व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय दोन

बायबल—देवाकडून आलेले पुस्तक

बायबल—देवाकडून आलेले पुस्तक
  • कोणकोणत्या कारणांमुळे बायबल हे इतर पुस्तकांपासून वेगळे आहे?

  • बायबल तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत समस्या सोडवायला मदत कसे करू शकते?

  • बायबलमधील भविष्यवाण्यांवर तुम्ही भरवसा का ठेवू शकता?

१, २. कोणकोणत्या कारणांमुळे बायबल ही देवाकडील एक आनंदविणारी भेटवस्तू आहे?

तुमच्या प्रिय मित्राकडून तुम्हाला एखादी खास भेटवस्तू मिळाल्याचे तुम्हाला आठवते का? ती भेटवस्तू पाहून तुम्ही फक्त रोमांचितच झाला नाहीत तर आनंदित देखील झाला. त्या भेटवस्तूद्वारे तुमच्या मित्राने तुम्हाला कळवले, की त्याला तुमच्या मैत्रीची किंमत आहे. तुमच्या मित्राने विचारपूर्वक पाठवलेल्या भेटवस्तूबद्दल तुम्ही न विसरता त्याचे आभार मानता.

बायबलही देवाने पाठवलेली एक भेटवस्तू आहे. याबद्दल आपण देवाचे मनापासून आभार मानले पाहिजेत. या अनोख्या पुस्तकात अशा गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे की ज्या आपल्याला त्याशिवाय माहीत झाल्या नसत्या. जसे की, लुकलुकणारे तारांगण, पृथ्वी, पहिला पुरुष आणि पहिली स्त्री, यांच्या निर्मितीविषयी त्यात सांगितले आहे. बायबलमध्ये विश्वसनीय सिद्धान्त आहेत की ज्यांचे पालन केल्यास आपल्याला जीवनात येणाऱ्या समस्यांचा व चिंतांचा सामना करायला मदत मिळू शकते. त्यात हेही सांगितले आहे, की देव आपला उद्देश कशाप्रकारे पूर्ण करणार आहे आणि पृथ्वीवर चांगली परिस्थिती तो कशी आणणार आहे. बायबल खरोखरच एक आनंदविणारी भेटवस्तू आहे!

३. यहोवाने आपल्याला बायबल दिले आहे यावरून त्याच्याबद्दल काय समजते, आणि हे आनंदित करणारे का आहे?

बायबल ही एक प्रेमळ भेटवस्तू देखील आहे. ते आपल्याला यहोवा देवाविषयी सांगते. यहोवा देवाने असे एक पुस्तक देऊन हे दाखवले आहे, की आपण त्याच्याशी परिचित व्हावे अशी त्याची इच्छा आहे. होय, बायबल तुम्हाला यहोवा देवाच्या जवळ येण्यास मदत करू शकते.

४. बायबलच्या वितरणाविषयी कोणती गोष्ट तुम्हाला प्रभावित करते?

तुमच्याकडे बायबलची एक प्रत आहे का? पुष्कळांकडे ती आहे. संपूर्ण किंवा निम्मे बायबल २,३०० पेक्षा अधिक भाषांत प्रकाशित करण्यात आले असल्यामुळे जगातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांसाठी ते उपलब्ध आहे. सरासरी दर आठवडी बायबलच्या दहा लाख प्रतींचा खप होतो! संपूर्ण बायबलच्या किंवा त्याच्या काही भागांच्या शंभर कोटी प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. खरेच, बायबलच्या तुलनेत दुसरे कोणतेच पुस्तक नाही.

“पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर” अनेक भाषांत उपलब्ध आहे

५. बायबल हे “परमेश्वरप्रेरित” आहे ते कसे?

