व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा जिंकणे

विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा जिंकणे

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा जिंकणे

स्टीव *: “मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की जेनी माझा विश्‍वासघात करेल. माझा तिच्यावरून भरवसाच उडाला. तिला माफ करणं किती कठीण होतं हे माझं मलाच माहीत.”

जेनी: “मी स्टीवचा भरवसा का गमावला याची मला जाणीव आहे. मी केलेल्या कृत्याचा मला खरा पश्‍चात्ताप झाला आहे हे त्याला समजण्यासाठी बरीच वर्षं लागली.”

विश्‍वासघात झालेल्या विवाहसोबत्याने घटस्फोट घ्यावा अथवा नाही हे ठरवण्याचा हक्क बायबल त्याला देते. * (मत्तय १९:९) पण वर उल्लेख केलेल्या स्टीवने त्याच्या पत्नीला घटस्फोट न देण्याचे ठरवले. दोघांनीही त्यांचा विवाह वाचवण्याचा निर्धार केला. पण असे करणे सोपे नाही या गोष्टीची लवकरच त्यांना जाणीव झाली. असे का? कारण वर सांगितल्याप्रमाणे जेनीने केलेल्या विश्‍वासघातामुळे स्टीवचा तिच्यावरून पूर्णपणे भरवसा उडाला. आनंदी वैवाहिक जीवनासाठी एकमेकांवर भरवसा असणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे त्या दोघांनाही पुन्हा एकमेकांचा विश्‍वास जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे होते.

विश्‍वासघातासारख्या मोठ्या समस्येनंतर आपला विवाह वाचवण्याचा प्रयत्न करणे नक्कीच सोपे नाही. विवाहसोबत्याचा विश्‍वासघात उघडकीस आल्यानंतर सुरुवातीचे काही महिने विशेष कठीण असू शकतात. पण तुम्ही यशस्वी होऊ शकता! तुम्ही तुमच्या विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा कसा जिंकू शकता? बायबलमध्ये दिलेले ज्ञान तुम्हाला असे करण्यास मदत करू शकते. पुढील चार सल्ले विचारात घ्या.

१ एकमेकांशी प्रामाणिकपणे बोला. बायबलमध्ये प्रेषित पौलाने लिहिले: “लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला.” (इफिसकर ४:२५) खोटे बोलणे, पूर्ण सत्य न सांगणे किंवा शांत राहणे यांमुळे विवाहसोबत्याचा भरवसा आणखी कमी होतो. त्यामुळे मनमोकळेपणे आणि प्रामाणिकपणे एकमेकांशी बोला.

सुरुवातीला कदाचित तुम्ही व तुमचा विवाहसोबती या विषयावर बोलण्याच्या मनःस्थितीत नसाल. पण जे काही घडले आहे त्याविषयी तुम्हाला कधी ना कधी स्पष्टपणे बोलावेच लागेल. तुम्ही कदाचित घडलेल्या प्रकाराच्या प्रत्येक बाबीविषयी बोलण्याचे टाळाल, पण तो विषयच पूर्णपणे टाळणे योग्य नाही. वर उल्लेख केलेली जेनी सांगते: “सुरुवातीला, मी केलेल्या कृत्याविषयी स्टीवशी बोलणं मला खूप अवघड गेलं. माझं मन मला खूप खात होतं आणि मला ती गोष्ट पूर्णपणे विसरून जायची होती.” पण सुसंवादाच्या आभावामुळे त्यांच्यात समस्या निर्माण झाल्या. त्या कशा? स्टीव म्हणतो: “जेनीने केलेल्या विश्‍वासघाताविषयी बोलायला ती तयार नव्हती, त्यामुळे मग माझ्या मनातला संशय आणखीनच बळावला.” आज जेनी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा ती हे कबूल करते की “स्टीवसोबत स्पष्टपणे न बोलल्यामुळे मला त्याचा भरवसा पुन्हा जिंकणं खूप कठीण गेलं.”

