व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २२

प्रेषित निर्भयतेने प्रचार करतात

प्रेषित निर्भयतेने प्रचार करतात

छळ होत असतानाही ख्रिस्ती मंडळीची झपाट्याने वाढ होते

येशू पृथ्वीवरून वर स्वर्गात गेल्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे इ.स. ३३ मधील पेन्टेकॉस्ट या यहुदी सणाच्या दिवशी त्याचे जवळजवळ १२० शिष्य जेरूसलेममध्ये एका घरात जमले होते. अचानक सोसाट्याचा वारा सुटावा, तशा आवाजाने ते घर भरून गेले. आणि एक चमत्कार झाला. शिष्य त्यांच्यासाठी अगदीच अनोळखी असलेल्या भाषांतून बोलू लागले. या आश्‍चर्यकारक घटनांचा काय अर्थ होता? देवाने शिष्यांना पवित्र आत्मा दिला होता.

त्या वेळी जगातल्या निरनिराळ्या भागांतून लोक जेरूसलेममध्ये सण साजरा करण्यासाठी आले होते. येशूचे शिष्य आपल्या भाषेत किती सहजपणे बोलत आहेत हे पाहून ते लोक थक्क झाले! या घटनेचे स्पष्टीकरण देताना पेत्राने योएलच्या भविष्यवाणीचा उल्लेख केला, ज्यात म्हटले आहे की देव आपल्या आत्म्याचा ‘वर्षाव करेल’ आणि ज्यांच्यावर देवाचा आत्मा येईल त्यांना अद्‌भुत देणग्या प्राप्त होतील. (योएल २:२८, २९) पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडलेल्या या विलक्षण गोष्टींमुळे एक महत्त्वाचा बदल घडून आला असल्याचे सिद्ध झाले. तो म्हणजे: देवाचा अनुग्रह आता इस्राएल राष्ट्रावर नसून, नुकत्याच स्थापन झालेल्या ख्रिस्ती मंडळीवर होता. आणि देवाची स्वीकारयोग्य पद्धतीने उपासना करण्यासाठी ख्रिस्ताचे अनुयायी बनणे आता जरुरीचे होते.

दरम्यान, शिष्यांविरुद्ध छळाची लाट उसळली आणि विरोधकांनी त्यांना तुरुंगात टाकले. पण रात्री, देवदूताने तुरुंगाची दारे उघडली व शिष्यांना प्रचार कार्य करण्याची आज्ञा दिली. देवदूताने सांगितल्याप्रमाणे, दिवस उजाडताच शिष्यांनी प्रचार कार्य सुरू केले. ते मंदिरात जाऊन येशूविषयीची सुवार्ता सांगू लागले. हे पाहून त्यांचे विरोधक संतापले व त्यांनी त्यांना प्रचार कार्य बंद करण्यास बजावले. पण, प्रेषितांनी त्यांना निर्भयपणे उत्तर दिले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२८, २९.

पुढे शिष्यांचा आणखी तीव्रपणे छळ होऊ लागला. काही यहुद्यांनी स्तेफनावर देवाची निंदा करण्याचा आरोप लावून त्याला दगडमार करून ठार मारले. या घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या तार्सकर शौलाचे स्तेफनाच्या वधाला समर्थन होते. यानंतर तो ख्रिस्ताच्या अनुयायांना अटक करण्यासाठी दिमिष्कात गेला. वाटेने जात असता, अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला आणि त्याने अशी वाणी ऐकली: “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” या प्रकाशामुळे शौलाला काहीच दिसेनासे झाले. त्याने विचारले: “प्रभो, तू कोण आहेस?” त्यावर त्याला उत्तर मिळाले: “ज्या येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.”—प्रेषितांची कृत्ये ९:३-५.

या घटनेच्या तिसऱ्‍या दिवशी, शौलाला त्याची दृष्टी परत देण्यासाठी येशूने हनन्या नावाच्या एका शिष्याला त्याच्याकडे पाठवले. मग, शौलाचा बाप्तिस्मा झाला आणि तो येशूविषयी मोठ्या धैर्याने साक्ष देऊ लागला. शौलाला पुढे प्रेषित पौल म्हणून ओळखण्यात आले व तो ख्रिस्ती मंडळीचा एक आवेशी सदस्य बनला.

येशूचे शिष्य आतापर्यंत केवळ यहुद्यांना व शोमरोन्यांनाच देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत होते. पण, आता यात एक बदल होणार होता. एका देवदूताने कर्नेल्य नावाच्या एका रोमन अधिकाऱ्‍याला दर्शन दिले व प्रेषित पेत्राला बोलावणे पाठवण्यास सांगितले. इतर बांधवांसह पेत्र, कर्नेल्याच्या घरी गेला व त्याने कर्नेल्य व त्याच्या घराण्यातील सर्व लोकांना प्रचार केला. पेत्र बोलत असता, देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या त्या विदेशी लोकांवर पवित्र आत्मा आला आणि त्यांनी येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यावा असे पेत्राने त्यांना सांगितले. अशा प्रकारे, अनंतकाळचे जीवन मिळवण्याचा मार्ग आता सर्व राष्ट्रांतील लोकांकरता मोकळा झाला होता. तसेच, ख्रिस्ती मंडळी जगाच्या कानाकोपऱ्‍यात सुवार्तेचा प्रसार करण्यास सुसज्ज होती.

प्रेषितांची कृत्ये १:१–११:२१ वर आधारित.