शिवाय, बायबल हे “परमेश्वरप्रेरित” आहे. (२ तीमथ्य ३:१६) ते कसे? बायबलच याचे उत्तर देते: “पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (२ पेत्र १:२१) हे समजण्यासाठी या उदाहरणाचा विचार करा: एक उद्योगपती आपल्या सचिवाला एक पत्र लिहायला सांगतो. त्या पत्रात उद्योगपतीचे विचार आणि सूचना आहेत. त्यामुळे ते त्याचे पत्र आहे, सचिवाचे नव्हे. तसेच, बायबलमध्ये देवाचा संदेश आहे; ज्या लोकांनी ते लिहिले त्यांचे विचार त्यात नाहीत. म्हणूनच, संपूर्ण बायबल हे खरोखर “देवाचे वचन” आहे.​—१ थेस्सलनीकाकर २:१३.

सुसंगत आणि अचूक

६, ७. बायबलमधील माहितीची सुसंगतता विशेषकरून लक्षवेधक का आहे?

बायबलचे लिखाण १,६०० वर्षांच्या कालावधीत झाले. त्याचे लेखक वेगवेगळ्या काळांत हयात होते आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते. काही शेतकरी, काही कोळी, तर काही मेंढपाळ होते. इतरजण, संदेषटे, शास्ते, राजे होते. शुभवर्तमान लिहिणारा लेखक लूक एक वैद्य होता. बायबलचे लेखक वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बायबलच्या संदेशात सुसंगतता आहे. *

मानवजातीच्या समस्यांना सुरुवात कशी झाली, हे बायबलच्या पहिल्या पुस्तकात सांगितले आहे. संपूर्ण पृथ्वी परादीस अर्थात एका बागेसारखी होणार आहे, हे बायबलच्या शेवटल्या पुस्तकात सांगितले आहे. बायबलमध्ये हजारो वर्षांच्या इतिहासाचे कथन करण्यात आले आहे; हजारो वर्षांच्या कालावधीत घडलेल्या घटनांचा कोणत्या न कोणत्या प्रकारे देवाच्या उद्देशाच्या पूर्ततेशी संबंध आहे. बायबलमधील सुसंगतता प्रभावित करणारी आहे. देवाकडून आलेल्या या पुस्तकाबद्दल हीच अपेक्षा केली जाऊ शकते, नाही का?

८. बायबल हे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे हे दाखवणारी उदाहरणे द्या.

बायबल वैज्ञानिकरीत्याही अचूक आहे. ज्या काळात बायबल लिहिण्यात आले, त्या काळाच्या मानाने त्यातील माहिती अतिशय अद्ययावत होती. जसे की, लेवीय नावाच्या पुस्तकात प्राचीन इस्राएली लोकांसाठी, आजारी व्यक्तीला वेगळे ठेवण्याबाबत आणि आरोग्याबाबत नियम होते. पण आजूबाजूच्या राष्ट्रांजवळ तेव्हा या विषयांवर काहीच माहिती नव्हती. एके काळी, पृथ्वीच्या आकाराच्या बाबतीत अनेक गैरसमजुती होत्या. पण बायबलमध्ये पृथ्वी गोलाकार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. (यशया ४०:​२२, ईजी टू रीड व्हर्शन) बायबलमध्ये अचूकपणे म्हटले होते, की पृथ्वी “निराधार टांगिली आहे.” (ईयोब २६:७) अर्थात बायबल हे विज्ञानाचे पुस्तक नाही. तरीपण जेव्हा ते वैज्ञानिक गोष्टींबद्दल सांगते तेव्हा ते अचूक माहिती देते. देवाकडून आलेल्या पुस्तकाकडून आपण हीच अपेक्षा करणार नाही का?

९. (क) बायबल ऐतिहासिकदृष्ट्या बिनचूक व विश्वसनीय आहे, हे कोणकोणत्या मार्गांनी दिसून येते? (ख) बायबल लेखकांच्या प्रामाणिकपणावरून तुम्हाला बायबलविषयी काय कळते?

