व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग एक

हरवलेल्या मेंढराला मी शोधेन

हरवलेल्या मेंढराला मी शोधेन

चित्रातलं मेंढरू खूप घाबरलेलं दिसतंय. ते आधी इतर मेंढरांसोबतच चरत होतं, पण चरता चरता कळपापासून दूर गेलं. त्यामुळं त्याला मेंढपाळ आणि बाकीची मेंढरं दिसत नाहीत. दुसरीकडं पाहता अंधारही वाढत चालला आहे. रात्रीच्या वेळी हिंस्र पशू बाहेर पडतात आणि त्यांचा सामना करायला हे मेंढरू खूप लहान आहे. ते खूप घाबरलंय. पण अचानक त्याला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. कुणाचा आवाज? त्याच्या मेंढपाळाचा! मेंढपाळ आपला जीव धोक्यात घालून मेंढराला शोधत शोधत आला आहे. मेंढराला पाहिल्याबरोबर तो धावत जाऊन त्याला उचलतो, कुरवाळतो आणि आपल्या अंगरख्यात लपेटून घरी नेतो.

यहोवानं बायबलमध्ये बऱ्‍याच वेळा स्वतःची तुलना अशाच एका मेंढपाळाशी केली आहे. तो आपल्याला असं आश्‍वासन देतो: ‘मी आपल्या मेंढरास शोधेन.’—यहेज्केल ३४:११, १२.

“मी स्वतः माझा कळप चारेन”

यहोवाची मेंढरं कोण आहेत? यहोवावर प्रेम करणारे आणि त्याची उपसाना करणारे सर्व लोक त्याची मेंढरं आहेत. बायबलमध्ये असं सांगितलं आहे: यहोवा “जो आपला उत्पन्‍नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणांतील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहो.” (स्तोत्र ९५:६, ७) कळपातल्या मेंढरांप्रमाणे आज यहोवाचे उपासकही आपला मेंढपाळ यहोवा याचं ऐकण्यास नेहमी तयार असतात. पण ही मेंढरं प्रत्येक वेळी यहोवाचं ऐकतातच का? नाही. बायबलमध्ये काही वेळा यहोवाच्या सेवकांची तुलना विखुरलेल्या, ‘हरवलेल्या’ आणि ‘भरकटलेल्या’ मेंढरांशी करण्यात आली आहे. (यहेज्केल ३४:१२; मत्तय १५:२४; १ पेत्र २:२५) एखादं मेंढरू यहोवापासून दूर गेलं असलं, तरी यहोवा मात्र नेहमी त्या मेंढराला शोधत असतो.

यहोवा तुमचा  मेंढपाळ आहे असं तुम्हाला अजूनही वाटतं का? आज यहोवा कोणत्या अर्थानं एका मेंढपाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतो? पुढील तीन मार्गांवर विचार करा:

तो आपल्याला आध्यात्मिक अन्‍न पुरवतो. यहोवानं आपल्या मेंढरांबद्दल असं म्हटलं: “ते तेथे चांगल्या चरणीत [कुरणात] बसतील, इस्राएलाच्या पर्वतावर त्यांस उत्तम चारा मिळेल.” (यहेज्केल ३४:१४) आजपर्यंत यहोवानं नेहमी आपल्याला योग्य वेळेवर आणि वेगवेगळ्या विषयांवर आध्यात्मिक अन्‍न पुरवलं आहे. आणि या अन्‍नामुळं आपल्याला तजेला मिळतो. तुम्हाला असा एखादा लेख, एखादं भाषण किंवा मग एखादा व्हिडिओ आठवतो का, ज्यात तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं होतं? तेव्हा तुम्हाला नक्कीच खातरी पटली असेल की यहोवाला तुमची मनापासून काळजी आहे.

