व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कमी खर्चात घर कसे चालवाल?

कमी खर्चात घर कसे चालवाल?

कमी खर्चात घर कसे चालवाल?

ओबेदला दोन मुले आहेत. आफ्रिकेतील एका मोठ्या शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये तो १० वर्षांपासून काम करत होता आणि त्यामुळे तो अगदी सहजपणे आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवू शकत होता. अधूनमधून तो आपल्या कुटुंबाला सुटीसाठी त्याच्या देशातील प्रेक्षणीय स्थळांना घेऊन जायचा. पण एक दिवस अचानक त्याची नोकरी गेली आणि हे सर्व एकाएकी थांबले. हॉटेल जास्त चालत नसल्यामुळे त्याला नोकरीवरून काढण्यात आले.

स्टिफनने आपल्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत प्रगती करत एका मोठ्या बँकेत एक्सिक्युटिव्हचे पद मिळवले. त्याच्या या पदामुळे त्याला बऱ्‍याच सवलती मिळाल्या जसे की, मोठा बंगला, गाडी, घरात नोकरचाकर आणि त्याच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकण्यात आले. पण बँकेने जेव्हा आपल्या कार्यपद्धतीत बदल केले तेव्हा स्टिफनची नोकरी सुटली. तो म्हणतो: “मला आणि माझ्या कुटुंबाला धक्काच बसला. मी खूप निराश झालो, मनात नकारात्मक विचार येऊ लागले आणि मला भविष्याची भीती वाटू लागली.”

वरील उदाहरणे आपल्यासाठी काही नवीन नाहीत. जगभरात चाललेल्या आर्थिक मंदीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्‍या सुटल्या. त्यामुळे वाढत्या महागाईच्या या काळातही त्यांना कमी पगाराची नोकरी स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. एखाद्या देशाचा आर्थिक विकास झालेला असो अथवा नसो, आर्थिक मंदीने जगातील सर्वच देशांना वेढले आहे.

व्यावहारिक मार्गदर्शनाची गरज

आपली मिळकत कमी किंवा पूर्णपणे बंद झाल्यामुळे मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. त्यामुळे एका व्यक्‍तीला भविष्याची भीती वाटणे साहजिकच आहे. पण एका बुद्धिमान व्यक्‍तीने असे म्हटले: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ती अल्प होय.” (नीतिसूत्रे २४:१०) आपली आर्थिक परिस्थिती बिकट होते तेव्हा हादरून जाण्यापेक्षा, “व्यवहारज्ञान” मिळवण्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे वळले पाहिजे.—नीतिसूत्रे २:७, कॉमन लँग्वेज भाषांतर.

हे खरे आहे की बायबल एक आर्थिक नियोजनाचे पुस्तक नाही पण त्यातील व्यावहारिक सल्ले लागू केल्याने आज जगभरातील लाखो लोकांना मदत मिळाली आहे. आता आपण बायबलमधील काही व्यावहारिक तत्त्वे पाहू या जी आपल्याला मदत करू शकतात.

खर्चाचा अंदाज बांधा. येशूने लूक १४:२८ या वचनात काय म्हटले ते विचारात घ्या. त्याने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” या वचनातील तत्त्व लागू करायचे असल्यास आपल्याला बजेट बनवावा लागेल आणि त्यानुसारच खर्च करावा लागेल. पण असे करणे इतके सोपे नाही, या गोष्टीला वर उल्लेख केलेला ओबेदही दुजोरा देतो. तो म्हणतो: “माझी नोकरी सुटण्याआधी आम्ही सहसा सुपरमार्केटमधून बऱ्‍याचशा अनावश्‍यक वस्तू घरी आणायचो. आम्ही कधी बजेट बनवलाच नाही कारण आमच्याजवळ खूप पैसे होते. आम्ही अविचारीपणे पैसे खर्च करायचो.” आपण जर आधीच विचार केला तर कमी पगारातही आपल्याला कुटुंबाच्या गरजा भागवणे शक्य होईल.

आपल्या जीवनशैलीत बदल करा. आपली जीवनशैली साधी करणे कठीण आहे यात शंका नाही, पण तसे करणे गरजेचे आहे. बायबलमधील एक नीतिसूत्र असे म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.” (नीतिसूत्रे २२:३) वर उल्लेख केलेला स्टिफन म्हणतो: “पैसे वाचवण्यासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या घरात राहू लागलो. ते घर इतकं मोठं नव्हतं आणि त्यात इतक्या सुखसुविधाही नव्हत्या. मुलांना कमी फी असलेल्या, पण चांगलं शिक्षण देणाऱ्‍या शाळेत टाकावं लागलं.”

जीवनशैली साधी करण्यात यश मिळवण्यासाठी कुटुंबातील सर्वांशी मोकळेपणे बोलणे गरजेचे आहे. ऑस्टिन ज्याने आपली नोकरी सुटण्याआधी ९ वर्षे एका बँकेत काम केले, तो म्हणतो: “मी आणि माझ्या पत्नीनं बसून बजेट बनवलं आणि आम्हाला कोणत्या गोष्टींची खरंच गरज आहे ते लिहून काढलं. आम्ही खाण्यापिण्यावर जितका खर्च करायचो तो आम्हाला कमी करावा लागला, त्यासोबतच महागड्या सुट्यांवरील आणि कपड्यालत्त्यावरील अनावश्‍यक खर्च कमी करावा लागला. पण मला या गोष्टीचं समाधान वाटतं की हे करण्यासाठी माझ्या कुटुंबानं मला साथ दिली.” असे बदल करणे का गरजेचे आहे हे कदाचित लहान मुलांना समजणार नाही, पण पालक म्हणून तुम्ही त्यांना समजावून सांगू शकता.