विश्‍वासघाताविषयी बोलल्यामुळे पतीपत्नी दोघांनाही भावनिक रीत्या वेदना होतील यात शंका नाही. एक उदाहरण विचारात घ्या. आदित्यने त्याच्या सेक्रेटरीशी व्यभिचार केला. त्या घटनेविषयी त्याची पत्नी दिपीका सांगते: “माझ्या मनात खूप प्रश्‍न होते. हे कसं झालं? तू हे कसं करू शकतोस? तुम्ही काय बोललात? मी बऱ्‍याचदा खूप भावनिक व्हायचे, त्याविषयी सतत विचार करत राहायचे आणि जसजसा वेळ गेला तसतसे मी आदित्यला आणखीनच प्रश्‍न विचारू लागले.” आदित्य म्हणतो: “कधीकधी आमच्यात वाद व्हायचे. पण आम्ही नेहमी एकमेकांची माफी मागायचो. मनमोकळेपणे संवाद साधल्यामुळे आम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ आलो.”

अशा विषयांवर विवाहसोबत्याशी बोलताना वाद निर्माण होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? नेहमी लक्षात असू द्या की संवाद साधण्याचा तुमचा मुख्य हेतू तुमच्या सोबत्याला दोषी ठरवणे नसून, झालेल्या चुकीतून शिकणे आणि तुमच्या विवाहाला आणखी मजबूत करणे हा आहे. उदाहरणार्थ, गौरवने केलेल्या विश्‍वासघातानंतर त्याने आणि त्याची पत्नी पूजाने त्यांच्या वैवाहिक नातेसंबंधाविषयी गंभीरपणे विचार केला. गौरव सांगतो: “मला जाणवलं की मी माझ्या कामात खूप व्यस्त झालो होतो. मी इतरांना खूश करण्याचा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा जास्तच विचार करत होतो. मी माझा बराचसा वेळ इतरांवर खर्च करत होतो. यामुळे मला दिपीकासोबत घालवायला वेळच उरत नव्हता.” आपल्या परिस्थितीचा विचार केल्यामुळे गौरवला आणि दिपीकाला आपल्या जीवनात बदल करणे शक्य झाले आणि यामुळे पुढे चालून त्यांचा विवाह आणखी मजबूत झाला.

हे करून पाहा: तुम्ही जर विश्‍वासघात केला असेल तर त्यासाठी कारणे देऊ नका किंवा तुमच्या जोडीदाराला दोष देऊ नका. तुम्ही केलेल्या कृत्याची आणि तुमच्या सोबत्याला दिलेल्या दुःखाची स्वतः जबाबदारी घ्या. तुमच्या सोबत्याने जर तुमचा विश्‍वासघात केला असेल तर, त्याला घालूनपाडून बोलू नका किंवा त्याच्यावर ओरडू नका. अशा प्रकारचे बोलणे टाळल्यामुळे तुमच्या सोबत्याला मनमोकळेपणे बोलण्यास सोपे जाईल.—इफिसकर ४:३२.

२ दोघेही सोबत मिळून काम करा. बायबल सांगते की “एकट्यापेक्षा दोघे बरे.” असे का? “कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.” (उपदेशक ४:९, १०) तुम्ही जेव्हा तुमच्या विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा खासकरून हे तत्त्व लागू होते.

तुमच्या नातेसंबंधात जो अविश्‍वास निर्माण झाला आहे त्यावर तुम्ही दोघे मिळून मात करू शकता. पण असे करण्यासाठी विवाह वाचवण्याचा तुमचा दोघांचाही निर्धार पक्का असला पाहिजे. तुम्ही जर एकएकटे या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्ही तुमच्या विवाहात आणखी समस्या निर्माण कराल. प्रत्येक गोष्टीत एकमेकांकडे सोबती म्हणून पाहा.