तो आपल्याला संरक्षण आणि मदत पुरवतो. यहोवानं आपल्याला आश्‍वासन दिलं आहे, की “भटकलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करेन. दुर्बलांना मी सबळ करेन.” (यहेज्केल ३४:१६, ईझी-टू-रीड व्हर्शन) जीवनातील चिंतांमुळं आध्यात्मिक रीत्या कमजोर किंवा व्याकूळ झालेल्यांना यहोवा मदत करतो. बंधुभगिनींच्या वागण्यामुळं कदाचित एखाद्याचं मन जखमी झालं असेल तर यहोवा त्याच्या जखमांवर मलमपट्टी लावतो. त्या जखमा भरून काढण्यासाठी यहोवा नक्की आपल्याला मदत करेल. तसंच, भरकटलेल्यांना आणि नकारात्मक भावना असलेल्यांना यहोवा परत कळपात आणतो.

मेंढरांना पुन्हा आणणं माझी जबाबदारी आहे, असं तो समजतो. यहोवा म्हणतो: “मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. ... त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणेन.” तो पुढं असं म्हणतो: “हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन.” (यहेज्केल ३४:१२, १६, ईझी-टू-रीड व्हर्शन) एखादं मेंढरू हरवतं तेव्हा त्याला लगेच ते जाणवतं. तो असा विचार करत नाही, की ‘एक गेलं तर गेलं, बाकीची मेंढरं आहेत ना.’ तर हरवलेल्या त्या मेंढराचा तो शोध घेत राहतो आणि ते सापडल्यावर त्याला खूप आनंद होतो. (मत्तय १८:१२-१४) कारण यहोवा आपल्या खऱ्‍या उपासकांना “माझी मेंढरे” असं म्हणतो. यावरून यहोवाचं आपल्या लोकांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं! (यहेज्केल ३४:३१) तुम्ही त्या मेंढरांपैकी एक आहात.

यहोवा हरवलेल्या मेंढराला विसरून जात नाही उलट, ते सापडल्यावर त्याला खूप आनंद होतो

पूर्वीचा आनंद आम्हाला पुन्हा दे

यहोवा तुमचा शोध घेऊन तुम्हाला परत येण्याची विनंती का करत आहे? कारण तुम्ही आनंदी असावं अशी त्याची इच्छा आहे. तो आपल्या लोकांवर आशीर्वादांचा वर्षाव करेल, असं वचन त्यानं दिलं आहे. (यशया ४४:३) हे वचन तो नक्की पूर्ण करेल. आणि याआधी तुम्ही ते स्वतः अनुभवलं आहे.

तुम्ही यहोवाविषयी शिकू लागला तो काळ आठवा. देवाचं नाव, मानवजातीसाठी असलेला त्याचा उद्देश, मृत लोकांची खरी अवस्था यांविषयी तुम्ही पहिल्यांदा शिकलात तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? अधिवेशनांत, संमेलनांत आपण आपल्या बांधवांना भेटायचो तेव्हा आपल्याला किती आनंद व्हायचा! एखाद्या व्यक्‍तीनं प्रचारात तुमचं चांगलं ऐकून घेतल्यामुळं तुम्हाला मनापासून आनंद झाला नव्हता का?

पूर्वीचे ते चांगले दिवस तुमच्या जीवनात पुन्हा येऊ शकतात. यहोवाच्या विश्‍वासू सेवकांनी त्याला अशी प्रार्थना केली होती: “तू आम्हास आपणाकडे परत घे म्हणजे आम्ही वळू; पूर्वीचे दिवस आम्हास पुनः आण.” (विलापगीत ५:२१) यहोवानं त्यांची ही प्रार्थना ऐकली. त्याचे लोक पुन्हा आनंदानं त्याची सेवा करू लागले. (नहेम्या ८:१७) यहोवा तुमचीही प्रार्थना ऐकेल आणि तुम्ही पुन्हा तो आनंद मिळवू शकाल.

पण कदाचित तुम्ही म्हणाल की यहोवाजवळ परत येणं इतकं सोपं नाही. मार्गात बरेच अडथळे आहेत. यांपैकी काही अडथळे कोणते आहेत आणि तुम्ही ते कसे पार करू शकता हे आता आपण पाहू या.