व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवानं माझे डोळे उघडले

यहोवानं माझे डोळे उघडले

यहोवानं माझे डोळे उघडले

पॅट्रीस ओयेका यांच्याद्वारे कथित

माझ्या आंधळेपणामुळे मी दररोज एकटेपणानं ग्रासलेलो असायचो आणि दिसवसभर रेडिओवर जे काही कार्यक्रम लागायचे ते ऐकायचो. अशा प्रकारे जीवनाचा आणखी एक दिवस अंधारात घालवल्यानंतर एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या या निरर्थक जीवनाचा अंत करण्याचं ठरवलं. मी एक कपभर पाण्यात विष ओतलं आणि माझ्यासमोरच टेबलावर ठेवलं. मला शेवटची अंघोळ करायची होती आणि त्यानंतर चांगलं तयार होऊन मी ते विष पिणार होतो व माझं जीवन संपवणार होतो. मला आत्महत्या का करायची होती? आणि तसं असेल तर मी आज माझी कथा सांगण्यासाठी जिवंत कसा आहे?

माझा जन्म २ फेब्रुवारी, १९५८ या दिवशी, काँगो प्रजासत्ताकच्या कसाई ओरियेन्टल या प्रांतात झाला. मी ९ वर्षांचा असतानाच माझे वडील वारले, आणि त्यानंतर माझ्या मोठ्या भावानंच मला वाढवलं.

शिक्षण संपल्यानंतर रबरच्या वृक्षांची लागवड केली जाते तिथं मला नोकरी मिळाली. १९८९ सालच्या एका सकाळी, मी ऑफिसमध्ये रिपोर्ट तयार करत होतो, तेव्हा अचानकच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला. आधी मला वाटलं की लाईट गेली असेल, पण मला नंतर जाणवलं की जनरेटर चालू आहे आणि ती सकाळची वेळ होती! मी खूप घाबरलो कारण मला काहीच दिसत नव्हतं, माझ्या टेबलावरच्या वस्तूदेखील!

मी लगेच माझ्या हाताखाली काम करणाऱ्‍या एका कामगाराला बोलवलं आणि मला आमच्या कामाच्या ठिकाणीच असलेल्या छोट्या दवाखान्यात न्यायला सांगितलं. तिथल्या व्यक्‍तीनं मला शहरातल्या दवाखान्यात जाण्यास सांगितलं. माझ्या डोळ्यांतील पडदे फाटले आहेत आणि माझी स्थिती वाईट आहे हे लक्षात आल्यावर त्यानं मला काँगोची राजधानी, किन्शासाला पाठवलं.

किन्शासातील जीवन

किन्शासामध्ये मी बऱ्‍याच नेत्रतज्ज्ञांना भेटलो, पण कोणीच माझ्यावर उपचार करू शकलं नाही. दवाखान्यात ४३ दिवस राहिल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की मी आता आयुष्यभर आंधळाच राहीन. मी चमत्कारानं बरा होईल या आशेनं माझ्या कुटुंबातील लोकांनी मला वेगवेगळ्या चर्चमध्ये नेलं पण त्याचा काहीच फायदा झाला नाही.

शेवटी, मला माझी दृष्टी परत मिळेल ही आशाच मी सोडून दिली. माझ्या जीवनात सर्वत्र अंधार पसरला. मी माझी दृष्टी गमावली, माझी नोकरी सुटली. माझी पत्नी मला सोडून गेली आणि आमच्याकडे जे काही होतं ते सगळं ती सोबत घेऊन गेली. मला बाहेर जाण्यास, लोकांमध्ये मिसळण्यास लाज वाटू लागली. मी एकटाएकटा राहू लागलो आणि दिवसभर घरातच बसून असायचो. मी एकलकोंडा बनलो होतो आणि स्वतःला निकामी समजू लागलो.

मी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या लेखाच्या सुरुवातीला दुसऱ्‍या प्रयत्नाविषयी सांगितलं आहे. माझ्या कुटुंबातच राहणाऱ्‍या एका लहान मुलामुळे मी वाचलो. मी अंघोळ करत असताना त्याने नकळत तो कप घेतला आणि त्यातलं पाणी जमिनीवर ओतलं. बरं झालं तो मुलगा त्यातलं विष प्यायला नाही. पण अंघोळ करून परत आल्यावर कप न मिळाल्यामुळे मी निराश झालो होतो. मी तो कप का शोधत होतो आणि मी काय करायचं ठरवलं होतं हे मी शेवटी माझ्या कुटुंबातील सदस्यांना सांगून टाकलं.

मी खरंच देवाचे आणि माझ्या कुटुंबाचे खूपखूप आभार मानतो की त्यांनी माझी काळजी घेतली. मी आत्महत्या करण्याचा माझा प्रयत्न सोडून दिला.

