व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद

पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

पौगंडावस्थेत असलेल्या मुलांबरोबर संवाद

“पूर्वी माझ्या मुलाबरोबर बोलणं खूप सोपं असायचं. पण त्याला सोळावं लागल्यापासून, तो काय विचार करत असतो हे आम्हा दोघा पतीपत्नीला समजायला मार्गच नसतो. तो स्वतःच्या खोलीत जाऊन बसतो, आमच्याबरोबर त्याचं काही बोलणंच नसतं!”—मिरियम, मेक्सिको.

“आमची मुलं लहान होती तेव्हा, मी जे काही सांगेन ते ऐकायला ती आतुर असायची. आज ते टीनएजर्स आहेत. त्यांना वाटतं, मी त्यांना समजू शकत नाही.”—स्कॉट, ऑस्ट्रेलिया.

तुमची मुलं पौगंडावस्थेत असतील तर तुम्हाला देखील कदाचित वर उल्लेख केलेल्या पालकांप्रमाणेच वाटत असेल. मुलं लहान होती तेव्हा कदाचित तुमच्यातील संवाद एका दुहेरी वाहतुकीच्या महामार्गासारखा असेल. तुमच्यातील संवाद दोन्हीकडून होत असेल. पण आता तो एकेरी झाल्याचं तुम्हाला वाटत असेल. इटलीतील ॲन्जेला नावाची एक आई म्हणते: “माझा मुलगा लहान होता तेव्हा तो मला प्रश्‍न विचारून विचारून भंडावून सोडायचा. आणि आता, मलाच स्वतःहून त्याच्याबरोबर बोलावं लागतं. मी जर स्वतःहून बोलले नाही तर आमच्यात काही बोलणंच होणार नाही.”

ॲन्जेलाप्रमाणे कदाचित तुमच्याही असं पाहण्यात आलं असेल, की एकेकाळी सतत बडबड करणारं तुमचं मूल, पौंगडावस्थेत पोहंचल्यावर मूडी किंवा एकलकोंडी बनलं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही कितीही बोलायचा प्रयत्न करत असला तरी, तुम्हाला तेवढ्यापुरती उत्तरं मिळतात. “मग, कसा होता आजचा दिवस?” असं तुम्ही तुमच्या मुलाला विचारता, तो तुटक उत्तर देतो: “छान होता.” “आज शाळेत काय काय झालं?” असं तुम्ही तुमच्या मुलीला विचारता, तर ती, आईला काय झालंय अशा आविर्भावात तुमच्याकडे पाहून म्हणते: “काही नाही.” “तू बोलत का नाहीएस,” या प्रश्‍नानं तुम्ही जर संवाद सुरू करायचा प्रयत्न केलात तर तुमचं मूल तुमच्याबरोबर बोलायचं पूर्णपणेच सोडून देईल.

अर्थात सर्वच मुलं असं बोलणं बंद करत नाहीत. पण ते जे काही बोलतात ते त्यांच्या पालकांना ऐकून वाईट वाटतं. “मी जर माझ्या मुलीला काही करायला सांगितलं, तर ती मला, ‘मी करणार नाही,’ असं सरळ म्हणायची,” अशी नायजेरियातील एडना नावाची एक आई आठवून सांगते. मेक्सिकोतील रॅमोन आपल्या सोळा वर्षीय मुलाविषयी काहीसं असंच सांगतो. तो म्हणतो: “आमचे जवळजवळ दररोजच खटके उडत असतात. मी त्याला काहीही करायला सांगितलं, की तो लगेच मला पळवाटा सांगायला लागतो.”

योग्य तो प्रतिसाद न देणाऱ्‍या पौगंडावस्थेत असलेल्या मुलांना सांभाळणं पालकांसाठी एक परीक्षाच ठरू शकते. “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (नीतिसूत्रे १५:२२) “माझा मुलगा काय विचार करतोय, हे जेव्हा मला कळत नाही तेव्हा मला इतका संताप येतो, की मला किंचाळवसं वाटतं,” असं रशियातील ॲना नावाच्या एका एकट्या आईनं कबूल केलं. ज्या काळात संवाद साधणं अतिशय महत्त्वाचं असतं अगदी त्याच काळात टीनएजर्स आणि त्यांचे पालक यांच्यातील संवाद कमी होत असल्याचं का बरं वाटतं?