बायबल ऐतिहासिकदृष्ट्या देखील बिनचूक व विश्वसनीय आहे. त्यातील अहवाल तपशीलवार आहेत. त्यात फक्त लोकांची नावेच नाही तर त्यांची वंशावळ देखील दिली आहे. * जगिक इतिहासकार सहसा आपल्या लोकांच्या पराजयांचा उल्लेख करीत नाहीत. परंतु बायबलचे लेखक प्रामाणिक होते; त्यांनी आपल्या आणि आपल्या राष्ट्राच्या चुकांबद्दलही लिहून ठेवले. जसे की, बायबलमधील गणना नावाच्या पुस्तकात, मोशे हा लेखक स्वतःच्या एका गंभीर चुकीविषयी सांगतो जिच्यामुळे त्याला फार मोठी शिक्षा भोगावी लागली. (गणना २०:​२-१२) अशाप्रकारचा प्रामाणिकपणा इतर ऐतिहासिक अहवालांत क्वचितच पाहायला मिळतो. परंतु बायबलमध्ये तो पाहायला मिळतो कारण बायबल हे देवाकडून आलेले पुस्तक आहे.

व्यवहारोपयोगी पुस्तक

१०. बायबल एक व्यवहारोपयोगी पुस्तक आहे, यात आश्चर्य करण्यासारखे का नाही?

१० बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलेले असल्यामुळे ते “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) होय, बायबल एक व्यवहारोपयोगी पुस्तक आहे. ते मानवी स्वभावाचे बारकाव्यांनिशी दर्शन घडवते. कारण, त्याचा लेखक यहोवा देव आपला निर्माणकर्ता आहे! तो आपली विचारसरणी, आपल्या भावना आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे ओळखतो. शिवाय, आनंदी होण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे हे त्याला माहीत आहे. आपण कोणते मार्ग टाळले पाहिजेत हेही त्याला माहीत आहे.

११, १२. (क) येशूने डोंगरावरील प्रवचनात कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली? (ख) बायबलमध्ये आणखी कोणत्या व्यवहारोपयोगी गोष्टींची चर्चा केली आहे आणि त्यातील सल्ला कधीही कालबाह्य का होत नाही?

११ मत्तय अध्याय ५ ते ७ मधील डोंगरावरील प्रवचन म्हटल्या जाणाऱ्या येशूच्या भाषणाचा विचार करा. हे प्रवचन, शिकवण देण्याबाबत एक सर्वोत्कृष्ट नमुना होते. या प्रवचनात, खरा आनंद मिळवण्याचा मार्ग काय आहे, आपापसांतील मतभेद कसे सोडवायचे, प्रार्थना कशी करायची, भौतिक गोष्टींबद्दल उचित दृष्टिकोन कसा बाळगायचा, यांसारख्या अनेक विषयांवर येशू बोलला. येशूचे हे शब्द तेव्हा जितके शक्तिशाली व व्यवहारोपयोगी होते तितकेच आजही आहेत.

१२ काही बायबल तत्त्वे, कौटुंबिक जीवन, कामाच्या सवयी, इतरांबरोबरचा नातेसंबंध याबाबतीत आहेत. बायबलमधील सिद्धान्त सर्व लोकांना लागू होतात आणि बायबलचा सल्ला नेहमी फायदेकारक असतो. यशया नाव असलेल्या देवाच्या एका संदेष्ट्याकरवी देवाचे वचन सारांशात बायबलमधील बुद्धीबद्दल असे म्हणते: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो.”​—यशया ४८:१७.

भविष्यवाणीचे पुस्तक

बायबल लेखक यशया याने बॅबिलोनच्या पतनाविषयी भाकीत केले होते

१३. बॅबिलोनविषयी कोणती सविस्तर माहिती लिहून ठेवण्यास यहोवाने यशयाला प्रेरित केले होते?

१३ बायबलमध्ये पुष्कळ भविष्यवाण्या आहेत ज्यांतील बहुतेकांची पूर्ती झाली आहे. एका उदाहरणाचा विचार करा. सा.यु.पू. आठव्या शतकात राहत असलेल्या यशया संदेष्ट्याद्वारे यहोवाने भाकीत केले की बॅबिलोन शहर नाश केले जाईल. (यशया १३:१९; १४:​२२, २३) हे नेमके कसे घडेल यासंबंधाने सर्व सविस्तर माहिती देण्यात आली. आक्रमण करणारे सैन्य बॅबिलोनच्या नदीचे पात्र आटवतील आणि युद्ध न करताच शहरात प्रवेश करतील. इतकेच नव्हे, यशयाच्या भविष्यवाणीने तर बॅबिलोनवर कब्जा करणाऱ्या राजाचे कोरेश हे नाव देखील सांगितले.​—यशया ४४:​२७–४५:२.

