व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग पाच

आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या

आपल्या मेंढपाळाकडं व जिवाचं रक्षण करणाऱ्‍याकडं परत या

हे माहितीपत्रक वाचत असताना तुम्हाला अनेकदा असं वाटलं असेल, की ‘अरे हो, माझीसुद्धा हीच समस्या आहे!’ असं आहे तर तुम्ही एकटे नाही. प्राचीन काळात व आजच्या काळातही यहोवाच्या बऱ्‍याच विश्‍वासू सेवकांना अशाच समस्यांना तोंड द्यावं लागलं. पण यांवर मात करण्यासाठी जशी यहोवानं त्यांना मदत केली तसंच तो तुम्हालाही मदत करेल.

तुम्ही परत याल तेव्हा यहोवा तुमचं स्वागत करेल

तुम्ही परत याल तेव्हा यहोवा तुमचं स्वागत करेल याची खातरी बाळगा. चिंता, दुखावलेल्या भावना यांवर मात करण्यासाठी आणि शुद्ध विवेक मिळवण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. यामुळं तुम्हाला मनःशांती मिळेल. तुम्ही पुन्हा एकदा मंडळीतील बांधवांसोबत यहोवाची सेवा आवेशानं करू शकाल. प्रेषित पेत्रानं पहिल्या शतकातील ख्रिस्ती बांधवांना जे लिहिलं ते तुमच्या बाबतीतही खरं ठरेल. त्यानं म्हटलं: “तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक याच्याकडे तुम्ही परत फिरला आहा.”—१ पेत्र २:२५.

यहोवाकडं परत येणं हा तुमच्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय असेल. असं का म्हणता येईल? कारण यामुळं तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल. (नीतिसूत्रे २७:११) हे खरं आहे की यहोवा आपल्याला त्याची सेवा व त्याच्यावर प्रेम करण्यासाठी कधीच जबरदस्ती करत नाही. (अनुवाद ३०:१९, २०) पण हे लक्षात घ्या की यहोवालाही आपल्यासारख्याच भावना आहेत. आपण जे काही करतो त्यामुळं त्याला एकतर आनंद होतो किंवा दुःख. एका बायबल विद्वानानं असं म्हटलं की आपलं मन हे एका दारासारखं आहे. या दाराला बाहेरून कडी नाही, फक्‍त आतून आहे. त्यामुळं आपल्याला जर आपलं मन उघडायचं असेल, तर ते दुसरं-तिसरं कुणी नव्हे तर आपल्यालाच उघडावं लागेल. यहोवावरील प्रेमापोटी त्याची उपासना करण्याद्वारे आपण  जणू काय ते दार उघडतो. आणि असं केल्यास यहोवाला खूप आनंद होतो. उपासना मिळवण्याचा हक्क फक्‍त यहोवालाच आहे. आणि त्याची उपासना करण्याद्वारे आपल्याला जो आनंद मिळतो त्याची तुलना दुसऱ्‍या कोणत्याच गोष्टीशी करता येणार नाही.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; प्रकटीकरण ४:११.

यासोबतच यहोवाची पुन्हा सेवा सुरू केल्यामुळं तुमची आध्यात्मिक भूकदेखील भागेल. (मत्तय ५:६) कोणत्या अर्थानं? आज जगातील लोक, ‘आपण या पृथ्वीवर का आहोत?’, ‘जीवनाचा उद्देश काय आहे?’ या प्रश्‍नांची उत्तरं मिळवण्यासाठी कुठंकुठं भटकतात. माणसामध्ये अशा गोष्टी जाणून घेण्याची ओढ आहे कारण यहोवानंच त्याला तसं निर्माण केलं आहे. त्याची उपासना करण्यात आपल्याला समाधान मिळावं या उद्देशानं यहोवानं आपल्याला बनवलं होतं. त्यामुळं, आपण प्रेमापोटी त्याची भक्‍ती करत आहोत या जाणीवेमुळं येणारं समाधान इतर कशानंच मिळत नाही.—स्तोत्र ६३:१-५.

यहोवा तुमच्या परतण्याची वाट पाहत आहे. आम्ही हे इतकं खातरीनं का म्हणू शकतो? हे माहितीपत्रक यहोवाला अनेकदा प्रार्थना केल्यानंतर खास तुमच्यासाठी बनवण्यात आलं आहे. कदाचित मंडळीतील वडिलांनी किंवा एखाद्या बांधवानं तुम्हाला हे दिलं असेल. ते मिळाल्यावर तुम्हाला ते वाचावंसं वाटलं आणि यातील माहितीनुसार पावलं उचलण्यास तुम्ही तयार झाला. यहोवा तुम्हाला विसरला असता, तर खास तुमच्यासाठी त्यानं हे माहितीपत्रक काढलं असतं का? हे माहितीपत्रक या गोष्टीचा पुरावा आहे की यहोवा अजूनही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तो तुम्हाला परत येण्याची विनंती करत आहे.—योहान ६:४४.

यहोवा हरवलेल्या मेंढरांना कधीच विसरत नाही हे पाहून आपलं मन भरून येतं. याबद्दल डॉना नावाच्या बहिणीनं असं म्हटलं: “मी हळूहळू सत्यातून बाहेर गेले. पण बऱ्‍याच वेळा मी स्तोत्र १३९:२३, २४ या वचनावर विचार करायचे. त्या वचनात म्हटलं आहे, की ‘हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव.’ मला जगातील लोकांची वागणूक कधीच पटली नाही. मी यहोवाच्या संघटनेत असायला हवं असंच मला वाटायचं. मला जाणवू लागलं, की यहोवानं मला  अजूनही सोडलेलं नाही, मीच त्याला सोडून गेले असल्यामुळं आता मलाच त्याच्याजवळ  परत जाण्याची गरज होती. आणि ते मी केलं याचा मला खूप आनंद होतो!”

“मला जाणवू लागलं, की यहोवानं मला  अजूनही सोडलेलं नाही, मीच त्याला सोडून गेले असल्यामुळं आता मलाच त्याच्याजवळ  परत जाण्याची गरज होती”

तुम्ही पुन्हा एकदा यहोवाकडून मिळणारा आनंद अनुभवू शकाल अशी आम्ही मनापासून प्रार्थना करतो. (नहेम्या ८:१०) यहोवाजवळ परत येण्याचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही.