व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपकाराची जाणीव का बाळगावी?

उपकाराची जाणीव का बाळगावी?

उपकाराची जाणीव का बाळगावी?

“प्रिय राकेल,

मला उत्तेजन दिल्याबद्दल मी तुझे खूप खूप उपकार मानते. तुला कदाचित माहीत नसेल, पण तुझ्या लाघवी स्वभावामुळे व प्रेमळ शब्दांमुळे मला खरंच खूप मदत झाली.”—जेनीफर.

तुमच्या ध्यानीमनी नसते तेव्हा तुम्हाला कधी उपकाराचे दोन शब्द लिहिलेले कार्ड मिळाले आहे का? ते कार्ड वाचल्यावर तुम्हाला किती बरे वाटले असेल. लोकांनी आपली किंमत करावी, आपले उपकार मानावेत, ही आपल्या सर्वांची स्वाभाविक इच्छा असते.—मत्तय २५:१९-२३.

उपकाराची जाणीव बाळगल्यामुळे, जो उपकार मानतो आणि ज्याचे उपकार मानले जातात तो, अशा दोघांतील संबंध आणखी घनिष्ठ बनतात. शिवाय, उपकारांची जाणीव बाळगणारी व्यक्‍ती येशू ख्रिस्ताचा कित्ता गिरवत असते. येशूने कधीही इतरांच्या सत्कृत्यांकडे दुर्लक्ष केले नाही.—मार्क १४:३-९; लूक २१:१-४.

पण आज, फार क्वचित प्रसंगी तोंडी किंवा लेखी स्वरूपात कृतज्ञता किंवा उपकार व्यक्‍त केले जातात. बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे, की “शेवटल्या काळी” माणसे “उपकार न स्मरणारी” होतील. (२ तीमथ्य ३:१, २) आपण सावध राहिलो नाही तर, आज सर्रास दिसून येणारी कृतघ्न मनोवृत्ती, आपल्या मनात असलेल्या कृतज्ञतेच्या भावनांना गुदमरून टाकू शकेल.

पालक आपल्या मुलांना उपकारांची जाणीव बाळगण्यास कशी मदत करू शकतात? आपण कोणाचे उपकार मानले पाहिजेत? आपल्या आजूबाजूला कृतघ्न लोक असले तरी आपण कृतज्ञ का असले पाहिजे?

कुटुंबातील सदस्यांचे उपकार मानणे

आपल्या मुलांना सर्व काही देण्यासाठी पालक काबाडकष्ट करतात. पण कधीकधी, आपली कोणाला किंमत वाटत नाहीए, असे पालकांना वाटू शकते. यावर तोडगा काढण्यासाठी ते काय करू शकतात? ते पुढे दिलेल्या तीन मुख्य गोष्टी करू शकतात.

(१) स्वतःचे उदाहरण. मुलांपुढे उत्तम उदाहरण मांडणे हा त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्राचीन इस्राएलमधील एका कष्टाळू आईविषयी बायबल असे म्हणते: “तिची मुले तिची प्रशंसा करतात.” ही मुले प्रशंसा करण्यास कोणाकडून शिकली होती? त्या वचनाच्या उर्वरीत भागात या प्रश्‍नाचे उत्तर मिळते. तिथे म्हटले आहे: “तिचा पतीही तिची प्रशंसा करतो.” (नीतिसूत्रे ३१:२८, सुबोध भाषांतर.) आपल्या बोलण्याद्वारे एकमेकांची प्रशंसा करणारे पालक आपल्या मुलांना दाखवून देतात, की जेव्हा आपण कोणाची प्रशंसा करतो तेव्हा, ज्याची प्रशंसा केली जाते त्याला आनंद मिळतो, कुटुंबातील संबंध सुधारतात आणि हे प्रौढपणाचे एक लक्षण आहे.

स्टीफन नावाचा एक पिता म्हणतो: “जेवणाबद्दल माझ्या पत्नीचे आभार व्यक्‍त करण्याद्वारे मी माझ्या मुलांसाठी एक उदाहरण मांडायचा प्रयत्न केला आहे.” याचा परिणाम काय झाला? स्टीफन म्हणतो: “माझ्या दोन्ही मुली हे पाहायच्या. व आता त्याही उपकाराची जाणीव बाळगू लागल्या आहेत.” तुमचे जर लग्न झाले असेल तर तुम्ही तुमच्या सोबत्याचे आभार मानता का? घरातली रोजची बारीकसारीक कामं ज्यांच्याकडे सहसा दुर्लक्ष केले जाते अशी कामं केल्याबद्दल तुम्ही तुमच्या सोबत्याचे आभार मानता का? मुलांकडून ज्या गोष्टींची अपेक्षा केली जाते त्या गोष्टी केल्यावरही तुम्ही त्यांचे आभार मानता का?

(२) प्रशिक्षण. उपकाराच्या भावना फुलांच्या झाडांसारख्या आहेत. फुलांच्या झाडांची योग्य निगा राखली तरच ती फुलांनी बहरतील. पालक आपल्या मुलांना, उपकारांची जाणीव बाळगण्याचा गुण आपल्या अंगी बाणवण्यास व उपकार व्यक्‍त करण्यास कशा प्रकारे मदत करू शकतात? सुज्ञ राजा शलमोन याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली: “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.”—नीतिसूत्रे १५:२८.

