आमचं नवीनच लग्न झालं होतं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की कोणत्याही गोष्टीबद्दल चर्चा करण्याची माझ्या पतीची पद्धत माझ्यापेक्षा अगदी वेगळी आहे. एखादी घटना घडल्यावर, मला फक्‍त काय घडलं याविषयी चर्चा करून समाधान होत नाही, तर ती घटना का घडली आणि कशी घडली याबद्दलही बोलावसं वाटतं. पण माझ्या पतीला मात्र, शेवटी काय घडलं इतकंच ऐकायचं असतं.”

मिचीकोची समस्या काही नवीन नाही. बऱ्‍याच जोडप्यांमध्ये असे दिसून येते, की एका जोडीदाराला समस्येविषयी चर्चा करण्याची इच्छा असते, तर दुसऱ्‍या जोडीदाराला चर्चा करण्यास आवडत नाही आणि तो शांतच राहणे पसंत करतो. कधीकधी तर एक जोडीदार त्या विषयावर चर्चा करण्याचा जितका जास्त प्रयत्न करतो, तितकाच दुसरा जोडीदार ती टाळण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या बाबतीत असे घडत असल्याचे तुम्हाला दिसून आले आहे का? तुमच्यापैकी एक जण नेहमी चर्चा करण्यास उत्सुक तर दुसरा चर्चा टाळण्यास उत्सुक असतो का?

आणखी एक गोष्ट विचारात घेण्याजोगी आहे. वैवाहिक जोडीदारांनी एकमेकांजवळ आपल्या भावना कशा पद्धतीने व्यक्‍त कराव्यात यासंबंधी प्रत्येकाचे मत वेगवेगळे असण्याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीवर लहानपणी वेगवेगळे संस्कार झालेले असतात. जस्टिन, ज्याचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले आहेत, तो असे म्हणतो: “माझ्या घरचे लोक अतिशय शांत स्वभावाचे होते. त्यामुळे मला इतरांजवळ आपल्या भावना व्यक्‍त करणं फार कठीण जातं. पण माझ्या बायकोला माझा हा स्वभाव विचित्र वाटतो. कारण तिच्या कुटुंबातले सर्व जण अतिशय बोलके आहेत. त्यामुळे तिला तिच्या भावना व्यक्‍त करणं कधीच कठीण जात नाही.”

समस्या सोडवण्यास प्रयत्नशील का असावे?

वैवाहिक जोडीदार एकमेकांना, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असे कितीवेळा सांगतात यावरून ते एकमेकांसोबत किती सुखी आहेत हे ठरवता येत नाही, असे संशोधकांना अभ्यासांतून दिसून आले आहे. लैंगिक संबंधांच्या बाबतीत ते एकमेकांना किती अनुरूप आहेत किंवा त्यांची आर्थिक स्थिती किती चांगली आहे, यावरूनही त्यांच्या वैवाहिक यशाचे अनुमान लावता येत नाही. तर पतीपत्नीमध्ये निर्माण होणारे मतभेद ते किती चांगल्या प्रकारे सोडवतात यावरूनच त्यांचा विवाह यशस्वी आहे किंवा नाही हे ठरवले जाऊ शकते.

शिवाय, येशूने असे म्हटले की एक स्त्री व पुरुष यांचा विवाह होतो तेव्हा मनुष्य नव्हे तर देव त्यांना जोडतो. (मत्तय १९:४-६) त्यामुळे, ज्या विवाहात देवाचा आदर केला जातो तोच उत्तम विवाह म्हणता येईल. पण जर पती आपल्या पत्नीशी प्रेमळपणे व विचारशीलपणे वागत नसेल तर यहोवा देव त्याच्या प्रार्थना ऐकणार नाही. (१ पेत्र ३:७) तसेच, जर पत्नी आपल्या पतीला मान देत नसेल तर ती खरे तर यहोवाचा अनादर करते कारण त्यानेच पतीला कुटुंबाचे मस्तक म्हणून नेमले आहे.—१ करिंथकर ११:३.

