व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग तीन

दुखावलेलं मन—एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावते तेव्हा . . .

दुखावलेलं मन—एखादी व्यक्‍ती आपलं मन दुखावते तेव्हा . . .

“‘तुम्ही माझे पैसे चोरले,’ असा खोटा आरोप मंडळीतल्या एका बहिणीनं माझ्यावर केला. मंडळीतल्या इतरांना पण ही गोष्ट समजली आणि त्यांना तिचंच म्हणणं खरं वाटू लागलं. नंतर तिला समजलं की तिचा गैरसमज झाला होता, म्हणून तिनं माझी माफी मागितली. मी वरवर तिला ‘बरं, ठीक आहे,’ म्हटलं पण तिच्यामुळं मला जो मानसिक त्रास झाला होता तो तिला कुठं माहीत? मी तिला माफ करू शकले नाही. माझं मन खूप दुखावलं होतं.”—लिंडा नावाची बहीण.

तुमचंही मन मंडळीतील एखाद्यामुळं दुखावलं गेलं आहे का? इतरांच्या वागण्यामुळं काहींचं मन इतकं दुखावलं आहे की ते आध्यात्मिक कार्यांत मागं पडले आहेत. तुमच्याही बाबतीत असं झालं आहे का?

“देवाच्या प्रीतीपासून” आपल्याला कुणी वेगळं करू शकतं का?

ख्रिश्‍चनांना एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. (योहान १३:३४, ३५) त्यामुळं ही आज्ञा मोडून एखादा बांधव किंवा बहीण आपलं मन दुखावते तेव्हा तिला माफ करणं खूप कठीण जाऊ शकतं. काही वेळा तर आपण खूप खचून जाऊ शकतो.—स्तोत्र ५५:१२, १३.

बायबल म्हणतं की एखाद्या व्यक्‍तीची “एखाद्याविरुद्ध तक्रार” असू शकते. यामुळं कधीकधी एकमेकांची मनं दुखावली जाऊ शकतात. (कलस्सैकर ३:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण जेव्हा हे स्वतःच्या बाबतीत घडतं तेव्हा समोरच्या व्यक्‍तीला माफ करणं मात्र कठीण जातं. अशा वेळी आपण काय करू शकतो? पुढं शास्त्रवचनातील तीन तत्त्वं सांगितली आहेत ज्यावर आपण विचार करू शकतो:

आपला स्वर्गीय पिता सर्वकाही पाहतो. आपल्यावर जो अन्याय झाला आणि त्यामुळं आपल्याला किती मानसिक त्रास झाला हेही तो पाहतो. (इब्री लोकांस ४:१३) आपला त्रास पाहून यहोवालाही खूप वाईट वाटतं. (यशया ६३:९) यहोवाचं आपल्यावर असलेलं प्रेम तो, ‘संकटामुळं’ किंवा इतर कोणत्याही गोष्टीमुळं कधीच कमी होऊ देत नाही. “देवाच्या प्रीतीपासून आपल्याला कोणीही,” इतकंच काय तर आपले बंधुभगिनीही दूर नेऊ शकत नाहीत. (रोमकर ८:३५, ३८, ३९, सुबोधभाषांतर) यहोवा जर कोणत्याही गोष्टीमुळं आपल्याला त्याच्यापासून दूर होऊ देत नाही, तर मग आपण एखाद्या गोष्टीमुळं  किंवा व्यक्‍तीमुळं  यहोवापासून दूर का जावं?

माफ करण्याचा अर्थ चूक खपवून घेणं नाही. एखाद्याकडून झालेल्या चुकीबद्दल तिला माफ करणं म्हणजे ती चूक क्षुल्लक समजणं किंवा ती खपवून घेणं असं नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या. यहोवा कधीच पाप खपवून  घेत नाही. पण जर एखाद्या व्यक्‍तीनं खरा पश्‍चात्ताप दाखवला तर तो तिला माफ करण्यास  नेहमी तयार असतो. (स्तोत्र १०३:१२, १३; हबक्कूक १:१३) इतरांना क्षमा करा, असं जेव्हा यहोवा आपल्याला सांगतो तेव्हा आपण त्याचं अनुकरण करावं, अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. यहोवा कधीच “आपला क्रोध सर्वकाळ राहू” देत नाही मग आपण का बरं मनात राग बाळगायचा?—स्तोत्र १०३:९; मत्तय ६:१४.

राग न बाळगल्यानं आपलाच फायदा होतो. असं का म्हणता येईल? एका उदाहरणावर विचार करा. समजा तुम्ही हातात एक छोटा दगड घेतला आणि हात लांब करून तो धरून ठेवला. कदाचित थोड्या वेळासाठी, काही मिनिटं, तासभर तुम्ही तो धरून ठेवाल. पण जर तुम्हाला बराच वेळ तो धरून ठेवायला सांगितलं तर? तुमचा हात दुखू लागेल आणि तुम्हाला तो दगड टाकून द्यावासा वाटेल. खरं पाहिलं तर त्या दगडाचं वजन काही जास्त नसेल, पण तुम्ही तो जास्त वेळ हातात धरल्यामुळं आता तो तुम्हाला जड वाटू लागेल. एखाद्याबद्दल अगदी क्षुल्लक कारणासाठीसुद्धा मनात राग बाळगणं हातात दगड धरण्यासारखंच आहे. तुम्ही जितका जास्त वेळ मनात राग बाळगाल तितका तुम्हालाच त्रास होईल. ही गोष्ट यहोवालाही माहीत असल्यामुळं तो आपल्याला, मनात राग बाळगू नका तर इतरांना माफ करा, असं सांगतो. खरंच, आपण एखाद्याला माफ करतो तेव्हा आपलाच फायदा होतो.—नीतिसूत्रे ११:१७.

मनात राग न बाळगल्यानं आपलाच फायदा होतो

“जणू काय यहोवा स्वतः माझ्याशी बोलत आहे असं मला वाटलं”

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या लिंडानं त्या बहिणीला माफ करण्यासाठी काय केलं? तिनं अशा वचनांवर मनन केलं ज्यात इतरांना माफ करण्याबद्दल सांगितलं आहे. (स्तोत्र १३०:३, ४) बायबलचं एक तत्त्व खासकरून तिच्या मनाला भिडलं. ते म्हणजे आपण इतरांना माफ केलं तर यहोवादेखील आपल्या चुका माफ करेल. (इफिसकर ४:३२–५:२) या वचनांवर विचार करताना तिला काय वाटलं याबद्दल ती म्हणते: “जणू काय यहोवा स्वतः माझ्याशी बोलत आहे असं मला वाटलं.”

यामुळं लिंडानं त्या बहिणीला मनापासून माफ केलं. आणि आता त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. लिंडा आज आनंदानं यहोवाची सेवा करत आहे. यहोवा तुम्हालाही मदत करण्यास खूप आतुर आहे.