कमी दर्जाची समजली जाणारी कामे स्वीकारण्यास तयार असा. तुम्हाला जर ऑफिसच्या कामाची सवय झाली असेल तर कदाचित मेहनतीचे काम करणे तुम्हाला कठीण वाटू शकते. ऑस्टिन म्हणतो: “एका मोठ्या कंपनीत मॅनेजरच्या पदावर काम केल्यानंतर कमी दर्जाचं काम स्वीकारण्यास माझं मन तयार होत नव्हतं.” यात नवल करण्यासारखे काहीच नाही कारण बायबल आपल्याला नीतिसूत्रे २९:२५ मध्ये सांगते: “मनुष्याची भीती पाशरूप होते.” लोक काय म्हणतील असा जर तुम्ही सतत विचार करत राहिलात तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पोट भरू शकणार नाही. अशा नकारात्मक विचारांवर मात करण्यास कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?

त्यासाठी नम्रता हा गुण विकसित करणे गरजेचे आहे. हॉटेलमधील नोकरी सुटल्यावर ओबेदला त्याच्या एका मित्राने नोकरी दिली. त्या मित्राचे एक गॅरेज होते. यात ओबेदला कच्च्या रस्त्यावरून बरेच मैल चालत जाऊन गाड्यांचे पेंट आणि स्पेअर पार्ट्‌स आणावे लागायचे. तो म्हणतो: “मला हे काम मुळीच आवडत नव्हतं, पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. या नोकरीत मला जो पगार मिळत होता तो माझ्या आधीच्या पगाराच्या २५ टक्केही नव्हता. पण इतक्या कमी पैशातही माझ्या कुटुंबाच्या गरजा भागत होत्या. ही नोकरी स्वीकारण्यासाठी मला नम्रतेचा गुण विकसित करावा लागला.” अशा मनोवृत्तीचा तुम्हालाही फायदा होऊ शकतो का?

समाधानी असा. एक समाधानी व्यक्‍ती आहे त्या परिस्थितीत संतुष्ट असते. पण आपल्या बाबतीत हे शक्य नाही असे बिकट परिस्थितीत असलेल्या व्यक्‍तीला वाटू शकते. याविषयी प्रेषित पौलाचे शब्द विचारात घ्या. तो स्वतः एक मिशनरी होता आणि बिकट परिस्थिती काय असते हे त्याने अनुभवले होते. त्याने म्हटले: “माझ्याजवळ जास्त असो वा कमी असो, असेल त्यात समाधान मानून राहण्यास मी शिकलो आहे. जवळ काहीच नसताना, अगर सर्व काही असताना, कसे राहावे हे मला माहीत आहे.”—फिलिप्पैकर ४:११, १२, सुबोधभाषांतर.

आपली परिस्थिती कदाचित बदलू शकते, पण या बदलत्या काळात ती आणखी बिकट होण्याची शक्यताही आपण नाकारू शकत नाही. आपण जर पौलाने दिलेला देवप्रेरित सल्ला अंमलात आणला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्याने म्हटले: “समाधानी वृत्तीसह भक्‍तिभाव केव्हाही फायदेशीर असतो. अन्‍नवस्त्र मिळाले तर तेवढ्यात आपण समाधान मानले पाहिजे.” पौल येथे कामचुकार वृत्तीला उत्तेजन देत नव्हता, तर आपल्या भौतिक गरजांना आपण आपल्या जीवनात योग्य ठिकाणी कसे ठेवले पाहिजे याविषयी तो सांगत होता.—१ तीमथ्य ६:६, ८, कॉमन लँग्वेज भाषांतर.

खऱ्‍या आनंदाचा स्रोत

आपल्याला जे काही हवे ते मिळवल्याने किंवा आरामदायक जीवन जगल्याने खरा आनंद मिळत नाही. येशूने स्वतः असे म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” आपल्याजवळ जे काही आहे ते इतरांच्या मदतीसाठी वापरल्याने आणि त्यांना नेहमी उत्तेजन दिल्याने आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळू शकते.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

आपला सृष्टीकर्ता, यहोवा देव आपल्या सर्व गरजा जाणतो. त्याच्या वचनाद्वारे, बायबलद्वारे त्याने आपल्यासाठी व्यावहारिक सल्ले दिले आहेत आणि त्यांचे पालन करून आज बऱ्‍याच लोकांचे जीवन सुधारले आहे व अनावश्‍यक चिंतापासून ते मुक्‍त झाले आहेत. हे खरे आहे की बायबलची तत्त्वे लागू केल्याने एखाद्या व्यक्‍तीची आर्थिक परिस्थिती एका रात्रीत सुधारणार नाही. पण जे लोक “पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास” झटतात त्यांच्या भौतिक गरजा पुरवल्या जातील असे आश्‍वासन येशूने दिले.—मत्तय ६:३३. (w१२-E ०६/०१)