सुरळीत संवादाच्या आड येणारी अडखळणं ओळखणं

संवाद म्हणजे फक्‍त बोलणं नव्हे. येशूनं म्हटलं, की “अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.” (लूक ६:४५) उत्तम संवादाद्वारे आपण इतरांकडून बऱ्‍याच गोष्टी शिकतो आणि स्वतःविषयीही बऱ्‍याच गोष्टी प्रकट करतो. स्वतःविषयी गोष्टी प्रकट करणं, पौगंडावस्थेतील तरुणांना कठीण वाटू शकतं. आपल्या मनात, हृदयात काय आहे ते सांगण्यास त्यांना जड वाटतं. पूर्वी खूप बडबड करणारं मूल, वयात आल्यावर अचानक शांत व लाजाळू बनू शकतं. आपण काल्पनिक श्रोत्यांपुढे रंगमंचावर आहोत आणि स्पॉटलाईट आपल्यावरच आहे, सर्व लोक आपल्याकडेच पाहत आहेत, असं पौगंडावस्थेतील तरुण-तरुणींना वाटत असतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे, आपल्याला कोणी पाहू नये म्हणून हे भांबावलेले तरुण स्वतःभोवती एकलकोंडेपणाचं एक कवच तयार करतात ज्यातून पालकांना सहजरीत्या आत प्रवेश करता येत नाही.

सुरळीत संवादाच्या आड येणारं आणखी एक अडखळण म्हणजे स्वतंत्रतेची त्यांच्या मनात असलेली तीव्र ओढ. हे आपण टाळू शकत नाही. तुमचं मूल वाढत आहे आणि कुटुंबाच्या सुरक्षित आच्छादनातून स्वतंत्र होण्याची प्रक्रिया ही या वाढीचा एक भाग आहे. म्हणजे आता तुमचं टीनएजर मूल घर सोडण्यास तयार आहे, असा याचा अर्थ होत नाही. अनेक मार्गांनी त्याला अथवा तिला तुमची पहिल्यापेक्षा आता जास्त गरज आहे. परंतु प्रौढावस्थेत पोचण्याआधी विलग होण्याची प्रक्रिया सुरू होत असते. प्रौढपणाचं लक्षण म्हणून पुष्कळ टीनएजर्स आपल्या मनातले विचार इतरांना सांगण्यापेक्षा स्वतःच्या मनातच ते ठेवू इच्छितात.

परंतु हो, आपल्या मित्र-मैत्रिणींच्या बाबतीत त्यांचं असं खासगी काही नसतं, बरं का. मेक्सिकोतल्या जेसिका नावाच्या आईच्या हेच पाहण्यात आलं. ती म्हणते: “माझी मुलगी लहान होती तेव्हा ती छोटे-मोठे प्रॉबल्मस्‌ मला सांगायची. आता ती तिच्या मैत्रिणींना सांगते.” तुमचं टीनएज मूल असं वागत असेल तर, पालक म्हणून त्यानं तुम्हाला नाकारलं आहे, असा चुकीचा समज करून घेऊ नका. उलट, सर्व्हेत असं दिसून आलं, की जी टीनएज मुलं, आपल्या पालकांचा सल्ला नकोए असं वरवर दाखवत असली तरी त्यांना, मित्र-मैत्रिणींच्या सल्ल्यापेक्षा आपल्या पालकांचा सल्ला अधिक पटतो. पण पालक म्हणून तुम्ही तुमच्यातील संवाद चालू ठेवण्याकरता कोणकोणते प्रयत्न करू शकता?

यशाचं गमक—अडखळणं पार करणं

समजा तुम्ही एका लांब व सरळ महामार्गावर गाडी चालवत आहात. कित्येक किलोमीटरपर्यंत तुम्हाला स्टेअरिंग जास्त वळवावी लागली नसेल. अचानक रस्ता एक अवघड वळण घेतो. तुम्हाला जर रस्त्यावरच राहायचं असेल तर तुम्हाला स्टेअरींगच्या साहाय्यानं आवश्‍यक तो बदल करावाच लागतो. त्याचप्रमाणे तुमचं मूल पौगंडावस्थेत पोचतं तेव्हाही तुम्हाला बदल करावे लागतील. तुमचं मूल वयात येण्याआधीच्या वर्षांमध्ये कदाचित त्याचं संगोपन करताना तुम्हाला फक्‍त लहान-सहान बदल करावे लागले असतील. आता तुमच्या मुलाच्या जीवनाला अचानक एक वेगळं वळण लागलं आहे म्हणून त्याचं संगोपन करण्याच्या पद्धतींमध्ये बदल करून तुम्हाला या ‘वळणावर स्टेअरींग’ वळवावी लागेल. पुढे काही प्रश्‍न दिले आहेत जे तुम्ही स्वतःला विचारून पाहू शकता.