यशाचे कानमंत्र—जोडीदाराचे मन दुखावेल अशा प्रकारे बोलण्याची सवय टाळा

तुमची भावना व्यक्‍त करण्याची पद्धत किंवा लहानपणी तुमच्यावर झालेले संस्कार तुमच्या जोडीदारापेक्षा वेगळे असले तरीही, तुम्ही आपल्या जोडीदाराचे मन दुखावेल अशा प्रकारे बोलण्याची सवय टाळलीच पाहिजे. तरच तुम्ही बायबलमधील तत्त्वांचे पालन करून वैवाहिक जीवनात उद्‌भवणारे मतभेद सुरळीतपणे सोडवू शकाल. पुढील बाबतींत आत्मपरीक्षण करून पाहा:

उत्तराला प्रत्युत्तर देण्याची सवय टाळणे. “नाक पिळिल्याने रक्‍त निघते, तसा राग चेतविल्याने तंटा उपस्थित होतो,” असे एक नीतिसूत्र आहे. (नीतिसूत्रे ३०:३३) या नीतिसूत्राचे तात्पर्य काय आहे? एक उदाहरण लक्षात घ्या. एखादे जोडपे कुटुंबाचा खर्च कसा आटोक्यात आणायचा याविषयी चर्चा करायला सुरुवात करते (“आपण फाजील खर्च टाळला पाहिजे”). पण पाहता पाहता ते एकमेकांवर आरोप लावू लागतात (“तू अत्यंत बेजबाबदार आहेस”). साहजिकच, जर तुमच्या जोडीदाराने तुमच्यावर आरोप लावून ‘तुमचे नाक पिळले’ तर तुम्हालाही लगेच तसेच करावेसे वाटेल. पण उत्तराला प्रत्युत्तर दिल्याने दुसऱ्‍या व्यक्‍तीचा राग भडकतो आणि परिस्थिती आणखीनच चिघळते.

बायबलमधील एका पुस्तकाचा लेखक याकोब अशी ताकीद देतो: “पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते! जीभ ही आग आहे.” (याकोब ३:५, ६) लहानशी ठिणगी पडून मोठी आग लागावी त्याप्रमाणे, नवराबायकोने आपल्या जिभेवर नियंत्रण न ठेवल्यास, लहानसहान कारणांवरून होणाऱ्‍या मतभेदांचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात होऊ शकते. जर वारंवार अशी भांडणे होत राहिलीत तर नवराबायकोचे एकमेकांवरचे प्रेम वाढण्याऐवजी कमी होऊ शकते.

उत्तराला प्रत्युत्तर देण्याऐवजी तुम्ही येशूचे अनुकरण करू शकता का? येशूची निंदा करण्यात आली तेव्हा “त्याने उलट निंदा केली नाही.” (१ पेत्र २:२३) भांडण पेटल्यास ते मिटवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि स्वतःच्या चुकीबद्दल क्षमा मागणे.

हे करून पाहा: पुढच्या वेळी तुमच्यात भांडण झाल्यास, स्वतःला हा प्रश्‍न विचारा: ‘माझ्या जोडीदाराचं म्हणणं कबूल केल्यानं माझं काही नुकसान होणार आहे का? या भांडणासाठी काही अंशी मी पण जबाबदार आहे का? माझ्या चुका कबूल करण्यापासून कोणती गोष्ट मला रोखत आहे?’

जोडीदाराच्या भावनांना क्षुल्लक लेखण्याची सवय टाळणे. देवाचे वचन अशी आज्ञा देते: ‘तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी व्हा.’ (१ पेत्र ३:८) कधीकधी या सल्ल्याचे पालन का केले जात नाही त्यामागची दोन कारणे विचारात घ्या. एक कारण हे आहे की तुम्हाला, तुमच्या जोडीदाराच्या मनात नेमके काय चालले आहे हे कळत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या समस्येविषयी जर तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा जास्त चिंता करत असेल तर कदाचित तुम्हाला असे म्हणावेसे वाटेल, “तू उगीच एवढ्याशा गोष्टीचा बाऊ करत आहेस.” तुमचा इरादा कदाचित, आपल्या जोडीदाराला त्या समस्येकडे योग्य दृष्टिकोनाने पाहण्यास मदत करण्याचा असेल. पण अशा प्रकारे बोलल्याने तुमच्या जोडीदाराला दिलासा मिळणार नाही. कारण काही झाले तरी, आपले ज्यांच्यावर प्रेम आहे त्या लोकांना आपल्या भावना कळतात आणि त्यांना आपल्याविषयी सहानुभूती वाटते ही जाणीव होण्याची पती व पत्नी या दोघांनाही गरज असते.

जोडीदाराच्या भावना क्षुल्लक लेखण्यास प्रवृत्त करणारे आणखी एक कारण म्हणजे गर्विष्ठपणा. गर्विष्ठ व्यक्‍ती सतत इतरांची टीका करण्याद्वारे स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचढ दाखवण्याचा प्रयत्न करत असते. कधी अपमानास्पद रितीने बोलून तर कधी इतरांशी तुलना करून ती दुसऱ्‍यांना तुच्छ लेखते. येशूच्या काळातील शास्त्री व परूशी यांचे उदाहरण तुम्हाला आठवत असेल. ते इतके गर्विष्ठ होते की इतरांनी, अगदी त्यांच्याचपैकी असलेल्या दुसऱ्‍या एखाद्या परूशाने त्यांच्यापेक्षा वेगळे मत व्यक्‍त केले तर ते त्याच्याविषयी अपमानास्पद रितीने बोलून त्याला तुच्छ लेखायचे. (योहान ७:४५-५२) पण येशू मात्र त्यांच्यापेक्षा वेगळा होता. त्याच्याजवळ आपल्या भावना व्यक्‍त करणाऱ्‍यांशी तो सहानुभूतीपूर्वक वागत असे.—मत्तय २०:२९-३४; मार्क ५:२५-३४.