मुलांना जेव्हा कोणीही भेट देतो तेव्हा भेट देणाऱ्‍याने केलेले प्रयत्न, त्याचे उदार मन यावर विचार करण्यास पालक आपल्या मुलांना कशा प्रकारे शिकवू शकतात? विचार करण्यास लावणे हे उत्तम प्रतीच्या मातीसारखे आहे ज्यात उपकाराच्या जाणीवेचे रोपटे वाढते. मारीया तीन मुलांची आई आहे. ती म्हणते: “आपल्याला कुणी तरी भेट देतं याचा अर्थ, भेट देणारा आपल्याविषयी विचार करत होता, त्याला आपली काळजी आहे हे दाखवण्यासाठी त्यानं आपल्याला भेट देण्याचं ठरवलं, हे मुलांना समजावून सांगायला वेळ लागतो. पण मला वाटतं, आपले प्रयत्न वाया जात नाहीत.” या अशा चर्चांमुळे मुले फक्‍त, आभार मानताना काय म्हणायचे इतकेच नव्हे तर त्यांनी असे का म्हटले पाहिजे हेही शिकतात.

विवेकी पालक आपल्या मुलांना, सर्व चांगल्या गोष्टी मिळण्यास आपण पात्र आहोत, नव्हे आपल्याला त्या मिळाल्याच पाहिजेत, अशा प्रकारचे विचार टाळण्यास मदत करतात. * नीतिसूत्रे २९:२१ (NW) मधील ताकीद जरी घरगड्यांच्या संबंधाने असली तरी त्यातील तत्त्व मुलांनाही तितक्याच जोरदारपणे लागू होते: “कोणी आपल्या चाकरास बाळपणापासून लाडाने वाढविले, तर मोठेपणी तो कृतघ्न बनेल.”

अगदी लहान मुलांनाही कृतज्ञता व्यक्‍त करण्यास कशा प्रकारे शिकवता येईल? तीन मुलांची आई असलेली लिंडा म्हणते: “आम्ही दोघं पतीपत्नी कोणाला थँक्यू कार्ड देण्यासाठी कार्ड बनवतो तेव्हा आमच्या मुलांना आम्ही त्यावर एखादं चित्र काढण्यास किंवा स्वतःचं नाव लिहिण्यास सांगून त्यांनाही कृतज्ञता व्यक्‍त करण्यात गोवतो.” कदाचित मुलांनी काढलेले चित्र अतिशय साधेसेच असेल किंवा त्यांची अक्षरे कदाचित नीट वाचता येत नसतील पण, यातून मुलांना एक महत्त्वाचे बाळकडू मिळते. ते हे, की त्यांनी संपूर्ण आयुष्यभर कृतज्ञ मनोवृत्ती दाखवली पाहिजे.

(३) जिद्द. आपण सर्व जन्मतःच पापी आहोत व या प्रवृत्तीमुळे आपण कधीकधी आभार व्यक्‍त करणार नाही. (उत्पत्ति ८:२१; मत्तय १५:१९) पण देवाच्या सेवकांना बायबल असा आग्रह करते: “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि . . . देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”—इफिसकर ४:२३, २४.

पण अनुभवी पालकांना हे माहीत आहे, की मुलांना “नवा मनुष्य धारण” करण्यास मदत करणे हे बोलायला सोपे आहे पण करायला कठीण. वर उल्लेख केलेल्या स्टीफनने म्हटले: “आमच्या मुलींना, स्वतःहून थँक्यू म्हणण्यास शिकवायला आम्हाला खूप वेळ लागला.” पण स्टीफन व त्यांच्या पत्नीने जिद्द सोडली नाही. स्टीफन म्हणतो: “बऱ्‍याच प्रयत्नांती आमच्या मुली हा धडा शिकल्या. आता त्या इतरांना स्वतःहून थँक्यू म्हणत असल्याचे आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतो.”

आपल्या मित्रांचे व शेजाऱ्‍यांचे उपकार मानण्याविषयी काय?

कधीकधी आपण कृतज्ञ असलो तरी, आभार मानायला विसरतो. याचा अर्थ आपण कृतघ्न आहोत असा नाही. पण मग, फक्‍त कृतज्ञ वाटणे पुरेसे नाही तर आपण आपली कृतज्ञता बोलून दाखवली पाहिजे. हे इतके महत्त्वाचे आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याकरता, आपण येशू आणि काही कुष्ठरोग्यांच्या संबंधाने असलेल्या एका घटनेचा विचार करूया.

जेरुसलेमला जात असताना येशूजवळ दहा कुष्ठरोगी येतात. बायबल या अहवालाविषयी असे सांगते, की या कुष्ठरोग्यांनी येशूला पाहून म्हटले: “येशू, गुरुजी, आम्हांवर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले. त्यांतील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णीत परत आला; आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता.”—लूक १७:११-१६.