‘माझा मुलगा अथवा मुलगी बोलायला तयार असते तेव्हा माझी तयारी असते का?’ “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय,” असं बायबलमध्ये म्हटलं आहे. (नीतिसूत्रे २५:११) या शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे यशाचं गमक आहे, वेळ. उदाहरणार्थ, शेतकरी कापणीच्या कामात घाई करू शकत नाही किंवा ते काम पुढेही ढकलू शकत नाही. कापणीचा हंगाम येईपर्यंत त्याला थांबून राहावं लागतं. पौगंडावस्थेत असलेला तुमचा मुलगा अथवा मुलगी विशिष्ट वेळीच बोलू इच्छेल. त्या संधीचा फायदा घ्या. ऑस्ट्रेलियातल्या फ्रॅन्सेस नावाच्या एका एकट्या आईनं म्हटलं: “पुष्कळदा, माझी मुलगी रात्रीच्या वेळी माझ्या बेडरूममध्ये माझ्याजवळ बोलायला यायची. आणि कधीकधी तर ती एक-एक तास बोलत बसायची. मला रात्रीचं जागरण करायला आवडत नाही. त्यामुळे मला हे खूप कठीण वाटायचं. तरीपण आम्ही मायलेकी सर्व विषयांवर उशिरापर्यंत गप्पा मारायचो.”

हे करून पाहा: तुमचं टीनएज मूल बोलायला कचरत असेल तर एकत्र मिळून पायी किंवा गाडीनं फिरायला जा, एखादा खेळ खेळा किंवा घरातलं एखादं काम जोडीनं करा. बहुतेकदा अशा प्रसंगी मुलं आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्यास प्रवृत्त होतात.

‘माझं मूल मला जे सांगायचा प्रयत्न करत आहे त्यामागच्या भावनाही मला समजतात का?’ ईयोब १२:११ मध्ये म्हटलं आहे: “जीभ अन्‍नाची रुचि घेते, तसा कान शब्दांची पारख करीत नाही काय?” पहिल्यापेक्षा आता तुम्हाला, तुमच्या मुलाच्या अथवा मुलीच्या “शब्दांची पारख” करण्याची अधिक गरज आहे. टीनएज मुलं सहसा कोणत्याही गोष्टींविषयी बोलत असताना, त्या जणू काय खऱ्‍या आहेत अशा पद्धतीनं बोलतात. जसे की, ते तुम्हाला म्हणतील, “तुम्ही मला नेहमीच कुकुलं बाळ समजता!” किंवा “तुम्ही माझं बोलणं कधीच ऐकून घेत नाही.” अशावेळी, त्यानं/तिनं वापरलेल्या “नेहमीच” व “कधीच” या शब्दांवर वाद घालत बसण्याऐवजी, त्यानं/तिनं असं मुद्दामहून म्हटलं नाही हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, “तुम्ही मला नेहमीच कुकुलं बाळ समजता!” या बोलण्याचा अर्थ “तुमचा माझ्यावर विश्‍वास नाही,” असा असेल; आणि, “तुम्ही माझं बोलणं कधीच ऐकून घेत नाही,” या बोलण्याचा अर्थ “मला नेमकं कसं वाटतंय ते मला तुम्हाला सांगायचंय,” असा असू शकेल. तुमच्या मुलाच्या शब्दांमागच्या भावना समजायचा प्रयत्न करा.

हे करून पाहा: तुमचं मूल रागाच्या भरात काहीतरी बोलून जातं तेव्हा म्हणा: “तुला राग आलाय ना, बरं सांग तुझं म्हणणं काय आहे. मी तुला कुकुलं बाळासारखं वागवतोय/वागवतेय असं तुला का वाटतं, ते मला सांग.” आणि मग त्याचं/तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्या; मधे मधे बोलू नका.