१४, १५. बॅबिलोनविषयी यशयाच्या भविष्यवाणीने केलेली सविस्तर भाकीते कशी पूर्ण झाली?

१४ सुमारे २०० वर्षांनंतर​—सा.यु.पू. ५३९ सालच्या ऑक्टोबर ५/६ रोजी रात्री​—सैन्याने बॅबिलोनजवळ तळ ठोकला. या सैन्याचा सेनापती कोण होता? कोरेश नावाचा पर्शियन राजा. अशाप्रकारे, एका आश्चर्यकारक भविष्यवाणीच्या पूर्ततेला सुरुवात झाली. पण भाकीत केल्याप्रमाणे कोरेशचे सैन्य बॅबिलोनवर युद्धाविना आक्रमण करू शकले का?

१५ त्या रात्री बॅबिलोनी लोक एका उत्सवात रंगले होते. शहराच्या प्रचंड भिंतींच्या आत त्यांना सुरक्षित वाटत होते. अगदी याचवेळी, कोरेशने अतिशय कुशलपणे शहरामधून वाहणाऱ्या नदीचा प्रवाह दुसरीकडे वळवला. यामुळे नदीच्या पाण्याची पातळी इतकी कमी झाली, की कोरेशच्या सैनिकांनी आरामात नदीचे पात्र ओलांडले व ते शहराच्या भिंतींपर्यंत गेले. मग कोरेशच्या सैन्याला बॅबिलोनच्या भिंतींवर कशाप्रकारे मात करता आली? का कोणास ठाऊक, पण नेमक्या त्या रात्री शहराची दारे निष्काळजीपणामुळे, सताड उघडी राहिली होती!

१६. (क) बॅबिलोनचा शेवट कसा होईल याविषयी यशयाने काय काय भाकीत केले? (ख) बॅबिलोनच्या नाशाविषयी यशयाने केलेली भविष्यवाणी कितपत पूर्ण झाली?

१६ बॅबिलोनविषयी असे सांगण्यात आले होते: “त्यात पुनः कधी वस्ती होणार नाही, पिढ्यापिढ्या त्यांत कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसविणार नाहीत.” (यशया १३:२०) या भविष्यवाणीने शहराच्या केवळ पाडावाविषयीच भाकीत केले नाही तर बॅबिलोनचा कायमचा नाश केला जाईल असेही भाकीत केले. या शब्दांच्या पूर्ततेचा पुरावा तुम्ही पाहू शकता. इराकमधील बगदादच्या दक्षिणेला सुमारे ८० किलोमीटरवर असलेले प्राचीन बॅबिलोनचे निर्जन ठिकाण पाहिल्यास, यशयाद्वारे यहोवा जे बोलला होता ते पूर्ण झाल्याचा पुरावा मिळतो; तो म्हणाला होता: “नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन.”​—यशया १४:२२, २३. *

बॅबिलोनचे अवशेष

१७. बायबल भविष्यवाणीची पूर्णता, विश्वास मजबूत करणारी कशी आहे?

१७ बायबल हे विश्वसनीय भविष्यवाणीचे पुस्तक आहे, यावर विचार केल्यामुळे आपला विश्वास आणखी बळकट झाला, नाही का? खरेच, यहोवा देवाने गत काळात केलेल्या सर्व भविष्यवाण्या जर पूर्ण केल्या तर पृथ्वीला परादीस बनवण्याचे त्याने दिलेले वचनही तो निश्‍चित पूर्ण करेल अशी आपल्याला शंभर टक्के खात्री आहे. (गणना २३:१९) होय, “सत्यप्रतिज्ञ देवाने” आपल्याला ‘युगानुयुगाच्या जीवनाची [आशा] युगाच्या काळापूर्वी देऊ केली’ आहे.​—तीत १:२. *

‘देवाचे वचन सजीव आहे’

१८. ख्रिस्ती प्रेषित पौल ‘देवाच्या वचनाविषयी’ कोणते जबरदस्त विधान करतो?