जीवनात परत आनंद मिळाला

१९९२ सालच्या एका रविवारी मी घरीच सिगारेट पीत बसलो होतो, तेव्हा दोन यहोवाच्या साक्षीदारांनी घरोघरचे साक्षकार्य करत असताना मला भेट दिली. मी अंधळा आहे हे पाहून त्यांनी मला यशया ३५:५ हे वचन वाचून दाखवलं, त्यात म्हटलं आहे: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील.” हे शब्द ऐकून माझं मन आनंदानं भरून आलं. मी अनेक चर्चेसमध्ये गेलो होतो पण त्यांच्या अगदी विरुद्ध यहोवाच्या साक्षीदारांनी मला चमत्कारानं बरं करण्याची खोटी आशा दिली नाही. त्याऐवजी त्यांनी मला सांगितलं की जर मी खऱ्‍या देवाला ओळखलं तर देवाच्या राज्यात मला माझी दृष्टी परत मिळेल. (योहान १७:३) त्याच वेळी मी बायबल अभ्यास करायचं ठरवलं, आणि साक्षीदारांसोबत तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल या पुस्तकातून अभ्यास सुरू केला. मी माझ्या भागात असलेल्या राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहू लागलो आणि माझ्या जीवनात बदल करू लागलो. मी सिगारेट पिण्याचं सोडलं.

पण माझ्या आंधळेपणामुळे मला आध्यात्मिक प्रगती करता येत नव्हती. त्यामुळे मग मी अंधशाळेत गेलो आणि तिथं ब्रेल लिपी शिकलो. या शिक्षणामुळे मला राज्य सभागृहात मिळणाऱ्‍या प्रशिक्षणाचा फायदा घेणं शक्य झालं. काही काळातच मी माझ्या शेजाऱ्‍यांना प्रचार करू लागलो. मी परत माझ्या जीवनात आनंद अनुभवू लागलो. मी प्रगती केली आणि माझं जीवन यहोवाला समर्पित केलं. मी ७ मे, १९९४ या दिवशी बाप्तिस्मा घेतला.

यहोवासाठी व लोकांसाठी माझे प्रेम जसजसे वाढत गेले, तसतशी माझी पूर्ण वेळची सेवा करण्याची इच्छा आणखी तीव्र होत गेली. १ डिसेंबर, १९९५ पासून मी पूर्ण वेळच्या सेवेत, एक सामान्य पायनियर म्हणून सेवा करत आहे. फेब्रुवारी २००४ पासून मला आणखी एक बहुमान मिळाला, तो म्हणजे मंडळीत वडील म्हणून सेवा करण्याचा. कधीकधी मला जवळपासच्या मंडळ्यांमध्ये बायबलवर आधारित भाषण देण्यासाठी बोलवलं जातं. या सर्व आशीर्वादांमुळे मला खूप आनंद होतो व यहोवा देवाची सेवा करण्याची जर इच्छा असेल तर कोणतीही दुर्बलता आपल्याला रोखू शकत नाही या गोष्टीची जाणीवही मला नेहमी होते.

यहोवाने मला “डोळे” दिले

आधी सांगितल्याप्रमाणे, माझी पत्नी मी अंध असल्यामुळे मला सोडून गेली. पण मला यहोवाकडून एक खास आशीर्वाद मिळाला आहे. एका खास प्रकारे त्याने मला माझे डोळे परत केले आहेत. माझ्या दुर्बलतेविषयी माहीत असूनही ॲनी मोवोंबूने माझ्याशी लग्न केलं आणि तिच्या डोळ्यांतून मी जग पाहू लागलो. तीपण एक पूर्ण वेळची प्रचारक असल्यामुळे ती नेहमी सेवाकार्यात माझ्यासोबत असते. माझ्या भाषणांसाठी असलेली माहिती ती मला वाचून दाखवते ज्यामुळे मी त्या गोष्टींची नोंद ब्रेल लिपीत करू शकतो. ती माझ्यासाठी यहोवानं दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे. तिच्या स्वभावामुळे मी नीतिसूत्रे १९:१४ या वचनातील सत्य अनुभवलं आहे, त्यात म्हटलं आहे: “घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्‍वरापासून प्राप्त होते.”

यहोवानं मला व ॲनीला दोन मुलं, एक मुलगा व मुलगी देऊन आशीर्वाद दिला आहे. मी नंदनवनात त्यांचे चेहरे पाहण्यासाठी आतूरतेने वाट पाहतोय. आणखी एक आशीर्वाद म्हणजे, माझा मोठा भाऊ, त्यानं आम्हाला त्याच्या जागेवर राहू दिलं, त्यानं सत्य स्वीकारलं आणि बाप्तिस्मा घेतला! आम्ही सर्व जण एकाच मंडळीत आहोत.

यहोवानं मला खूप आशीर्वादित केलं आहे त्यामुळे मी दुर्बल असतानाही, त्याच्या सेवेत आणखी करण्याची माझी मनापासून इच्छा आहे. (मलाखी ३:१०) त्याचं राज्य यावं आणि या पृथ्वीवरून सर्व दुःखांचा नायनाट व्हावा यासाठी मी दररोज प्रार्थना करतो. यहोवाला जवळून ओळखल्यामुळे मी हे मनापासून म्हणू शकतो: “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२. (w१२-E ०६/०१)

[३० पानांवरील चित्रे]

बायबलवर आधारित भाषण देताना; माझ्या कुटुंबासोबत व भावासोबत