तुमचा जोडीदार जेव्हा त्याच्या भावना तुमच्याजवळ बोलून दाखवतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असते, याचा विचार करून बघा. तुम्हाला त्याच्या भावनांची कदर आहे हे तुमच्या शब्दांतून, तुमच्या आवाजावरून व तुमच्या चेहऱ्‍यावरील हावभावांवरून दिसून येते का? की त्याचे म्हणणे लगेच उडवून लावण्याची तुम्हाला सवय आहे?

हे करून पाहा: येत्या काही आठवड्यांत तुम्ही आपल्या जोडीदाराशी कशा प्रकारे बोलता याकडे लक्ष द्या. त्याच्या भावना तुच्छ लेखल्या जातील किंवा त्याचा अपमान होईल असे काही तुमच्या तोंडून निघाल्यास लगेच क्षमा मागा.

जोडीदार स्वार्थी आहे असा विचार करण्याची सवय. “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना?” (ईयोब १:९, १०) असे म्हणून सैतानाने ईयोबासारख्या विश्‍वासू मनुष्याच्या हेतूंविषयी संशय घेतला.

वैवाहिक जोडीदारांमध्येही एकमेकांच्या हेतूंविषयी संशय घेण्याची ही प्रवृत्ती येण्याची शक्यता आहे. असे घडू नये म्हणून त्यांनी काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी छानसे काहीतरी केले, तर त्याला आपल्याकडून नक्कीच काहीतरी हवे असेल किंवा नक्कीच हा आपल्यापासून काहीतरी लपवत असेल असा तुम्ही विचार करता का? समजा तुमच्या जोडीदाराच्या हातून एखादी चूक झाली, तर तो मुळातच स्वार्थी व बेपर्वा आहे हा आपला अंदाज खरा निघाला असा तुम्ही लगेच विचार करता का? किंवा त्याच्या मागच्या सर्व चुका आठवून तुम्ही या चुकीचीही त्यात भर घालता का?

हे करून पाहा: तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी केलेल्या कोणकोणत्या गोष्टींविषयी तुम्हाला कृतज्ञता वाटते याची एक यादी तयार करा आणि त्याने या कृती कोणत्या चांगल्या हेतूंनी प्रेरित होऊन केल्या असाव्यात याचाही त्यात समावेश करा.

प्रेषित पौलाने लिहिले: “प्रीति . . . अपकार स्मरत नाही.” (१ करिंथकर १३:४, ५) याचा अर्थ, आपल्याला जोडीदाराच्या चुका दिसत नाहीत असे नाही. पण त्याच्यावर खरे प्रेम असल्यामुळे आपण या चुका आठवणीत ठेवत नाही. पौलाने असेही म्हटले, की “प्रीति . . . सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते.” (१ करिंथकर १३:७) पण याचा अर्थ, ती व्यक्‍ती काहीही सांगितले तर ते खरे मानण्याइतकी भाबडी असते असा नसून, ती भरवसा ठेवण्यास तयार असते असा आहे. ती संशयी वृत्तीची नसते. बायबलमध्ये ज्या प्रेमाविषयी सांगण्यात आले आहे तशा प्रकारचे प्रेम बाळगणारी व्यक्‍ती क्षमाशील असते आणि इतरांचे हेतू चांगलेच असतील असा विचार करण्यास तयार असते. (स्तोत्र ८६:५; इफिसकर ४:३२) जोडीदारांनी एकमेकांबद्दल अशा प्रकारचे प्रेम बाळगल्यास ते आनंदी सहजीवन उपभोगू शकतील. (w०८ २/१)

स्वतःला हे प्रश्‍न विचारा . . .

▪ लेखाच्या सुरुवातीला ज्यांच्याविषयी सांगण्यात आले त्या जोडप्याचे काय चुकले?

▪ मला माझ्या जोडीदाराशी वागताना या चुका कशा टाळता येतील?

▪ या लेखात सांगितलेल्या कोणत्या गोष्टी करण्याचा मी विशेष प्रयत्न केला पाहिजे?

[तळटीप]

^ परि. 3 नावे बदलण्यात आली आहेत.