व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रामाणिक मनाचे उपासक आणि जबाबदार नागरिक आपण दोन्ही कसे बनू शकतो?

प्रामाणिक मनाचे उपासक आणि जबाबदार नागरिक आपण दोन्ही कसे बनू शकतो?

प्रामाणिक मनाचे उपासक आणि जबाबदार नागरिक आपण दोन्ही कसे बनू शकतो?

येशूच्या सेवाकार्यातील त्या दोन ठळक गोष्टी कोणत्या होत्या? पहिली गोष्ट, येशूने राजकीय व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याने प्रत्येकाचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. याचे एक उदाहरण म्हणजे, त्याने डोंगरावरील प्रवचनात कोणत्या गोष्टीवर जोर दिला ते पाहा. आपण मिठासारखे आणि प्रकाशासारखे बनण्याची गरज आहे हे सांगण्याआधी येशूने त्याच्या ऐकणाऱ्‍यांना सांगितले की “आपली आध्यात्मिक उणीव जे नम्रतापूर्वक कबूल करतात” त्यांना खरा आनंद लाभतो. त्याने पुढे म्हटले: “जे सौम्य ते धन्य, . . . ज्यांची अंतःकरणे शुद्ध आहेत ते धन्य, . . . शांती प्रस्थापित करणारे ते धन्य.” (मत्तय ५:१-११, सुबोधभाषांतर) यहोवाचे चांगल्यावाइटाबद्दल जे स्तर आहेत त्यांनुसार आपल्या विचारसरणीमध्ये व आपल्या भावनांमध्ये बदल करण्याचे आणि देवाची पूर्ण मनाने सेवा करण्याचे महत्त्व समजण्यास येशूने त्याच्या ऐकणाऱ्‍यांना मदत केली.

दुसरी गोष्ट, येशूने जेव्हा मानवांना दुःखात पाहिले तेव्हा त्यांच्याबद्दल वाटणाऱ्‍या करुणेमुळे त्याने त्यांच्या दुःखांचे निवारण केले. पण त्या वेळी जगातील सर्व दुःख काढून टाकण्याला त्याने आपला मुख्य हेतू बनवला नाही. (मत्तय २०:३०-३४) त्याने आजारी लोकांना बरे केले, पण आजारपण पूर्णपणे नाहीसे झाले नाही. (लूक ६:१७-१९) ज्यांचा छळ केला जात होता त्यांना येशूने सांत्वन दिले, पण अन्याय चालूच राहिला. त्याने भुकेल्यांना अन्‍न दिले पण तरीही उपासमारीने मानवजातीला वेढले होते.—मार्क ६:४१-४४.

लोकांची मने बदलणे आणि दुःख तात्पुरते काढून टाकणे

येशूने व्यवस्था बदलण्यावर किंवा दुःख पूर्णपणे नाहीसे करण्यावर आपले लक्ष केंद्रित न करता लोकांची मने बदलण्यावर आणि त्यांचे दुःख तात्पुरते काढून टाकण्यावर आपले लक्ष केंद्रित का केले? येशूला माहीत होते की यहोवाने त्याच्या राज्याद्वारे भविष्यात सर्व मानवी सरकारांचा व दुःखाच्या सर्व कारणांचा नायनाट करण्याचे उद्देशिले आहे. (लूक ४:४३; ८:१) त्यामुळेच एकदा येशूच्या शिष्यांनी त्याला एका गावात जास्त वेळ थांबून आजारी लोकांना बरे करण्याचे सुचवले, तेव्हा येशूने त्यांना म्हटले: “मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दूसरीकडे जाऊ; कारण ह्‍याच उद्देशाने मी निघालो आहे.” (मार्क १:३२-३८) येशूने बऱ्‍याच लोकांचे दुखणे बरे केले पण त्याने देवाच्या वचनातील सुवार्ता सांगण्याच्या व शिक्षण देण्याच्या कार्याला आपल्या जीवनात नेहमी प्राधान्य दिले.

आज यहोवाचे साक्षीदारही त्यांच्या सेवाकार्यात येशूचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. ते गरजू लोकांना व्यावहारिक मदत पुरवण्याद्वारे त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करतात. पण यहोवाचे साक्षीदार या जगातील सर्व दुःख काढून टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत. देवाचे राज्य दुःखाच्या सर्व कारणांना काढून टाकेल असा विश्‍वास साक्षीदार बाळगतात. (मत्तय ६:१०) येशूप्रमाणेच ते लोकांची मने बदलण्याचा प्रयत्न करतात, राजकीय व्यवस्था नाही. आणि असे करणे योग्यच आहे कारण मानवजातीची मुख्य समस्या राजकीय नसून, नैतिक आहे.

जबाबदार नागरिक

पण असे करत असताना यहोवाचे साक्षीदार समाजात एक जबाबदार नागरिक बनण्याचे त्यांचे ख्रिस्ती कर्तव्य विसरत नाहीत. त्यामुळे ते सरकारच्या अधिकाराचा आदर करतात. त्यांच्या प्रकाशनांतून आणि सेवाकार्यातून ते सर्वांना सरकारने दिलेले नियम पाळण्याचे उत्तेजन देतात. पण जेव्हा सरकार त्यांना अशी एखादी गोष्ट करण्यास सांगते जी देवाच्या स्तरांविरुद्ध आहे तेव्हा ते देवाच्या स्तरांवर टिकून राहतात. ते असे मानतात की आपण “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ५:२९; रोमकर १३:१-७.

यहोवाचे साक्षीदार समाजातील सर्वांना भेट देऊन त्यांना विनामूल्य बायबल प्रशिक्षण पुरवतात. या प्रशिक्षणामुळे आज लाखो लोकांची मने बदलली आहेत. दर वर्षी हजारो लोकांना त्यांच्या वाईट सवयींवर, जसे की धूम्रपान, दारूबाजी, ड्रग्सची लत, जुगार खेळणे आणि अनैतिक जीवन जगणे, यांवर मात करण्यास मदत पुरवली जाते. हे सर्व लोक जबाबदार नागरिक बनू शकले कारण त्यांनी बायबलमधील तत्त्वे आपल्या जीवनात लागू केली.

या व्यतिरिक्‍त बायबलचा अभ्यास केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांप्रती आदर वाढतो आणि पतिपत्नीमधील, पालक आणि मुलांमधील संवाद सुधारण्यास मदत मिळते. या गोष्टींमुळे कुटुंबातील नाते आणखी मजबूत होते. आणि चांगल्या कुटुंबांमुळे समाज सुधारतो.

या दोन्ही लेखांमध्ये ज्या मुद्द्‌यांवर चर्चा करण्यात आली आहे त्यांवर विचार केल्यानंतर, तुम्हाला काय वाटते: खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी जबाबदार नागरिक असायला पाहिजे का? हो, असायलाच पाहिजे. ते जबाबदार नागरिक कसे बनू शकतात? मिठासारखे आणि प्रकाशासारखे बनण्याची जी आज्ञा येशूने दिली तिचे पालन करण्याद्वारे.

जे लोक येशूने दिलेले सल्ले आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतात त्यांना स्वतःला व त्यांच्या कुटुंबाला फायदा होतो. तसेच ते ज्या समाजात राहतात त्या समाजालाही फायदा होतो. तुमच्या क्षेत्रातील यहोवाचे साक्षीदार तुम्हाला बायबल अभ्यास कार्यक्रमाविषयी आणखी माहिती देण्यास उत्सुक असतील. * (w१२-E ०५/०१)

[तळटीप]

^ परि. 12 तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी त्यांच्या www.ps8318.com या वेबसाईटवरदेखील संपर्क साधू शकता

[१८ पानांवरील संक्षिप्त आशय]

येशूने लोकांची मने बदलण्याचा प्रयत्न केला, राजकीय व्यवस्था नाही

[१९ पानांवरील संक्षिप्त आशय]

चांगले नागरिक बनणे ही आपली जबाबदारी आहे असे यहोवाचे साक्षीदार मानतात