व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ३

काही मानव जलप्रलयातून बचावतात

काही मानव जलप्रलयातून बचावतात

देव दुष्ट जगाचा नाश करतो पण नोहा व त्याच्या कुटुंबाचे रक्षण करतो

पृथ्वीवर मानवजात वाढत गेली तसे पाप व दुष्टाईही झपाट्याने वाढत गेली. त्याकाळी देवाविषयीची साक्ष देणारा एकच संदेष्टा हयात होता. त्याचे नाव हनोख. देव अभक्‍तांचा नाश करणार आहे असे तो लोकांना सांगत राहिला. तरीसुद्धा, दुष्टाई कमी होण्याऐवजी आणखीनच वाढली. याचे कारण म्हणजे, काही देवदूतांनी यहोवाच्या विरोधात बंड करून स्वर्गातील आपले स्थान सोडून दिले. त्यांनी आपल्या स्वार्थी वासना तृप्त करण्यासाठी पृथ्वीवर येऊन मनुष्याचे रूप धारण केले व स्त्रियांशी विवाह केले. या अनैसर्गिक संयोगामुळे त्यांना झालेली मुले राक्षसांसारखी धिप्पाड व शक्‍तिशाली होती. त्यांना नेफिलिम म्हणण्यात आले आणि त्यांनी जगात आणखीनच हिंसाचार व रक्‍तपात माजवला. आपण निर्माण केलेल्या पृथ्वीची अशी अवस्था झालेली पाहून देवाला खूप दुःख झाले.

हनोखाच्या मृत्यूनंतरच्या काळात, एक मनुष्य त्या दुष्ट जगात सर्वांपेक्षा वेगळा होता. त्याचे नाव नोहा. त्याने व त्याच्या कुटुंबाने देवाच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला. देवाने त्या काळच्या दुष्ट लोकांचा नाश करण्याचे ठरवले, पण त्याला नोहाचे व पृथ्वीवरील पशुपक्ष्यांचे रक्षण करायचे होते. त्यामुळे त्याने नोहाला एक तारू म्हणजेच एक भले मोठे, लांब जहाज बांधायला सांगितले. या तारवात नोहा व त्याच्या कुटुंबाचा तसेच अनेक जातींच्या प्राण्यांचा जलप्रलयातून बचाव होणार होता. नोहाने देवाच्या आज्ञेचे पालन केले. पुढील काही दशकांत नोहा तारवाचे बांधकाम करत राहिला. पण त्यासोबतच तो “नीतिमत्त्वाचा उपदेशक” देखील होता. (२ पेत्र २:५) त्याने लोकांना जलप्रलय येणार असल्याची ताकीद दिली पण लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी, नोहा व त्याचे कुटुंब, तसेच सर्व प्राणी तारवात जाण्याची वेळ आली. त्यानंतर, देवाने तारवाचे दार बंद केले. मग, पावसाला सुरुवात झाली.

सलग चाळीस दिवस, पृथ्वीवर रात्रंदिवस मुसळधार पाऊस पडत राहिला. सबंध पृथ्वी पाण्याखाली गेली. सर्व दुष्ट लोकांचा नाश झाला. पृथ्वीवरचे सर्व पाणी ओसरण्यास बरेच महिने लागले. त्यानंतर, नोहाचे तारू एका पर्वतावर टेकले. नोहा, त्याचे कुटुंब आणि सर्व पशूपक्षी तारवातून सुखरूप बाहेर आले. एक पूर्ण वर्षभर ते तारवात राहिले होते. यहोवाचे आभार मानण्याकरता नोहाने त्याला अर्पण दिले. देवाने त्याचे अर्पण स्वीकारले आणि त्याला व त्याच्या कुटुंबाला वचन दिले की यापुढे तो कधीही जलप्रलयाने पृथ्वीवरील प्राणीमात्रांचा नाश करणार नाही. या सांत्वनदायक प्रतिज्ञेची खातरी देण्याकरता यहोवाने आकाशात सप्तरंगी मेघधनुष्य दिले, जे कायम देवाच्या प्रतिज्ञेची आठवण करून देणार होते.

जलप्रलयानंतर देवाने मानवांना काही नव्या आज्ञा दिल्या. त्याने त्यांना प्राण्यांचे मांस खाण्याची परवानगी दिली. पण मांसासोबत रक्‍त खाण्यास त्याने मनाई केली. त्याने नोहाच्या वंशजांना सबंध पृथ्वी व्यापून टाकण्याचीही आज्ञा दिली होती. पण, त्यांच्यापैकी काहींनी या आज्ञेचे उल्लंघन केले. निम्रोद नावाच्या एका माणसाच्या नेतृत्त्वाखाली काही लोकांनी मिळून बाबेल शहरात (ज्याला नंतर बॅबिलोन नाव पडले) एक भव्य बुरूज बांधण्यास सुरुवात केली. सबंध पृथ्वी व्यापून टाकण्याची जी आज्ञा देवाने दिली होती तिचा उघडपणे प्रतिकार करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यावेळी सर्व लोक एकच भाषा बोलायचे. पण, देवाने त्यांच्या भाषेत गोंधळ केला, ज्यामुळे ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. अशा रीतीने, देवाने त्याच्या आज्ञेच्या विरोधात असलेला त्यांचा बेत हाणून पाडला. एकमेकांशी बोलणे अशक्य झाल्यामुळे ते लोक बांधकाम अर्ध्यावर टाकून तेथून निघून गेले व सबंध पृथ्वीवर पसरले.

उत्पत्ति अध्याय ६ ते ११; यहूदा १४, १५ वर आधारित.