‘माझ्या टीनएज मुलाला अथवा मुलीला बळजबरीनं बोलायला लावून मी खरंतर, जो संवाद व्हायचा असतो तोही अजाणतेत थांबवतोय/थांबवतेय का?’ बायबल म्हणतं: “शांति करणाऱ्‍यासाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.” (याकोब ३:१८) तुमच्या शब्दांद्वारे व देहबोलीद्वारे ‘शांतीमय वातावरण’ तयार करा जेणेकरून तुमच्या टीनएज मुलाला अथवा मुलीला तुमच्याशी बोलावंसं वाटेल. तुम्हाला तुमच्या मुलाला मदत करायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा, कोणत्याही विषयाची चर्चा करतेवेळी, न्यायालयात साक्ष देणाऱ्‍याला उलटसुलट प्रश्‍न विचारून त्याच्यावर अविश्‍वास दाखविणाऱ्‍या वकीलासारखं वागू नका. अहन नावाचा कोरियातील एक पिता म्हणतो: “‘तू आता लहान नाहीएस,’ किंवा ‘मी तुला हजारदा सांगितलं आहे,’ यासारखी वाक्य एक विवेकी पालक बोलून दाखवणार नाही. याबाबतीत मी स्वतःच कितींदा चुकलो आहे. त्यामुळे, माझी मुलं, नुसतं माझ्या बोलण्यानंच चिडायची नाहीत तर मी त्यांना काहीही सांगितलं तरी चिडायचीत.”

हे करून पाहा: तुमच्या प्रश्‍नांना तुमचं मूल उत्तर देत नसेल तर वेगळ्या पद्धतीचा अवलंब करा. जसे की, कसा होता आजचा दिवस, असं आपल्या मुलीला विचारण्याऐवजी तुम्ही स्वतः दिवसभरात काय काय केलंत ते सांगायला सुरुवात करा आणि बघा ती खुलते का. किंवा, एखाद्या बाबतीत तुमच्या मुलीचं काय मत आहे हे तुम्हाला जर माहीत करून घ्यायचं असेल, तर असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे तुमच्या मुलीला, सगळा रोख तिच्याकडेच आहे असं वाटणार नाही. तुझ्या मैत्रिणीचं अमक्या विषयावर काय मत असेल, तिला तू काय सांगितलं असतंस, असं विचारा.

पौंगडावस्थेतील तरुणतरुणींबरोबर संवाद साधणं अशक्य नाही. फक्‍त गरजेनुसार संवाद साधण्याच्या तुमच्या शैलीत बदल करा. याबाबतीत यश मिळालेल्या इतर पालकांशी बोला. (नीतिसूत्रे ११:१४) आपल्या मुलाबरोबर अथवा मुलीबरोबर संवाद करताना “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” असा. (याकोब १:१९) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या टीनएज मुलांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याची’ कसलीच कसूर ठेवू नका.—इफिसकर ६:४. (w०८ ८/१)

स्वतःला विचारा . . .

▪ माझा मुलगा किंवा मुलगी टीनएजर बनल्यापासून त्यांच्यात कोणते बदल झालेले मला दिसत आहेत?

▪ मी माझी संवाद कौशल्ये कशी सुधारू शकतो/शकते?

[२० पानांवरील चौकट]

इतर पालकांकडून समजलेल्या काही उपयुक्‍त गोष्टी

“माझा मुलगा लोकांमध्ये असताना खूप मोकळंपणे बोलतो. मग मी काय करते, आम्ही जेव्हा दोघंच असतो तेव्हा, लोकांमध्ये असताना ज्या विषयांवर चर्चा चालली होती त्याच विषयांवर बोलते.”—ॲन्जेला, इटली.

“आम्ही जर आमच्या मुलांचं कौतुक केलं, आमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे त्यांना बोलून दाखवलं तर ते लगेच आमच्याशी खुल्या मनानं गप्पा मारू लागतात, असं आमच्या पाहण्यात आलं आहे.”—डोनीझटी, ब्राझील.

“मी अशा प्रौढांशी बोलले ज्यांना बायबल स्तरांनुसार वाढवलं होतं. शिवाय ते स्वतः टीनएजर्स होते तेव्हा त्यांना कसं वाटतं होतं व त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कशी मदत केली, हे मी त्यांना विचारलं. याचा मला बराच फायदा झाला. मला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या.”—डॉन, ब्रिटन.