सोबत मिळून काम केल्याने स्टीवला आणि जेनीला फायदा झाला. जेनी म्हणते: “सोबत मिळून काम करण्याची सवय लागायला थोडा वेळ लागला, पण आमचं नातं मजबूत करण्यासाठी आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न केले. स्टीवला पुन्हा कधीच असं दुःख न देण्याचा मी निश्‍चय केला. स्टीवच्या वागण्याचं मला कधीकधी दुःख व्हायचं, पण स्टीवने पक्का निश्‍चय केला की तो आमचा विवाह टिकवून ठेवेल. मी त्याला विश्‍वासू आहे हे दाखवण्यासाठी मी दररोज अनेक संधी शोधायचे आणि तोही नेहमी त्याचे प्रेम व्यक्‍त करायचा. यासाठी मी आयुष्यभर त्याची ऋणी राहीन.”

हे करून पाहा: विवाहात भरवसा पुन्हा मिळवण्यासाठी मिळून प्रयत्न करण्याचा निर्धार करा.

३ वाईट सवयी सोडून द्या, चांगल्या सवयी लावा. येशूने त्याच्या श्रोत्यांना व्यभिचाराविषयी ताकीद दिल्यानंतर असे म्हटले: “तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून टाकून दे.” (मत्तय ५:२७-२९) तुम्ही जर तुमच्या विवाहसोबत्याचा विश्‍वासघात केला असेल, तर तुम्ही तुमचा विवाह मजबूत करण्यासाठी तुमच्यात असलेल्या वाईट सवयी उपटून टाकू शकता का?

ज्या व्यक्‍तीसोबत तुम्ही व्यभिचार केला आहे तिच्याशी पूर्णपणे संपर्क तोडणे गरजेचे आहे. * (नीतिसूत्रे ६:३२; १ करिंथकर १५:३३) वर उल्लेख केलेल्या आदित्यने हेच केले. ज्या स्त्रीशी त्याचे पूर्वी संबंध होते तिच्याशी पूर्णपणे संपर्क तोडण्यासाठी त्याने आपल्या कामाची वेळ आणि आपला मोबाईल नंबर बदलला. पण या प्रयत्नांमुळे ते पूर्णपणे शक्य झाले नाही. आदित्यला त्याच्या पत्नीचा भरवसा पुन्हा जिंकायचा होता त्यामुळे त्याने त्याची नोकरीदेखील सोडली. त्याने स्वतःचा फोन बंद केला आणि तो फक्‍त आपल्या पत्नीचाच फोन वापरू लागला. स्वतःची इतकी गैरसोय करून घेण्याचा आदित्यला काही फायदा झाला का? त्याची पत्नी दिपीका म्हणते: “ती घटना घडून आता सहा वर्षं झाली आहेत, पण ती स्त्री आदित्यला संपर्क करण्याचा प्रयत्न करेल अशी भीती मला अजूनही वाटते. पण आता आदित्यवर माझा पूर्ण भरवसा आहे, तो माझा विश्‍वासघात कधीच करणार नाही.”

विश्‍वासघात तुमच्या हातून झाला असेल तर तुम्हाला तुमच्या व्यक्‍तिमत्त्वातही बदल करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित इश्‍कबाजी करण्याची सवय असेल किंवा मग इतरांसोबत प्रेमसंबंध ठेवण्याची कल्पना तुमच्या मनाला सुखावत असेल. असे असल्यास “जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून” टाका. तुमच्यातील वाईट सवयी काढून चांगल्या सवयी लावा जेणेकरून तुमच्या विवाहसोबत्याचा तुमच्यावरचा भरवसा आणखी वाढेल. (कलस्सैकर ३:९, १०) तुम्ही ज्या वातावरणात लहानाचे मोठे झाला त्यामुळे तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्‍त करण्यास कठीण जाते का? असे असले तरी तुमच्या वागण्याबोलण्यातून सोबत्याप्रती प्रेम व्यक्‍त करा व तुम्ही त्याला विश्‍वासू आहात याची जाणीव त्याला करून द्या. वर उल्लेख केलेला स्टीव सांगतो: “जेनी नेहमी आपल्या वागण्याबोलण्यातून प्रेम व्यक्‍त करायची आणि ‘माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे’ असं ती मला नेहमी म्हणायची.”

निदान काही काळासाठी तरी दिवसभरात घडलेल्या लहानसहान गोष्टीही तुम्ही तुमच्या विवाहसोबत्याला सांगू शकता. वर उल्लेख केलेली पूजा सांगते: “गौरव मला दिवसभरात कायकाय घडलं हे सांगायचा, अगदी क्षुल्लक गोष्टीही. त्याला माझ्यापासून काहीच लपवून ठेवायचं नव्हतं.”

हे करून पाहा: भरवसा परत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो हे एकमेकांना विचारा. एकमेकांचे लक्षपूर्वक ऐका आणि जे काही ठरवले आहे ते कृतीत आणा. तसेच तुम्ही सोबत मिळून आनंद घेऊ शकाल अशीही काही कार्ये करा.

४ सर्व सुरळीत होण्यासाठी पुरेसा वेळ द्या. आता सर्वकाही सुरळीत झाले आहे असा विचार करण्याची घाई करू नका. नीतिसूत्रे २१:५ मध्ये आपल्याला एक ताकीद देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे: “जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.” विवाहसोबत्याचा भरवसा पुन्हा जिंकण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल, कदाचित अनेक वर्षेही.

तुमचा जर विश्‍वासघात झाला असेल, तर विवाहसोबत्याला पूर्णपणे माफ करण्यासाठी स्वतःला पुरेसा वेळ द्या. पूजा म्हणते: “पतीनं विश्‍वासघात केल्यानंतर काही स्त्रियांना आपल्या पतीला माफ करणं इतकं कठीण का जातं, त्या इतके दिवस मनात राग का बाळगतात ते मला कधीच कळलं नव्हतं. पण माझ्या पतीनं माझा विश्‍वासघात केला तेव्हा माफ करणं किती कठीण असतं हे मला कळलं.” पूर्णपणे माफ करायला आणि भरवसा पुन्हा जिंकायला सहसा काही काळ जाऊ द्यावा लागतो.

उपदेशक ३:१-३ मध्ये असे म्हटले आहे की “बरे करण्याचा समय” असतो. सुरुवातीला तुम्हाला कदाचित वाटेल की ज्याने विश्‍वासघात केला आहे त्याला आपल्या मनातले दुःख न सांगणेच योग्य राहील. पण तुम्ही जर असे केले तर तुमच्या नातेसंबंधात पुन्हा भरवसा मिळवणे तुम्हाला शक्य होणार नाही. नातेसंबंधात आलेला दुरावा कमी करण्यासाठी तुमच्या सोबत्याला मनापासून माफ करा आणि तुम्ही त्याला माफ केले आहे हे दाखवण्यासाठी त्याच्याजवळ आपले मन मोकळे करा. तसेच तुमच्या सोबत्यालाही त्याला वाटणारी चिंता व्यक्‍त करण्यास आणि त्याला आनंदी करणाऱ्‍या गोष्टी मोकळेपणे सांगण्यास प्रोत्साहन द्या.

मनात अढी बाळगू नका तर झालेले दुःख विसरण्याचा प्रयत्न करा. (इफिसकर ४:३२) देवाच्या उदाहरणावर मनन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. प्राचीन इस्राएलमधील यहोवाच्या उपासकांनी जेव्हा त्याला सोडून दिले तेव्हा त्याला खूप दुःख झाले होते. त्याने स्वतःची तुलना विश्‍वासघात झालेल्या विवाहसोबत्याशी केली. (यिर्मया ३:८, ९; ९:२) पण तो नेहमीसाठी “क्रोधयुक्‍त” राहिला नाही. (यिर्मया ३:१२) यहोवाचे लोक परत त्याच्याजवळ आले व त्यांनी खरा पश्‍चात्ताप केला तेव्हा त्याने त्यांना पूर्णपणे माफ केले.

काही काळ गेल्यानंतर तुम्हा दोघांना जेव्हा असे वाटेल की तुमचा नातेसंबंध सुधारला आहे तेव्हा तुमचा एकमेकांवरचा भरवसा भक्कम झालेला असेल. त्यानंतर मग नातेसंबंध मजबूत करण्यासोबतच तुम्ही दोघे मिळून काही ध्येये ठेवू शकता. पण असे करताना, तुमचा नातेसंबंध किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी वेळ काढा. नातेसंबंध मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करत राहा. अधूनमधून उद्‌भवणाऱ्‍या समस्यांवर मिळून मात करा आणि तुम्ही एकदुसऱ्‍याला विश्‍वासू आहात या गोष्टीची एकमेकांना जाणीव करून द्या.

हे करून पाहा: पूर्वीसारखाच नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, नव्याने सुरुवात करा आणि तो नातेसंबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही यशस्वी होऊ शकता

आपले प्रयत्न यशस्वी होतील की नाही अशी शंका जर तुमच्या मनात असेल तर हे नेहमी लक्षात असू द्या की विवाहाची व्यवस्था करणारा देव आहे. (मत्तय १९:४-६) त्यामुळे त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा विवाह यशस्वी करू शकता. वर उल्लेख केलेल्या सर्व जोडप्यांनी बायबलमधील सुज्ञ सल्ल्याचे पालन केले आणि आपला विवाह वाचवला.

स्टीव आणि जेनीच्या जीवनात २० वर्षांआधी विश्‍वासघातामुळे वादळ आले होते. त्यांचा विवाह पुन्हा मजबूत कसा झाला त्याविषयी स्टीव म्हणतो: “यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केल्यानंतरच आम्ही आमच्या जीवनात मोठे बदल केले. आम्हाला बायबलमधून जी मदत मिळाली ती अमूल्य होती. कारण त्यामुळेच आम्ही जीवनातील त्या कठीण काळाचा यशस्वीपणे सामना करू शकलो.” जेनी म्हणते: “देवाच्या मदतीमुळेच आम्ही जीवनातील त्या खडतर काळाचा सामना करू शकलो. सोबत मिळून बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि विवाह मजबूत करण्याचा सतत प्रयत्न केल्यामुळे आता आम्ही खूप सुखी आहोत.” (w१२-E ०५/०१)

[तळटीपा]

^ परि. 3 या लेखात नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 5 तुम्हाला याबाबतीत योग्य निर्णय घेण्यासाठी इंग्रजीतील सावध राहा! २२ एप्रिल, १९९९, पृष्ठ ६ आणि ८ ऑगस्ट, १९९५, पृष्ठे १० आणि ११ या अंकात अधिक माहिती मिळेल.

^ परि. 17 जर काही वेळा त्या व्यक्‍तीला पूर्णपणे टाळणे शक्य नसेल (जसे की ऑफिसमध्ये) तर तुम्ही फक्‍त कामापुरताच त्या व्यक्‍तीशी संपर्क ठेवावा. इतरांच्या समोरच त्या व्यक्‍तीशी बोला आणि याबाबत तुमच्या विवाहसोबत्याला आधीच सांगा.

स्वतःला विचारा . . .

▪ विश्‍वासघात झाल्यानंतरही कोणत्या कारणांमुळे मी विवाह टिकवून ठेवण्याचा निश्‍चय केला?

▪ माझ्या विवाहसोबत्यामध्ये मी आता कोणते चांगले गुण पाहू शकतो?

▪ लग्नाआधी आम्ही एकमेकांना भेटायचो तेव्हा मी कशा प्रकारे माझे प्रेम व्यक्‍त करायचो आणि मी आता परत ते कसे करू शकतो?