व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करा | नोहा

त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले

त्याचे “सात जणांसह रक्षण” करण्यात आले

बाहेर धो-धो पाऊस पडत होता. नोहा आणि त्याचे कुटुंब जहाजाच्या एका खोलीच्या कोपऱ्‍यात बसले होते. तेल दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात त्यांचे चेहरे इतके स्पष्ट दिसत नव्हते. जहाजाच्या छप्परावरून पाणी खाली कोसळत होते आणि जहाजाच्या भिंतींवर पावसाचा जोराचा मारा होत होता; आत बसलेले हे सर्व जण डोळे फाडून तो भयानक आवाज ऐकत होते. पावसाने रौद्र रूप धारण केले होते.

नोहासोबत विश्‍वासू राहिलेली त्याची पत्नी आणि त्यांची तीन धारिष्ट मुले व त्यांच्या बायका यांच्याकडे वळून बघितल्यावर नोहाचा ऊर नक्कीच कृतज्ञतेने भरला असावा. तो कठीण समय होता खरा पण, आपण जिवापाड प्रेम करत असलेले आपले घरचे लोक आपल्यासोबत आहेत या जाणिवेने त्याला किती सांत्वन मिळाले असावे. सर्व जण सुरक्षित होते. नोहाने नक्कीच त्या वेळी आपल्या कुटुंबासोबत यहोवाला प्रार्थना केली असावी. प्रार्थना करते वेळी त्याला कदाचित आपला आवाज वाढवावा लागला असावा, कारण बाहेर पावसाचा आवाज जोर धरत होता.

नोहाचा यहोवा देवावर खूप विश्‍वास होता. म्हणूनच यहोवाने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवले. (इब्री लोकांस ११:७) पण मग पावसाला सुरुवात झाल्यावर त्यांना विश्‍वास दाखवण्याची काही गरज उरली नाही का? उलट त्यांना आता आणखी जास्त विश्‍वास दाखवण्याची गरज होती कारण त्यांना आणखी कठीण दिवसांना तोंड द्यावे लागणार होते. आज आपल्याबाबतीतही हेच खरे आहे. आपण राहत असलेल्या काळात अंदाधुंद माजली आहे. नोहाने दाखवलेल्या विश्‍वासातून आपण काय शिकू शकतो, हे आपण पाहू या.

“चाळीस दिवस व चाळीस रात्री”

बाहेर “चाळीस दिवस व चाळीस रात्री” धो-धो पाऊस पडत होता. (उत्पत्ति ७:४, ११, १२) पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढतच चालली होती. यहोवा देव एकीकडे धार्मिक लोकांचे संरक्षण करत होता आणि दुसरीकडे दुष्ट लोकांना शिक्षा देत होता, हे नोहा स्पष्टपणे पाहू शकत होता.

देवदूतांमध्ये उठलेली बंडाळी जलप्रलयामुळे थांबली होती. सैतानाच्या स्वार्थी मनोवृत्तीमुळे अनेक देवदूतांनी पृथ्वीवरील स्त्रियांबरोबर संग करण्याकरता स्वर्गातील त्यांचे “वसतिस्थान सोडले.” त्यांना झालेल्या मुलांना नेफिलीम म्हटले जात होते; कारण ही मुले दांडगी होती. (यहूदा ६; उत्पत्ति ६:४) हे सर्व पाहून सैतान मनातल्या मनात खूप खूश झाला असावा. पृथ्वीवरील यहोवाच्या सर्वश्रेष्ठ सृष्टीला अर्थात मानवजातीला भ्रष्ट करण्यात आपण यशस्वी झालो या विचाराने सैतानाला आनंद झाला होता.

पण, प्रलयाचे पाणी जसजसे वाढू लागले तसतसे या बंडखोर देवदूतांना त्यांनी धारण केलेली मानवी शरीरे सोडून देऊन पुन्हा आत्मिक जगात परतावे लागले; पण यानंतर ते पुन्हा कधीच मानवी शरीरे धारण करू शकले नाहीत. हे देवदूत जलप्रलयातून निसटले, परंतु त्यांच्या बायका आणि मुले तसेच इतर वाईट लोक मात्र त्या पाण्यात बुडून मेले.

हनोखाच्या दिवसांपासून, सुमारे सातशे वर्षांआधीच यहोवाने असा इशारा दिला होता, की तो दुष्ट व अभक्‍त लोकांचा नाश करणार आहे. (उत्पत्ति ५:२४; यहूदा १४, १५) पण लोक अधिकच बिघडत गेले; त्यांनी पृथ्वीची नासाडी केली आणि सर्वत्र हिंसा माजवली. आता मात्र ते पळ काढू शकत नव्हते. मग या दुष्ट लोकांचा नाश होत असताना नोहा आणि त्याच्या कुटुंबाला आनंद होत होता का?

बिलकुल नाही. दयेचा सागर असलेल्या यहोवालासुद्धा आनंद होत नव्हता! (यहेज्केल ३३:११) होता होईल तितक्या लोकांना वाचवण्याकरता यहोवाने सर्व काही केले होते. त्याने हनोखाला येणाऱ्‍या विनाशाचा इशारा देण्याचे काम दिले होते आणि नोहाला जहाज बांधायला सांगितले होते. नोहा आणि त्याचे कुटुंब कितीतरी वर्षांपर्यंत हे जहाज बांधत होते आणि तेही सर्व लोकांदेखत! इतकेच काय तर यहोवाने नोहाला नीतिमत्त्वाचा उपदेशही द्यायला सांगितले होते. (२ पेत्र २:५) नोहाने त्याच्या आधी होऊन गेलेल्या हनोखाप्रमाणे लोकांना येणाऱ्‍या नाशाविषयीची ताकीद दिली होती. पण लोकांची काय प्रतिक्रिया होती? स्वर्गातून हे सर्व पाहत असलेल्या येशूने नंतर नोहाच्या दिवसांतील लोकांबद्दल असे म्हटले: “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत” ते वाईटच वागत राहिले.—मत्तय २४:३९.

नोहा आणि त्याचे कुटुंब जहाजात गेल्यानंतर यहोवाने त्याचे दार बंद केले. पहिल्या ४० दिवसांपर्यंत यांना कसे वाटले असावे, याची कल्पना करा. दिवसरात्र पावसाची धार चालू होती. हळूहळू जहाजातील हे आठही जण, एकमेकांची काळजी घेणे, घर आवरणे, प्राण्यांना चारा-पाणी देणे यांसारख्या कामात व्यस्त झाले असावेत. आणि एके दिवशी अचानक, जहाज हादरले आणि हेलकावे खाऊ लागले. ते पाण्यावर तरंगू लागले होते! “पाणी वाढल्यामुळे तारु जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले.” (उत्पत्ति ७:१७) सर्वसमर्थ यहोवा देवाच्या शक्‍तीचे हे अद्‌भुत प्रदर्शन होते!

यहोवाने आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवल्याबद्दल तसेच, जहाजाच्या बाहेर नाश झालेल्या लोकांवर यहोवाने दया दाखवून त्यांना इशारा देण्याकरता आपला उपयोग केल्याबद्दल नोहाला कृतज्ञ वाटले असावे, यात काही शंकाच नाही. आपण लोकांना इतके जीव तोडून सांगतोय पण त्याचा काहीच उपयोग होत नाही, असे कदाचित नोहाला त्या वेळी वाटले असावे. लोक त्याच्याकडे मुळीच लक्ष देत नव्हते. जरा विचार करा, नोहाच्या घरच्यांनीसुद्धा त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. जलप्रलयाआधी त्याचे भाऊ, बहिणी, भाचे-भाच्या, पुतणे-पुतण्या जिवंत होते; पण त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्‍त कोणीही त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नव्हते. (उत्पत्ति ५:३०) पण या लोकांना आपण, त्यांना त्यांचा जीव वाचवण्याची संधी दिली होती, या विचाराने नोहा आणि त्याच्या कुटुंबाला आता जहाजात सांत्वन मिळत असावे.

नोहाच्या दिवसांत यहोवा जसा होता तसाच आजही आहे. (मलाखी ३:६) येशूने म्हटले होते, की आपल्या काळातील परिस्थिती “नोहाच्या दिवसांत” होती तशीच असेल. (मत्तय २४:३७) आपण राहत असलेला काळ हा उल्लेखनीय काळ आहे. भ्रष्ट व्यवस्थिकरणाचा नाश होईल तेव्हा या उलथापालथीच्या काळाचा अंत होणार आहे. आज देवाचे लोकही ऐकू इच्छिणाऱ्‍या सर्वांना जीवन वाचवण्याचा संदेश सांगत आहेत. तुम्ही स्वीकाराल का हा संदेश? आणि तुम्ही जर तो स्वीकारला असेल तर तुम्ही इतरांनाही तो सांगाल का? नोहाने व त्याच्या कुटुंबाने या बाबतीत आपल्या सर्वांपुढे छान उदाहरण मांडले आहे.

“पाण्यातून वाचवण्यात आले”

पृथ्वीवरील त्या महासागरात ते जहाज तरंगत होते. तरंगत असताना, लाकडाचा कर्कश आवाज ऐकू येत असावा. बाहेर उसळणाऱ्‍या मोठमोठ्या लाटा पाहिल्यावर नोहाच्या मनात, हे जहाज पाण्यात टिकेल का, अशी शंकेची पाल चुकचुकली असावी का? आजच्या टीकाकारांच्या मनात चुकचुकली असावी, पण नोहाच्या मनात जराही शंका नव्हती. ज्याने या विश्‍वाला, पृथ्वीला आणि तिच्यावरील जिवांना बनवले आहे तो हे जहाज सुरक्षित ठेवण्यास समर्थ नव्हता का? नक्कीच होता! बायबलमध्ये म्हटले आहे: नोहाने “विश्‍वासाने तारू तयार केले.” (इब्री लोकांस ११:७) कोणावर विश्‍वास होता त्याचा? नोहा आणि त्याच्या कुटुंबाला जलप्रलयातून सुखरूप बाहेर आणायचा यहोवाने एक करार केला होता. (उत्पत्ति ६:१८, १९) आणि नोहाला यहोवाच्या या करारावर पूर्ण भरवसा होता. म्हणूनच त्याला आणि त्याच्या कुटुंबाला “पाण्यातून वाचवण्यात आले.”—१ पेत्र ३:२०.

चाळीस दिवस आणि चाळीस रात्र थांबण्याचे कसलेही नाव न घेणारा पाऊस एकदाचा थांबला. आपल्या कॅलेंडरनुसार तो दिवस, इ.स.पू. २३७० सालच्या डिसेंबर महिन्यातला होता. पण जहाजावर असलेल्या नोहाच्या कुटुंबाची परीक्षा येथेच थांबणार नव्हती. जिवंत प्राणी घेऊन तरंगत असलेले ते जहाज समुद्रमय झालेल्या पृथ्वीवर एकमेव जहाज होते; आणि पाण्याची पातळी तर डोंगरांच्याही वर गेली होती. (उत्पत्ति ७:१९, २०) प्राण्यांना खाऊ-पिऊ घालण्याचे, त्यांना स्वच्छ व निरोगी ठेवण्याचे कष्टाचे काम नोहाने व त्याच्या पुत्रांनी अर्थात शेम, हाम व याफेथ यांनी केले असावे. यहोवा देवाने त्या जंगली प्राण्यांना जहाजात शांतीने जायला लावले होते आणि प्रलयादरम्यानही तोच त्यांना शांतीने राहण्यास लावत असावा. *

असे दिसते, की नोहाने इत्थंभूत माहिती म्हणजे, कोणत्या दिवशी काय झाले ते सर्व अगदी तपशीलवारपणे लिहून ठेवले. त्यावरून कळते, की पावसाला सुरुवात कोणत्या दिवशी झाली व तो केव्हा थांबला. त्यावरून हेही कळते, की ही पृथ्वी १५० दिवसांसाठी जलमय झाली होती. नंतर हळूहळू हे पाणी ओसरू लागले. आणि एके दिवशी, ते जहाज “अरारात पर्वतावर” म्हणजे आजच्या आधुनिक दिवसांतील टर्की येथे स्थिरावले. तो इ.स.पू. २३६९ सालचा एप्रिल महिना असावा. ७३ दिवसांनंतर म्हणजे जून महिन्यात डोंगरमाथे दिसू लागले. तीन महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबर महिन्यात नोहाने जहाजाच्या छताकडची एक बाजू उघडण्याचे ठरवले. हे काम वाटते तितके सोपे नसले तरी, बाहेरून जेव्हा प्रकाश व ताजी हवा आत आली असावी तेव्हा नोहाचे मन प्रफुल्लित झाले असावे. याच्या आधी नोहाने बाहेरचे वातावरण सुरक्षित व राहण्याजोगे आहे किंवा नाही याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याने आधी एक कावळा बाहेर सोडला. पण तो कावळा यायचा आणि पुन्हा जायचा. कदाचित तो जहाजाच्या छतावर बसत असावा. नंतर मग नोहाने एक कबुतर बाहेर सोडले. त्या कबुतरालाही बसायला जागा न मिळाल्यामुळे तेही पुन्हा नोहाकडे आले.—उत्पत्ति ७:२४–८:१३.

बिकट परिस्थितीतही नोहाने मात्र कौटुंबिक उपासनेला प्रथम स्थान दिले यात शंका नाही

नोहाला दररोजची कामे करावी लागत होतीच, पण आध्यात्मिक गोष्टींना मात्र त्याने नेहमी पहिले स्थान दिले. प्रार्थना करायला व आपला स्वर्गीय पिता आपले कसे संरक्षण करत आहे यावर बोलायला नोहाचे कुटुंब नेहमी एकत्र जमत असावे, याची आपण कल्पना करू शकतो. नोहाने प्रत्येक महत्त्वपूर्ण निर्णय यहोवाच्या संमतीनेच घेतला. जहाजात जाऊन एक वर्ष झाले होते आणि बाहेरची “जमीन खडखडीत वाळली” होती तरीसुद्धा त्याने स्वतःहून जहाजाचे दार उघडून सर्व प्राण्यांना बाहेर काढले नाही. (उत्पत्ति ८:१४) तो यहोवाकडून सूचना मिळण्याची वाट पाहत राहिला!

आजचे कुटुंबप्रमुख या विश्‍वासू मनुष्याकडून बरेच काही शिकू शकतात. नोहा शिस्तप्रिय, मेहनती, सहनशील व जागरूक होता. त्याला ज्यांचा सांभाळ करायचा होता त्यांना त्याने सुरक्षित ठेवले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याने सर्व गोष्टीत यहोवा देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिले. या बाबतीत नोहाच्या विश्‍वासाचे अनुकरण केल्यास आपल्यामुळे आपल्या प्रिय जनांनाही आशीर्वाद मिळतील.

“तारवातून बाहेर निघ”

यहोवाने सरतेशेवटी नोहाला आज्ञा दिली: “तू आपली बायको, पुत्र व सुना यांस घेऊन तारवातून बाहेर निघ.” नोहा आणि त्याचे कुटुंब जहाजाच्या बाहेर गेले आणि त्यांच्या पाठोपाठ सर्व प्राणी गेले. कसे गेले? एकमेकांना ढकलत, तुडवत बाहेर पडले का? मुळीच नाही. अहवालात म्हटले आहे, की ते “आपापल्या जातीप्रमाणे” तारवातून बाहेर निघाले. (उत्पत्ति ८:१५-१९, पं.र.भा.) जहाजाच्या बाहेर जमिनीवर पाय टेकल्याबरोबर बाहेरची स्वच्छ ताजी हवा त्यांच्या फुप्फुसात भरली. अरारात पर्वताच्या माथ्यावरून नोहा आणि त्याचे कुटुंब खाली एका स्वच्छ पृथ्वीकडे पाहत उभे राहिले असावेत. तिथे कोणी नेफिलीम नव्हते, कसलाही हिंसाचार नव्हता, कोणी बंडखोर देवदूत नव्हते किंवा दुष्ट लोकांचा समाज नव्हता! * मानवजातीला पुन्हा एकदा यहोवाने नव्याने सुरुवात करून दिली होती.

नोहाला आधी काय करायचे ते माहीत होते; म्हणजे यहोवाचे आभार मानायला तो विसरला नाही. त्याने लगेच, एक वेदी बांधली आणि जहाजात त्याने आणलेल्या “सातसात” अशा यहोवाच्या नजरेत शुद्ध असलेल्या प्राण्यांतून काही प्राणी घेतले आणि त्यांचे “होमार्पण” केले. (उत्पत्ति ७:२; ८:२०) यहोवा या उपासनेमुळे संतुष्ट झाला का?

नक्कीच झाला. कारण यहोवाने त्या होमार्पणाचा “सुवास” घेतला, असे बायबलमध्ये म्हटले आहे. जलप्रलयाआधीच्या मानवजातीने हिंसाचार करून देवाचे मन दुःखी केले होते. पण आता, त्याची इच्छा पूर्ण करण्याचा निश्‍चय केलेल्या या विश्‍वासू कुटुंबाला पाहून तो अतिशय संतुष्ट झाला. त्यांनी परिपूर्ण बनावे, अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करत नव्हता. कारण, तेच वचन पुढे कबूल करते, की “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.” (उत्पत्ति ८:२१) मानवजातीबद्दल यहोवाने आणखी सहनशीलता कशी दाखवली ते आपण पुढे पाहू या.

देवाने भूमीला दिलेला शाप काढला. आदाम आणि हव्वेने बंड केले तेव्हा देवाने भूमीला शाप दिला असल्यामुळे, मातीतून उपज काढणे सोपे नव्हते. नोहाचा बाप लामेख याने आपल्या पुत्राचे नाव नोहा असे ठेवले. नोहाचा अर्थ बहुधा, “आराम” किंवा “दिलासा” असा होतो. आणि लामेखाने असेही भाकीत केले, की नोहा मानवजातीला या शापातून आराम देईल. नोहाला जेव्हा जाणवले, की तो ही भविष्यवाणी पूर्ण होताना पाहील आणि त्याचे घरचे जेव्हा पृथ्वीची मशागत करतील तेव्हा ती चांगला उपज देईल, तेव्हा त्याला खूप आनंद झाला असावा. म्हणूनच तर तो शेती करू लागला!—उत्पत्ति ३:१७, १८; ५:२८, २९; ९:२०.