१८ या अध्यायात आपण ज्याची चर्चा केली त्यावरून हे स्पष्ट झाले की बायबल हे खरोखरच एक अनोखे पुस्तक आहे. पण त्यातील आंतरिक सुसंगतता, वैज्ञानिक व ऐतिहासिक अचूकता, व्यावहारिक बुद्धी आणि विश्वसनीय भविष्यवाणी यांवरूनच त्याचे मोल ठरत नाही. कारण ख्रिस्ती प्रेषित पौलाने म्हटल्याप्रमाणे: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.”​—इब्री लोकांस ४:१२.

१९, २०. (क) बायबल तुम्हाला, आत्मपरीक्षण करायला कसे मदत करू शकते? (ख) देवाने दिलेल्या अनोख्या भेटवस्तूबद्दल अर्थात बायबलबद्दल तुम्ही कृतज्ञता कशी दाखवू शकता?

१९ बायबलमधील देवाचे “वचन” किंवा संदेश वाचल्यामुळे आपल्या जीवनात परिवर्तन होऊ शकते. ते आपल्याला एका वेगळ्या आणि उत्तम मार्गाने स्वतःचे परीक्षण करण्यास मदत करते. देवावर आपले प्रेम आहे असे कदाचित आपण म्हणत असू. पण त्याचे प्रेरित वचन बायबल जे शिकवते त्यावर आपण दाखवत असलेल्या प्रतिक्रियेवरून आपले खरे विचार, आपल्या अंतःकरणातील खरे हेतू बाहेर प्रकट होतील.

२० बायबल खरोखरच देवाकडून आलेले पुस्तक आहे. ते असे पुस्तक आहे जे वाचले पाहिजे, अभ्यासले पाहिजे आणि जतन करून ठेवले पाहिजे. या पुस्तकातील विषय सतत न्याहाळून पाहण्याद्वारे देवाने दिलेल्या या भेटवस्तूबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. असे केल्याने तुम्हाला मानवजातीसाठी देवाचा जो उद्देश आहे त्याचे सखोल ज्ञान मिळेल. तो उद्देश काय आहे आणि तो कसा पूर्ण होणार आहे, याची चर्चा पुढील अध्यायात केली आहे.

^ परि. 6 बायबलच्या काही भागांचा इतर भागांशी मेळ बसत नाही, असा दावा काही लोक करत असले तरी त्यांचा हा दावा बिनबुडाचा आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या, बायबल​—देवाचे वचन की मानवाचे (इंग्रजी) या पुस्तकाचा ७ वा अध्याय किंवा सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक हे माहितीपत्रक पाहा.

^ परि. 9 उदाहरणार्थ, लूक ३:​२३-३८ मध्ये येशूच्या वंशावळीची सविस्तर माहिती वाचा.

^ परि. 16 बायबल भविष्यवाणीवर अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सर्व लोकांसाठी असणारे एक पुस्तक या माहितीपत्रकाची पृष्ठे २७-९ पाहा.

^ परि. 17 बॅबिलोनच्या नाशविषयीची बायबलमधील भविष्यवाणी, पूर्ण झालेल्या काही उदाहरणांपैकी फक्त एक आहे. सोर, निनवे शहरांच्या नाशांची देखील अशीच उदाहरणे आहेत. (यहेज्केल २६:​१-५; सफन्या २:​१३-१५) तसेच, दानीएलच्या भविष्यवाणीने एकापाठोपाठ येणाऱ्या जागतिक साम्राज्यांविषयी भाकीत केले जी बॅबिलोननंतर सत्तेवर येणार होती. या साम्राज्यांमध्ये, मेदय व पारस आणि ग्रीस ही होत. (दानीएल ८:५-७, २०-२२) पृष्ठे १९९-२०१ वरील परिशिष्ट पाहा. त्यात, अशा अनेक मशिही भविष्यवाण्यांची चर्चा करण्यात आली आहे की ज्या येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाल्या.