दहापैकी नऊ कुष्ठरोग्यांनी परत येऊन येशूचे आभार मानले नाहीत, या गोष्टीकडे येशूने दुर्लक्ष केले का? या अहवालात पुढे असे म्हटले आहे: “तेव्हा येशूने म्हटले, दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत? ह्‍या परक्यावाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?”—लूक १७:१७, १८.

ते नऊ कुष्ठरोगी दुष्ट नव्हते. त्यांनी येशूवर विश्‍वास ठेवला होता आणि जेरुसलेममध्ये जाऊन याजकांना भेटा अशी येशूने त्यांना आज्ञा दिली तेव्हा त्यांनी ती आज्ञा आनंदाने पाळली. येशूने केलेल्या दयाळू कृत्याबद्दल त्यांना मनातल्या मनात कृतज्ञ वाटत असले तरीसुद्धा त्यांनी तसे त्याला बोलून दाखवले नाही. त्यांच्या या वागण्याने येशू नाराज झाला. आपल्याविषयी काय? आपल्याशी जेव्हा कोणी चांगल्याप्रकारे वागतो तेव्हा आपण लगेच त्याचे आभार मानतो का? आणि उचित असते तेव्हा लेखी स्वरूपात आपल्या कृतज्ञतेची पोचपावती देतो का?

बायबल म्हणते, की प्रीती “गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही.” (१ करिंथकर १३:५) तेव्हा मनापासून काढलेले आभारयुक्‍त उद्‌गार केवळ शिष्टाचाराचेच लक्षण नव्हे तर प्रीतीचा देखील पुरावा आहे. ख्रिस्ताला संतुष्ट करणारे कुष्ठरोग्यांच्या अहवालावरून एक धडा शिकतात. तो हा की लोक कोणत्याही राष्ट्राचे, वंशाचे किंवा धर्माचे असोत, त्यांना अशाप्रकारे प्रेम व कृतज्ञता दाखवण्यास ते बांधील आहेत.

स्वतःला विचारा, ‘माझ्या शेजाऱ्‍याचे, माझ्या सोबत काम करणाऱ्‍याचे, माझ्या सोबत शिकणाऱ्‍याचे, इस्पितळातील कर्मचाऱ्‍याचे, दुकानदाराचे किंवा मला मदत केलेल्या व्यक्‍तीचे आभार मानल्याचे मला आठवते का?’ एक किंवा दोन दिवसांत तुम्ही कितींदा इतरांचे आभार मानता किंवा थँक्यू कार्ड पाठवता, ते तुम्ही एका कागदावर लिहून ठेवू शकता. आणि नंतर मग तुम्हाला दिसून येईल, की कृतज्ञता व्यक्‍त करण्याच्या बाबतीत तुम्ही कोठे सुधारणा केली पाहिजे.

अर्थात, आपण सर्वांपेक्षा यहोवा देवाचे अधिक आभार मानले पाहिजेत. कारण “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” त्याच्याकडूनच आपल्याला मिळते. (याकोब १:१७) यहोवाने तुमच्यासाठी केलेल्या विशिष्ट गोष्टींबद्दल तुम्ही त्याचे अगदी मनापासून आभार केव्हा मानले होते?—१ थेस्सलनीकाकर ५:१७, १८.

इतरजण कृतघ्न असले तरी आपण कृतज्ञ का असावे?

इतर लोकांसाठी आपण काही चांगले करतो तेव्हा ते सहसा आपले आभार मानत नाहीत. तरीपण आपण कृतज्ञता का दाखवली पाहिजे? फक्‍त एका कारणाचा विचार करा.

कृतघ्न लोकांसाठी चांगले करून आपण आपला दयाळू निर्माणकर्ता यहोवा देव याचे अनुकरण करतो. लोक यहोवा देवाचे आभार मानत नाहीत म्हणून तो त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करण्याचे थांबवत नाही. (रोमकर ५:८; १ योहान ४:९, १०) तो “वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” कृतघ्न जगात राहूनही आपण कृतज्ञता दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपण, “आपल्या स्वर्गांतील पित्याचे पुत्र” आहोत हे सिद्ध करून दाखवू.—मत्तय ५:४५. (w०८ ८/१)

[तळटीप]

^ परि. 14 अनेक पालकांनी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले थोर शिक्षकाकडून शिका (इंग्रजी) हे पुस्तक आपल्या मुलांना वाचून दाखवले आहे व त्यातील धड्यांची चर्चा केली आहे. त्यातल्या १८ व्या अध्यायाचे शीर्षक, “आभार मानण्याची तुम्हाला आठवण राहते का?” असे आहे.

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

एक किंवा दोन दिवसांत तुम्ही कितींदा इतरांचे आभार मानता ते तुम्ही एका कागदावर लिहून ठेवू शकता

[२३ पानांवरील चित्र]

कृतज्ञता व्यक्‍त करण्याच्या बाबतीत आपल्या मुलांसमोर स्वतःचे उदाहरण मांडा

[२३ पानांवरील चित्र]

लहान मुलांनाही कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवता येते