नोहाने आणि त्याच्या कुटुंबाने जहाजातून बाहेर आल्यावर एका स्वच्छ पृथ्वीवर पाऊल टाकले

यासोबतच यहोवाने नोहाच्या सर्व वंशजांना काही स्पष्ट व साधे-सोपे नियम दिले ज्यांचा त्यांना फायदा होणार होता. यात, हत्या व रक्‍ताचा गैरवापर करण्याबद्दलचा नियम होता. तसेच देवाने मानवाजातीबरोबर एक करारसुद्धा केला. पृथ्वीवरील जीवनाचा नाश करण्याकरता पुन्हा कधीच जलप्रलय आणणार नाही, असे त्याने वचन दिले. हे वचन तो पूर्ण करेल, हे सिद्ध करण्यासाठी त्याने मानवजातीला एका अप्रतिम चमत्काराची झलक दाखवली. त्याने आकाशात एक मेघधनुष्य दाखवला. आजही, आपण जेव्हा मेघधनुष्य पाहतो तेव्हा आपल्याला यहोवाने दिलेल्या वचनाचा दिलासा मिळतो.—उत्पत्ति ९:१-१७.

नोहाची गोष्ट केवळ एक दंतकथा म्हणून सांगितली जात असेल तर ती, “आणि शेवटी मेघधनुष्य येऊन सर्व काही व्यवस्थित झाले,” एवढ्यावरच थांबली असती. पण नोहा एक खरा मनुष्य होता आणि त्याचे जीवन इतके सोपे नव्हते. त्या दिवसात मानवाचे आयुष्यमान जास्त असल्यामुळे, नोहा प्रलयानंतर आणखी ३५० वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी पुष्कळ काही सोसावे लागले. एके प्रसंगी दारूच्या नशेत त्याच्या हातून एक गंभीर पाप घडले. आणि त्याचा नातू कनान याने जेव्हा नोहापेक्षाही गंभीर पाप केले तेव्हा या पापात आणखीच भर पडली. या पापामुळे कनानच्या कुटुंबाला खूप दुःखद परिणाम भोगावे लागले. पुढे जाऊन निम्रोदाच्या दिवसांत लोक मूर्तिपूजेकडे वळाले, हिंसाचार करू लागले; आणि हे सर्व नोहाने पाहिले. पण, त्याचा मुलगा शेम हा मात्र आपल्या कुटुंबासाठी विश्‍वासाचे उत्तम उदाहरण ठरला.—उत्पत्ति ९:२१-२८; १०:८-११; ११:१-११.

नोहाप्रमाणे आपणसुद्धा, जीवनात कितीही समस्या आल्या तरी, विश्‍वासू राहिले पाहिजे. आपल्या आजूबाजूचे लोक खऱ्‍या देवाकडे दुर्लक्ष करतात किंवा त्याची सेवा करायचे सोडून देतात तरीसुद्धा आपण मात्र नोहाप्रमाणे धीर दाखवला पाहिजे. आणि यहोवा आपल्याला त्याचे प्रतिफळ देईल. येशू ख्रिस्तानेही असे म्हटले: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”—मत्तय २४:१३. ▪ (w१३-E ०८/०१)

^ देवाने कदाचित जंगली प्राण्यांना निष्क्रियावस्थेत म्हणजे, अर्धवट बेशुद्ध केले असावे, व त्यामुळे त्यांना खाण्याची इतकी गरज भासली नसावी, अशी शक्यता काहींनी व्यक्‍त केली आहे. त्याने खरोखरच असे केले किंवा नाही हे आपल्याला माहीत नाही. पण, त्या सर्वांना त्याने सुरक्षित ठेवून आपले वचन पाळले.

^ संपूर्ण पृथ्वीच जलमय झाली होती तर, मूळ एदेन बागेचे नामोनिशाणही त्यात मिटले असावे. आणि असे जर झाले असेल तर मग, एदेन बागेच्या द्वारापाशी जे करुब त्या बागेची राखण करीत उभे होते कदाचित त्यांचीही ती १६०० वर्षांची कामगिरी संपली असावी व ते पुन्हा स्वर्गात गेले असावेत.—उत्पत्ति ३:२२-२४.